मुंबई : (Uttam Nagar Murder Case) दिल्लीच्या उत्तम नगर परिसरात होळीच्या दिवशी झालेल्या २६ वर्षीय तरुणच्या हत्येचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. पीडित कुटुंबाने या प्रकरणात नवी तक्रार दाखल केली असून, आरोपींच्या बाजूच्या लोकांकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. खरंतर उत्तम नगरमध्ये तरुणच्या हत्येनंतर वातावरण आधीपासूनच संवेदनशील आहे. मात्र मंगळवारी ही नवी तक्रार दाखल करण्यात आली असून त्यामुळे परिसरातील तणाव आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
पीडित कुटुंबाच्या वकिलांच्या मते, सोमवारी संध्याकाळी घडलेली एक घटना कुटुंबात भीतीचे वातावरण निर्माण करणारी ठरली. सायंकाळी सुमारे ५:२० वाजता तरुणची आई घराबाहेर उभी असताना, बुरखा परिधान केलेल्या ७-८ महिला त्या गल्लीत आल्या. त्या ‘बाबू खान’ नावाच्या व्यक्तीच्या घरात गेल्या आणि त्याच्या बाल्कनीतून तरुणच्या आईला लक्ष्य करत जातीय सूचक आणि अत्यंत आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला.
आरोप आहे की, त्या महिलांनी तरुणच्या आईला धमकावत म्हटले, जसे आम्ही तुझ्या पहिल्या मुलाला मारलं, तसेच तुझ्या दुसऱ्या मुलालाही ठार मारू. तरुणच्या आईने ही घटना आपल्या पतीला सांगितली आणि त्यानंतर कुटुंबाने तात्काळ पोलिसांना कळवले. तरुणच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात जाऊन लेखी तक्रार दाखल केली.
उत्तम नगरमधील (Uttam Nagar Murder Case) हे प्रकरण केवळ हत्येपुरते मर्यादित न राहता त्याला सांप्रदायिक स्वरूपही प्राप्त झाले आहे. दि. ४ मार्च रोजी होळीच्या वेळी दोन वेगवेगळ्या समुदायांतील कुटुंबांमध्ये झालेल्या वादानंतर तरुणची मारहाण करून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर दुसऱ्या पक्षातील लोकांनी दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. यात ईदच्या सुमारास हिंसाचार होण्याची शक्यता व्यक्त करत, द्वेषपूर्ण भाषण आणि लक्षित हिंसा रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांना निर्देश देण्याची मागणी करण्यात आली होती.
यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने नगर निगम (एमसीडी) ला आरोपींच्या मालमत्तांवर कोणतीही तोडफोड करण्यापूर्वी योग्य कायदेशीर प्रक्रिया पाळण्याचे तोंडी निर्देश दिले होते. दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्थानिक नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. तसेच, सोशल मीडियावर कोणतीही अप्रमाणित माहिती शेअर न करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.(Uttam Nagar Murder Case)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक