मुंबई : (Navnath Ban) नारी शक्ती वंदन विधेयकाद्वारे महिलांचा सन्मान होऊ नये, असा संजय राऊत यांचा मनसुबा असला तरी कोणत्याही परिस्थितीत हे विधेयक संसदेत मंजूर झाल्याशिवाय राहणार नाही. या विधेयकाच्या निमित्ताने संपूर्ण देश पुन्हा एकदा एकवटेल आणि तुम्ही मात्र तोंडावर पडाल, अशी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन (Navnath Ban) यांनी केली.
पत्रकार परिषदेत बोलताना नवनाथ बन (Navnath Ban) म्हणाले की, "देशाला आग लागावी, वणवा पेटावा अशी संजय राऊत यांची कितीही सुप्त इच्छा असली तरी या देशात आग लागणार नाही. कारण देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभा आहे. नारी शक्ती वंदन विधेयकाच्या निमित्ताने उत्तर विरुद्ध दक्षिण असा सामना रंगवण्याचा प्रयत्न तुमच्या माध्यमातून केला जातो आहे. मात्र, ते होणार नाही. नारीशक्ती वंदन विधेयक म्हणजे भाजपा शक्ती विधेयक नाही तर, भारतीय शक्ति विधेयक आहे. या विधेयकामुळे देशातील महिलांना एक सन्मानाचे स्थान मिळणार आहे. महिलांना लोकसभेत ३३ टक्के आरक्षण मिळणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला आपली कर्तबदारी दाखवतात. अगदी तशाच पद्धतीने संसदेत लोकसभेध्येही महिला आपल्या कर्तृत्वाचा झेंडा उंचावू शकतील."(Navnath Ban)
"संजय राऊत तुम्ही या विधेयकाला विरोध करत आहात, कारण महिलांच्या हातात ताकद मिळाली तर आपल्या पक्षाचे काही खरे नाही, हे तुम्हाला ठाऊक आहे. हे विधेयक म्हणजे राजकीय अजेंडा नाही तर हा महिलांच्या स्वाभिमानाचा आणि सन्मानाचा अजेंडा आहे. हे विधेयक सादर होऊ द्या, त्यावर दोन दिवस चर्चा होईल आणि त्यानंतर कॉंग्रेस, तृणमूल कॉंग्रेस, शरद पवार यांचे खासदार या विधेयकाला नक्कीच पाठींबा देतील यात शंका नाही. लोकसभेत उद्धव ठाकरे यांचे खासदारही या विधेयकाच्या बाजूने राहतील. कारण आपण महिला शक्तीला वंदन करण्यासाठीच हे विधेयक आणले आहे. या विधेयकाच्या निमित्ताने महिलांना त्यांच्या हक्क मिळणार आहे," असेही ते म्हणाले.(Navnath Ban)
झारीतील शुक्राचार्य होण्याचा प्रयत्न करू नका
"तृणमूल काँग्रेसच्या खासदारांना भाजपचे खासदार संसदेत येण्यापासून कसे काय रोखतील? कुठल्याही खासदारांना संसदेमध्ये येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. हे संजय राऊतांना माहित नाही का? उचलली जीभ लावली टाळ्याला असे करू नका. तोंडाला येईल ते बडबडू नका. आपल्या बाजूने भूमिका घेतली नाही की, ते देशद्रोही, असे तुमचे आहे. झारीतील शुक्राचार्य होण्याचा प्रयत्न केलात तर महिला तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. घटनेच्या तरतुदीनुसार दर ३० वर्षानी सीमांकन होते. संजय राऊत, तुम्हाला स्वतःचा मतदारसंघ नाही. आपल्या संपूर्ण हयातीत साध्या महापालिकेच्या प्रभागात तुम्ही निवडणूक लढवली नाही. ना विधानसभेची, ना लोकसभेची निवडणूक लढली, त्यामुळे तुम्ही मतदारसंघाची चिंता करू नका," असा टोलाही नवनाथ बन (Navnath Ban) यांनी लगावला.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....