बृहन्नडा
शस्त्रास्त्रे घेऊन रथावर आरुढ वीर बृहन्नडाच्या रथाचे सारथ्य उत्तर करीत होता. इकडे दुर्योधन, दुःशासन, कर्ण, भीष्म आदी महारथी यांसमवेत कौरवसेना होती. कौरवांना आश्चर्य वाटले की, एका लहान मुलाला बरोबर घेऊन एक स्त्री युद्ध कसे करणार? पण, चमत्कार असा झाला की, सारी कौरवसेना व तिचे रथी-महारथी बृहन्नडारूप अर्जुनाकडून पराभूत झाले. बृहन्नडा कोण असावी? याचा कौरव विचार करीत होते, इतक्यातच बृहन्नडेने संमोहन अस्त्र चालवून समस्त कौरवसेनेला संमोहित केले. संमोहन अस्त्रामुळे समस्त कौरवसेना बेशुद्ध झाल्याने काहीही करू शकली नाही. कौरवांची ही विकल अवस्था पाहून बृहन्नडेने उत्तर यास कौरवांच्या अंगावरील वस्त्रे काढून घेऊन, त्यांना नग्न करण्यास सांगितले. उत्तरने तसे केले. सारे कौरव शुद्धीवर आल्यावर ते हस्तिनापुरास परत गेले. अशा तऱ्हेने बृहन्नडेच्या रूपी अर्जुनाने विराट नगरीवरील भयानक संकट विफल केले. महाभारतामध्ये या प्रसंगाला ‘उत्तर गोग्रहण’ म्हटले आहे. ही समस्त कथा एका अद्भुत कादंबरीसारखी वाटते; परंतु त्याचा व्यासआशय अगदी भिन्न आहे.
या आशयानुसार ही कथा म्हणजे योगमार्गाच्या साधनांचा इतिहास आहे. एकटी बृहन्नडा वीर असली, तरी सहस्रवधी कौरवांविरुद्ध लढून विजय मिळवू कशी मिळवू शकते? याचा आपण विचार करू. आपली पूवची शस्त्रास्त्रे काढण्यासाठी बृहन्नडा एका शमीच्या वृक्षाजवळ जाते आणि एका शवाखाली लपविलेली शस्त्रास्त्रे काढते. शव तीन-चार दिवस झाल्यावर सडून त्यामधून दुर्गंधी येते.
नंतर ते शव खाण्यासाठी घारी, गिधाडे, कोल्हे, लांडगे इत्यादी पशु-पक्षी येतात. परंतु, कथेमधील शव जसेच्या तसे राहिलेले असते; म्हणजे आश्चर्यच आहे.
आता कथेचा व्यासआशय काय, ते पाहू. पांडवांचा वनवास म्हणजे, योगसाधकाची 12 वर्षांची तपश्चर्या. जी अध्यात्म साधना करणारा प्रत्येक साधक करू इच्छितो. अशा प्रकारे अध्यात्म साधना केल्यावर, प्रत्येक साधकाने तपस्येमध्ये जे काही मिळविले, त्याचे प्रदर्शन करु नये. साधकाने कमीत कमी एक वर्ष तरी याविषयी मौन पाळावे. हाच व्यासकथेमधील एक वर्षांचा अज्ञातवास होय! जो साधक 12 वर्षे तपश्चर्या केल्यानंतर आपल्या तपस्येचे फळ अथवा चमत्कार लोकांना दाखविण्याचा प्रयत्न करेल, त्याची तपस्या विफल होईल. याला पुन्हा 12 वर्षे तपश्चर्या करावी लागेल. या कथेत आध्यात्मिक साधनेचे एक महत्त्वपूर्ण रहस्य व्यास साधकांसमोर ठेवू इच्छित आहेत. आजकालचे साधक थोडीशी दिखाऊ साधना करून, लगेच त्याच्या फलश्रुतीचे प्रदर्शन करू इच्छितात. हा त्यांचा उच्छृंखलपणा असल्याचे व्यास कथेद्वारे सांगतात. विराट नगरी म्हणजे आपले विराट अस्तित्व, ज्यामध्ये साधक पांडव आपल्या पत्नी द्रौपदीसह वेश आणि व्यवसाय बदलून राहतात. जे खरे संन्यासी आहेत, ते अशाच प्रकारे पूवचे नाव, वेश आणि व्यवसाय बदलून जीवनाच्या विराट नगरीमध्ये राहतात. संन्याशांचा उद्देश समाजसेवाच असायला हवा. म्हणून विराट नगरीमध्ये पांडव सेवक म्हणून राहिले. धर्मराज कंक ब्राह्मण झाला, ऋग्वेदामध्ये ‘कंकतो कंकः’ नावाची एक अती महत्त्वाची ऋचा आहे. जिच्या साधनेने साधक ब्रह्म जाणू शकतो. अर्थात् ब्राह्मण होऊ शकतो. यासाठी धर्मराज ‘कंक’ नावाचा ब्राह्मण झाला.
संन्यास ग्रहण केल्यानंतर साधकास अध्यात्मामध्ये खरी रुची येते. म्हणजे उत्तम रुची येण्यासाठी, साधकास उत्तम स्वयंपाकी झाले पाहिजे. म्हणजेच, ही पाकसिद्धी अध्यात्माची आहे. बल्लव बनून भीमाने हीच पाकसिद्धी मिळविली. बल्लव म्हणजे आपल्या अवस्थांचा स्वामी, इंद्रियांचा स्वामी, गो-स्वामी! द्रौपदी सैरंध्री होऊन राणीची परिचारिका झाली. सैरंध्री म्हणजे रंध्रासहित असलेली शुद्ध काया, जी योगनाड्या मोकळ्या झाल्यामुळे पूर्ण झाली असून, यामुळे साधक द्रौपदी आता विराट नगरीच्या राणीचे दास्यत्व करू शकते. अर्जुन बृहन्नडा बनला. पुरुष असूनसुद्धा नपुंसक बनण्याचे कारण आध्यात्मिक आहे. बृहन्नडा म्हणजे बृहत् + नडा. ‘बृहत्’ म्हणजे सर्व व ‘नडा’ म्हणजे योगनाड्या. ज्याच्या सर्व योगनाड्या शुद्ध होऊन उच्च अवस्थेला पोहोचल्या आहेत, त्याला व्यास ‘बृहन्नडा’ म्हणतात. या अवस्थेचा साधक सर्वभाव विरक्त किंवा नपुंसक असतो; ज्याप्रमाणे पंडु नपुंसक दाखविला आहे. अशा तऱ्हेने अर्जुन नपुंसक बृहन्नडा झाल्याने स्वतःची पूर्वावस्था विसरून गेला; परंतु आता साधनेची परिपूर्ण उत्तर अवस्था आली. म्हणूनच आता विराट राजाचा पुत्र उत्तर वीर अर्जुनाच्या प्रयासरथाचा सारथी होतो. कौरवांनीसुद्धा पांडवांच्या साधनेची उत्तर अवस्था ओळखून, ते विराट नगरीच्या उत्तरेकडील द्वारावर हल्ला करण्यासाठी आले. दुष्ट प्रवृत्तीच्या कौरवांनीसुद्धा आता साधनेच्या उत्तर अवस्थेला मान दिला आणि साधनेच्या या उत्तर अवस्थेत, कौरवांना नपुंसकवृत्ती बृहन्नडेसमोर हार मानावी लागली आणि तीसुद्धा संमोहनास्त्राद्वारे!संमोहन म्हणजे पूवच्या वाईट अवस्थेचे विस्मरण होणे. येथे वस्त्राला वृत्तीची उपमा दिली आहे. वस्त्र देहाला झाकतात, त्याप्रमाणे मनातील अनेक चांगल्या वाईट वृत्ती शुद्ध चित्ताला झाकतात, मायेत ठेवतात. वस्त्रहरण म्हणजे कौरवांचे वृत्तीहरण आहे. सर्व वस्त्रे उतरविण्यासाठी किमान 15 मिनिटे लागू शकतात. याप्रमाणे लाखो कौरवांचे वस्त्रहरण करण्यास किमान महिने वा वर्षे लागतील, जे काम एका राजपुत्राने एका क्षणात केले; कारण वृत्तीहरण एका क्षणातच होते. म्हणून महाभारतातील हे वस्त्रहरण शब्दशः अर्थाने ‘वस्त्रहरण’ नसून ते ‘वृत्तीहरण’ आहे.
इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः॥अ-2 लो-60॥
(क्रमशः)
- योगिराज हरकरे
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)
9702937357