अक्षय्य तृतीया हा साडे तीन मुहुर्तांपैकी एक. क्षय होत नाही ते अक्षय्य, या न्यायाने अनेक शुभ कार्याची सुरुवात अक्षय्य यशासाठी याच दिवशी केली जाते. या दिवसाचे महत्त्व, त्याची परंपरा, त्यामागचे धर्मशास्त्र याचाही बोध असणे आवश्यक आहे. यासाठी सर्वांगांचा विचार करत रविवार दि. 19 एप्रिल रोजी असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या महत्त्वाचा घेतलेला मागोवा...
अक्षय्य’ म्हणजे जे कधीही क्षय पावत नाही, जे कधीही संपत नाही. अक्षय्य तृतीया या सणाची ‘वैशाख शुक्ल तृतीया’ ही तिथी कधीही क्षय पावत नाही, ती सदैव पूर्ण असते. संपूर्ण जगत् हे सातत्याने चल आणि क्षय पावणारे आहे. जन्माला येणारी प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक क्षणी मृत्यूच्या जवळ जात असतो. आजच्या वेगवान, स्पर्धात्मक जगात तर टिकणे, टिकवणे आणि टिकून राहणे, हेच सर्वांत मोठे आव्हान झाले आहे. नाती तुटतात, विश्वास डळमळतो, माणसे जवळ असूनही एकटी असतात. अशा वेळी हा सण मनाला एक विलक्षण दिलासा देतो. या सातत्याने बदलणाऱ्या आणि क्षय पावणाऱ्या जगतातसुद्धा, काही गोष्टी शाश्वत असतात आणि त्या शाश्वत गोष्टींचे स्मरण करून देणे, हेच या सणाचे खरे वैशिष्ट्य आहे.
या तिथीचे महत्त्व सांगणाऱ्या कथा म्हणजे, वास्तवात चिरंतन अशा मानवी मूल्यांची आपल्याला कालौघात विस्मृती होऊ नये, म्हणून गोष्टींमध्ये हळूवारपणे गुंफलेली रहस्ये आहेत. मन्वंतर हा शब्द आपल्याकडे या नवीन कालगणनेचा आरंभबिन्दू मानला जातो. आजच्याच दिवशी वैवस्वत मन्वंतरातील सत्ययुगाचा प्रारंभ झाला. सत्य युगाचे वैशिष्ट्य म्हणजे, या युगात धर्म हा सत्य, दया, तप आणि दान या चारही अचल अशा स्तंभांवर स्थापित होता. या कालखंडात माणूस माणसाशी प्रेमाने वागत होता; निसर्गाशी तादात्म्य पावलेला होता आणि त्याला स्वतःच्या कर्तव्याची जाणीव होती. सत्ययुगातील या सुवर्ण कालखंडाची आपल्याला विस्मृती होऊ नये आणि आज कलियुगात मानवी मूल्यांचे नित्य अधःपतन झालेले बघताना, आपल्याला चिरंतन मूल्यांचे पुनश्च आकर्षण निर्माण होऊन ते आत्मसात करण्याची बुद्धी व्हावी, या हेतूने आपण हा मंगल दिन प्रतिवष साजरा करतो.
याच दिवशी भगवान विष्णूंचा सहावा अवतार भगवान परशुरामांचा, महष जमदग्नी आणि रेणुकामातेच्या पोटी जन्म झाला आहे. परशुरामांचा अत्यंत सार्थ उल्लेख पुढील लोकात केला आहे.
अग्रतः चतुरो वेदाः पृष्ठतः सशरं धनुः|
इदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपि शरादपि॥
भगवान परशुराम हे भारतीय इतिहासातील अशा अद्वितीय महापुरुषाचे प्रतीक आहेत, ज्यांच्यामध्ये ‘शास्त्र’ आणि ‘शस्त्र’ यांचा अपूर्व संगम आढळतो. या लोकातील ‘अग्रतः चतुरो वेदाः’ हे त्यांच्या ब्राह्मणत्वाचे दर्शन घडवते; ते भृगु ऋषींचे वंशज असून चारही वेदांचे प्रकांडपंडित आणि ज्ञानी होते, तर ‘पृष्ठतः सशरं धनुः’ हे त्यांच्या क्षत्रिय तेजाचे प्रतीक आहे. जेव्हा जगावर अधर्माचा भार वाढला, तेव्हा त्यांनी हातात, परशु आणि धनुष्य धारण करून दुष्टांचा संहार केला.
त्यांच्या व्यक्तिमत्त्वात ‘शापादपि’ (तपोबल आणि आत्मशक्ती) आणि ‘शरादपि’ (शारीरिक पराक्रम) या दोन्ही शक्ती अशा प्रकारे एकरूप झाल्या होत्या की, त्यांनी अधर्माचे निर्दालन करण्यासाठी ज्ञानाचा आणि शस्त्राचा एकाचवेळी वापर केला. परशुराम हे केवळ एक ऋषी नसून ते एक अजिंक्य योद्धादेखील होते. अशा प्रकारे, बुद्धीचे तेज आणि बाहूंचे बळ यांचा मिलाप असलेल्या परशुरामांच्या व्यक्तिमत्त्वाचे तंतोतंत आणि चपखल वर्णन हा लोक करतो. महाराष्ट्रात ‘परशुराम जयंती’ या दिवशी मोठ्या उत्साहाने साजरी होते.
पांडवांच्या वनवासाच्या काळात सूर्यदेवाने युधिष्ठिराला ‘अक्षय पात्र’ दिले होते. ज्याचे वैशिष्ट्य असे होते की, जोपर्यंत द्रौपदी भोजन करत नाही, तोपर्यंत त्या पात्रातील अन्न कधीही संपत नसे. पांडवांचा हा सुखाचा काळ पाहून दुर्योधनाच्या मनात मत्सर निर्माण झाला. त्याने एक कपट रचले आणि अत्यंत कोपिष्ट समजले जाणाऱ्या दुर्वास ऋषींना, त्यांच्या एक हजार शिष्यांसह पांडवांच्या आश्रमात जाण्यास प्रवृत्त केले. दुर्योधनाने हे जाणीवपूर्वक अशावेळी केले, जेव्हा पांडवांचे आणि द्रौपदीचे जेवण झाले होते आणि अक्षय पात्रातील अन्नाचा पुरवठा त्या दिवसापुरता थांबला होता.
दुर्वास ऋषींनी आश्रमात येऊन भोजनाची इच्छा व्यक्त केली आणि शिष्यांसह नदीवर स्नान करण्यास गेले. द्रौपदीसमोर आता मोठे धर्मसंकट उभे राहिले. कारण ऋषींना रिकाम्या पोटी परत पाठवणे म्हणजे विनाशाला आमंत्रणच देणे होते. अशा संकटकाळी द्रौपदीने मनोभावे श्रीकृष्णाचा धावा केला. श्रीकृष्ण तत्काळ प्रकट झाला आणि त्याने द्रौपदीला विचारले, “मला खूप भूक लागली आहे, तुझ्या पात्रात काही शिल्लक आहे का?” द्रौपदीने पात्रातील चिकटलेला शेवटचा भाताचा कण कृष्णाला दिला. कृष्णाने तो कण ग्रहण करताच “तृप्तोऽहम्” असे म्हटले. कृष्णाच्या तृप्तीमुळे अचाट चमत्कार झाला; नदीवर स्नान करणाऱ्या दुर्वास ऋषींचे आणि त्यांच्या हजारो शिष्यांचे पोट एकाएकी भरले गेले. त्यांना प्रचंड ढेकर येऊ लागले आणि जणू काही आपण पंचपक्वान्न जेवलो आहोत, अशी त्यांची तृप्ती झाली. भगवंताच्या एका कणाने संपूर्ण ब्रह्मांड तृप्त झाले आणि पांडव दुर्वास ऋषींच्या संभाव्य कोपापासून वाचले. द्रौपदी आणि युधिष्ठिर यांचे दुर्वास ऋषींच्या क्रोधापासून रक्षण करण्याचे कार्य त्या अक्षय पात्राने आजच्याच दिवशी केले.
एकदा कैलास पर्वतावर भगवान शिव आणि माता पार्वती यांच्यात संवादादरम्यान, ‘माया’ आणि ’सत्य’ या विषयावर वाद निर्माण झाला. भगवान शिव म्हणाले की, “हे संपूर्ण जग केवळ एक माया आहे आणि अन्नदेखील त्याच मायेचा एक भाग आहे.” मातेने हे विधान ऐकले तेव्हा तिला जाणवले की, जर अन्न माया असेल तर जगातील सर्व जीव केवळ मायेवर जगतात का? अन्नाचे महत्त्व सिद्ध करण्यासाठी आणि जगाला अन्नाचे मोल कळावे, यासाठी पार्वतीने अदृश्य होण्याचा निर्णय घेतला. जेव्हा आदिशक्ती जी स्वतः साक्षात अन्नपूर्णा आहे ती जगातून गुप्त झाली, तेव्हा सृष्टीमध्ये हाहाकार माजला. निसर्गचक्र थांबले, शेते ओसाड झाली आणि प्राणीमात्रांसह देवगणांनाही भीषण उपासमारीचा सामना करावा लागला. सर्वत्र अन्नासाठी आर्त हाका ऐकू येऊ लागल्या; पण कुठेही अन्नाचा एक कणही मिळेनासा झाला.
जगाची ही अवस्था पाहून, भगवान शिवाला आपल्या विधानाचा पश्चात्ताप झाला आणि त्यांना जाणवले की, शरीर जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत अन्न हेच पूर्णब्रह्म आहे. देवी पार्वतीच्या करुणेमुळे तिने पुन्हा प्रकट होण्याचे ठरवले. परंतु तिने या वेळी काशी (वाराणसी) नगरीची निवड केली आणि तिथे तिने अन्नपूर्णा स्वरूपात आपले अन्नछत्र सुरू केले. वाराणसी ही नगरी तिच्या प्रभावाने सुवर्णमय आणि धान्याने समृद्ध झाली. जगात सर्वत्र दुष्काळ असताना, केवळ काशीतच मुबलक अन्न उपलब्ध होते. ही वार्ता जेव्हा भगवान शिवाला कळली, तेव्हा ते एका सामान्य भिक्षुकाचे रूप घेऊन हातात भिक्षापात्र धरून काशीत पोहोचले.
साक्षात त्रिलोकाचा स्वामी, ज्याच्या एका खुणेवर संपूर्ण सृष्टी चालते, तो आज माता अन्नपूर्णेच्या दारात भिक्षेकरी म्हणून उभा राहिला. शिवाने देवीला प्रार्थना केली, “हे माते, मला आणि या जगाला अन्नाची भिक्षा दे, जेणेकरून सृष्टीचे संवर्धन होईल.” माता अन्नपूर्णेने अत्यंत प्रेमाने सुवर्ण पळीने शिवाला भोजन दिले. या प्रसंगातून शिवाने जगाला हेच शिकवले की, आध्यात्मिक उन्नतीसाठीदेखील शरीराला अन्नाची गरज असते आणि निसर्गशक्ती ही मातेसमान आहे, जिचा अनादर कोणालाही परवडणारा नाही.
आज अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने आपण सर्वांनी अन्नाची नासाडी न करणे, भुकेलेल्या व्यक्तीला अन्न आणि तहानलेल्या जीवाला पाणी प्रदान करणे हाच सर्वांत मोठा धर्म आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे. दान हा आपल्या संस्कृतीचा पायाभूत सिद्धांत आहे त्याचे पालन करणे, करुणाभाव विकसित करणे, हे अत्यंत आवश्यक आहे. मानवतेच्या शाश्वत आणि चिरंतन अशा मूल्यांना अक्षय ठेवण्याची प्रतिज्ञा करणे, हीच खरी अक्षय्य तृतीया साजरी करण्याची परिपूर्ण पद्धत आहे, यात संशय नाही.
- आसावरी पाटणकर