निवडणुका हे लोकशाही व्यवस्थेचे वैशिष्ट्य. जगातील लोकशाही व्यवस्था असलेल्या अनेक देशांमध्ये नियमित अंतराने निवडणुका होतात, सरकारे तयार होतात, पडतात हे चक्र सुरूच असते. मात्र, काही देशांतील निवडणुका हा जागतिक चर्चेचा विषय ठरतो. त्यातील नेत्यांचा झालेला पराभव आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये चर्चिला जातो. असेच एक नेते म्हणजे हंगेरीचे माजी पंतप्रधान विक्टर ओर्बान होय! नुकत्याच हंगेरीमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये विक्टर ओर्बान यांना पराभवाचा सामना करावा लागला असून, त्यांची तब्बल दीड दशकांची सत्ता संपुष्टात आली. कधीकाळी ओर्बान यांचे सहकारी असलेल्या पीटर मग्यार यांनीच त्यांचा पराभव केला.
नुकत्याच झालेल्या हंगेरीतील निवडणुकांमध्ये तेथील जनतेने 80 टक्के एवढे विक्रमी मतदान करून ओर्बान यांना सत्तेतून पायउतार होण्यास भाग पाडले. ओर्बान यांच्या पराभवाचे मुख्य कारण हे नागरी समस्यांचे निवारण करण्यास आलेले अपयश हेच दिसते. यामध्ये प्रामुख्याने बेरोजगारी, सरकारी धोरणलकव्यामुळे अर्थव्यवस्थेला आलेले जडत्व ही प्रमुख कारणे आहेत. अर्थव्यवस्थेच्या नकारात्मक वाढीमुळे हंगेरीतील नागरिकांच्या जीवनाचा स्तर खालावत असल्याची टीकाही मोठ्या प्रमाणात ओर्बान सरकारवर होत होती. तसेच ओर्बान यांच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोपही सातत्याने झाले. ओर्बान सरकार ‘क्रॉनिज’ अर्थात, श्रीमंत वर्गालाच पोसत असल्याची ओरडही विरोधकांनी सातत्याने केली.
ओर्बान यांच्या पराभवाचे दुसरे मोठे कारण म्हणजे, रशिया-युक्रेन युद्धात ओर्बान सरकारने युरोपीय महासंघांच्या विरोधात घेतलेली रशियापूरक भूमिका होय. तसेच युरोपीय महासंघाने हंगेरीचा रोखलेला निधीदेखील ओर्बान यांच्या काळातील दीर्घकाळ वादाचा विषय ठरला. हंगेरीमधील न्यायालयीन स्वातंत्र्य, भ्रष्टाचार, निधीचा गैरवापर अशा अनेक मुद्द्यांकडे अंगुलीनिर्देश करत, निधी हस्तांतरणास युरोपीय महासंघाने विरोध केला. गेली तब्बल 15 वर्षे या हंगेरीवर ओर्बान यांना हे मुद्दे सोडवण्यात यश आले नाही.
हंगेरी हा युरोपीय महासंघातील एक महत्त्वाचा सदस्य देश. हंगेरीचे स्थान मध्य युरोपात असल्याने, पूर्व आणि पश्चिम युरोपला जोडणारा सेतू म्हणून याकडे पाहिले जाते. तसेच हंगेरी युरोपातील जर्मनीसारख्या देशांतील उत्पादनासाठी आणि गुंतवणुकीसाठी एक मोठी बाजारपेठेही आहे. ऊर्जासुरक्षेसाठी ओर्बान सरकारने हंगेरीला रशियाच्या जवळ नेल्याने, एकप्रकारे युरोप आणि रशिया यांच्यातील संबंधांसाठी हंगेरीचे महत्त्व मोठे ठरले. त्याचप्रमाणे युरोपीय महासंघातील रशियाविरुद्धच्या अनेक निर्णयांविरोधात ओर्बान सरकारने नकाराधिकाराचा वापरही केला होता. त्यामुळे आजूबाजूच्या युरोपीय देशांमध्ये ओर्बान सरकारविषयी आधीच नकारात्मक भावना होती.
ओर्बान यांच्या पराभवाला सर्वात महत्त्वाचे एक कारण ठरले, ते म्हणजे निवडणुकीवरील परकीय प्रभाव. ओर्बान यांची दीर्घकाळ इस्रायल, रशिया, अमेरिका या देशांच्या सद्यकालीन नेतृत्वाबरोबर चांगले संबंध असल्याची चर्चा हंगेरीमध्ये होतीच. ओर्बान यांना निवडणुकीमध्ये रशियाकडून त्यांना मोठी मदत होत असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने करण्यात आला. त्याच वेळी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनीही ओर्बान यांच्या समर्थनार्थ केलेला हंगेरीचा दौरा, विरोधकांच्या आरोपाला अधिकच बळ देऊन गेला. म्हणूनच ओर्बान यांच्या निवडणुकीतील पराभवाला कुठे तरी त्यांची ट्रम्प यांच्याशी असलेली जवळीकही कारणीभूत ठरल्याची चर्चा आहे. कारण, आधी व्यापारयुद्ध आणि आता इराणविरोधी युद्धामुळे डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिमा युरोपपासून ते आशियापर्यंत जागतिक स्तरावर ढासळली आहे. अशावेळी ट्रम्प यांच्याशी निकटचे संबंध आणि त्यातच व्हान्स यांनी केलेला ओर्बान यांचा प्रचार हा हंगेरावासीयांना फारसा रुचलेला दिसत नाही.
हंगेरीला सध्या पीटर मग्यार यांच्या रूपाने नवीन पंतप्रधान मिळाला असून, त्यांच्यासमोरही आव्हानांचा डोंगर आहेच. आंतरराष्ट्रीय भूमिकांबरोबरच, युरोपीय महसंघाशी सलोखा निर्माण करणे, त्याचबरोबर जनतेच्या आकांक्षापूत करण्याचे शिवधनुष्य त्यांना उचलावे लागणार आहे, हे मात्र निश्चित!
-कौस्तुभ वीरकर