मतदारयाद्यांवरून ममतादीदींचा थयथयाट

    15-Apr-2026   
Total Views |

प. बंगालमध्ये ‌‘एसआयआर‌’ प्रक्रिया राबविण्याचा निर्णय झाल्यापासून, ते प्रक्रियेदरम्यान आणि आता प्रक्रियेनंतरही वाद काही शमलेला नाही. कारण, ‌‘एसआयआर‌’मुळे प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीची हक्काची ‌‘व्होटबँक‌’ असलेल्या लाखो अवैध घुसखोरांची नावे वगळण्यात आली आहेत. पण, तरीही ममतादीदींचा थयथयाट थांबलेला नसून, हा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी त्यांनी कायम ठेवलेला दिसतो. आता दीदींनी त्यावरुन कितीही राजकीय भांडवल लाटायचे ठरवले तरी उपयोग शून्यच! कारण, पंतप्रधान मोदींच्या सभांना होणाऱ्या रेकॉर्डब्रेक गदने दीदींची पुरती घाबरगुंडी उडाली आहे.

प. बंगालमध्ये दि. 23 एप्रिल ते 29 एप्रिल या काळात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत तृणमूल काँग्रेससमोर लोकसभा निवडणुकीप्रमाणेच भारतीय जनता पक्षाने तगडे आव्हान उभे केले आहे. प. बंगाल विधानसभेच्या एकूण 294 जागा असून, या निवडणुकीत राज्याची सत्ता मिळवायचीच, या निर्धाराने भारतीय जनता पक्ष निवडणूक रिंगणात अगदी त्वेषाने उतरला आहे. या निवडणुकीपूव प. बंगालमध्ये मतदारयाद्यांची विशेष सखोल फेररचना (एसआयआर) करण्याचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने हाती घेतला होता. त्या कार्यक्रमास तृणमूल काँग्रेसने आणि त्या पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी वेळोवेळी आक्षेप घेतला. मतदारयाद्यांची विशेष सखोल फेररचना करण्यामागे केंद्रातील भाजपला मदत व्हावी, हा निवडणूक आयोगाचा अंतस्थ हेतू असल्याचा आरोप त्यांनी केला. पण, प्रत्यक्षात असे मुळीच नाही.

प. बंगाल हे भारत-बांगलादेश सीमेवरील एक संवेदनशील राज्य. या राज्यात मोठ्या प्रमाणात सातत्याने घुसखोरी होते. तसेच तेथून येणारे घुसखोर हे मतदारयाद्यांमध्ये आपले नाव घुसडून मतदानाचा हक्क बजाविण्याचे उद्योग वर्षानुवर्षे करीत आहेत. असे सर्व बेकायदेशीर मतदार शोधून काढून त्यांची नावे मतदारयाद्यांमधून वगळण्याची विशेष मोहीम निवडणूक आयोगाने हाती घेतली होती. पण, त्या मोहिमेला ममता बॅनज यांच्यासह काही विरोधी पक्षांनी विरोध केला होता. पण, मतदारयाद्यांची सखोल फेररचना करणे हे देशाच्या हिताचा विचार करता आवश्यक होते. पण, ममतादीदी यांना मात्र ते मान्य नव्हते!

निवडणूक आयोगाने प. बंगालमध्ये मतदारयाद्यांची फेररचना करून या यादीमधून सुमारे 90 लाख लोकांची नावे वगळली. हे 90 लाख लोक आतापर्यंत मतदानास पात्र होते. पण, आता त्यांची नावे वगळण्यात आल्याने आपली मोठी ‌‘मतपेढी‌’ हातातून गेल्याने तृणमूल काँग्रेससह अन्य पक्षांची ‌‘कोल्हेकुई‌’ सुरु आहे. पण, निवडणूक आयोगाने काही प्रथमच अशी विशेष मोहीम हाती घेतली नव्हती. गेल्या दोन वर्षांमध्ये देशातील काही राज्यांमध्ये अशी मोहीम हाती घेण्यात आली होती. 2014 मध्ये घेण्यात आलेल्या मोहिमेत आंध्र प्रदेशात 18.6 लाख, महाराष्ट्रात 21.5 लाख, हरियाणात 5.8 लाख आणि ओडिशा राज्यात 9.4 लाख नावे मतदारयाद्यांमधून वगळण्यात आली होती. 2025 मध्ये दिल्ली आणि बिहारमध्ये ही मोहीम राबविण्यात आली. दिल्लीमधून 11.2 लाख आणि बिहारमधून 46 लाख नावे वगळण्यात आली, तर केरळम्‌‍मधून 8.57 लाख, तामिळनाडूमधून सुमारे 74 लाख नावे वगळण्यात आली होती. प. बंगालसाठी अशी फेररचना करणे आवश्यकच होते. हे राज्य अत्यंत संवेदनशील असून भारत आणि बांगलादेश यांच्यात 4 हजार, 95 किमी इतक्या लांबीची सीमा आहे. त्यातील सुमारे 2 हजार, 216 किमी सीमा ही प. बंगाल राज्यासमवेत आहे. उत्तर 24 परगणा, नादिया, मुर्शिदाबाद, मालदा, उत्तर दिनाजपूर, दक्षिण दिनाजपूर, जलपैगुडी, कुचबिहार असे जिल्हे सीमेला लागून आहेत. या भागांमधून सातत्याने घुसखोरी होत आली आहे. कोणतीही कागदपत्रे नसलेले असंख्य घुसखोर प. बंगालमध्ये राहात असून, ती एक डोकेदुखी ठरली आहे. असे असून गेल्या तीन वर्षांमध्ये केवळ 2 हजार, 600 बांगलादेशी नागरिकांना परत पाठविण्यात आले. ही सर्व स्थिती लक्षात घेऊन या राज्यात मतदारयाद्यांची सखोल फेररचना करणे आवश्यक होते. खरे म्हणजे, ममता बॅनज यांनीही त्यास विरोध करण्याचे काही कारण नव्हते. कारण, ही फेररचना देशहिताचीच होती. परंतु, केवळ आपलाच विचार करणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्या ते कधी लक्षात येणार? त्यातूनच त्यांचा हा थयथयाट सुरू आहे, इतकेच!

कोडागूमध्ये तणाव, हिंदूंना ऐक्याचे आवाहन!

कोडागू जिल्ह्यातील नापोकलू या लहानशा गावात एका हिंदू कामगाराला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ हजारो ग्रामस्थांनी नुकताच निषेध मोर्चा काढला. तसेच या निषेध मोर्चासाठी जिल्ह्यातून लोक मोठ्या संख्येने जमले होते. विविध स्थानिक हिंदू गटांनी या निषेध मोर्चाचे आयोजन केले. सदर हिंदू तरुणास मारहाण करण्याची घटना दि. 27 मार्च रोजी घडली. त्या घटनेच्या निषेधार्थ निषेध मोर्चा आणि सभेचे आयोजन करण्यात आले होते.

जिहादी गुंडांनी त्या तरुणावर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी ज्या सभेचे आयोजन करण्यात आले होते, त्या सभेस उपस्थित असलेल्या सर्वांना आपले ऐक्य कायम ठेवण्याची शपथ देण्यात आली. हिंदू कामगारावर जो हल्ला झाला, तो करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या सभेत करण्यात आली. निषेध मोर्चाच्या आधी सर्व लोक स्थानिक मंदिरामध्ये एकत्र आले होते. त्या ठिकाणी प्रार्थना झाल्यानंतर नापकालू गावातून निषेध मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक दोन किमी लांब होती. त्यामध्ये महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले. मिरवणुकीत सहभागी झालेले नागरिक हातात भगवे झेंडे घेऊन आणि न्याय, सुरक्षा आणि ऐक्य याची मागणी करणारे विविध फलक घेऊन सहभागी झाले होते.

मुळात अशाप्रकारे हिंदू व्यक्तीवर हल्ला होण्याची ही काही पहिलीच घटना नाही. या आधीही अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत, याचे स्मरण एका वक्त्याने करून दिले. अशा घटना पुन्हा घडल्या, तर हिंदू समाज गप्प बसणार नाही, असा इशारा या सभेच्या निमित्ताने आम्ही देत आहोत, असे त्या वक्त्याने स्पष्ट केले. या निषेध सभेच्या निमित्ताने पोलीस बंदोबस्त कडक ठेवण्यात आला होता. हिंदू व्यक्तीवर जो हल्ला करण्यात आला, त्याचा तपास सुरू असून या घटनेस जे जबाबदार आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. हिंदू समाज अन्यायाविरुद्ध त्वेषाने संघटितपणे उभा राहू लागल्याचे या घटनेवरून दिसून आले आहे.

‌‘लायन ऑफ लडाख‌’ हरपला!

कारगिल युद्धात महापराक्रम करणारे कर्नल सोनम वांगचुक यांचे नुकतेच म्हणजे दि. 10 एप्रिल रोजी निधन झाले. देशभक्ती, कमालीचे नेतृत्वगुण आणि कर्तव्यनिष्ठा यांचा समन्वय कर्नल सोनम वांगचुक यांच्या ठिकाणी होता. त्यांनी कारगिल युद्धामध्ये जे शौर्य दाखविले, ते पुढील कित्येक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असेच आहे. कारगिल युद्धामध्ये कर्नल सोनम वांगचुक यांनी जो पराक्रम गाजविला, त्याबद्दल त्यांना ‌‘महावीर चक्र‌’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. चेन्नई येथील अधिकारी प्रशिक्षण विद्यालयात प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर वांगचुक हे ‌‘आसाम रायफल्स‌’मध्ये रुजू झाले होते. मेजरपदावर असताना एका मोहिमेमध्ये ते कारगिल भागात 30 जणांच्या तुकडीला घेऊन गेले होते. ‌‘चोरबाट ला‌’ भागातील एका मोहिमेवर ते गेले होते. दि. 31 मार्च 1999 रोजी त्यांच्या तुकडीने पहिला विजय मिळवला. गोठविणारी थंडी आणि प्रचंड उंचीचे पर्वत अशी अवघड परिस्थिती असताना, त्यांनी पाकिस्तानी सैन्यावर विजय मिळविला होता. 5 हजार, 500 मीटर उंचीवर, कडाक्याच्या थंडीत त्यांनी शत्रूवर मात केली होती. ‌‘ऑपरेशन विजय‌’दरम्यान बटालिक भागात मेजर वांगचुक यांच्या तुकडीने हे यश मिळविले होते. शत्रूच्या ठाण्यावर हल्ला करून पाकिस्तानच्या दोन सैनिकांना त्यांनी ठार केले होते. तसेच शत्रूकडील बरीच शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा हस्तगत केला होता. बटालिक भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शत्रू सैन्याने जी घुसखोरी केली होती; तेथून त्या सैन्यास पळवून लावण्यात आले. प्रतिकूल हवामान असताना, शत्रूच्या गोळीबाराची पर्वा न करता मेजर वांगचुक यांनी प्रचंड पराक्रम केला होता. सोनम वांगचुक यांच्या या पराक्रमाबद्दल त्यांना ‌‘महावीर चक्र‌’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. कारगिल युद्धात पराक्रम गाजविणाऱ्या कर्नल सोनम वांगचुक यांचे गेल्या शुक्रवारी, दि. 10 एप्रिल रोजी हृदयविकाराने निधन झाले. लडाखचे नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना, माजी लष्कर प्रमुख जनरल व्ही. पी. मलिक, लष्कराच्या उत्तर विभागाचे माजी प्रमुख लेफ्टनंट जनरल वाय. के. जोशी आदींनी या पराक्रमी सैनिकास आदरांजली वाहिली आहे.

मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी 22.5 कोटींचा निधी

केरळम्‌‍ राज्यातील मल्लपुरम परिसरातील अनेक मंदिरांचा विद्ध्वंस टिपू सुलतानाच्या कारकिदत करण्यात आला होता. अशा मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यासाठी अनंत अंबानी यांनी आपल्या वाढदिवसाचे निमित्त साधून 22.5 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. टिपू सुलतानाच्या आक्रमणामुळे ज्या मंदिरांचा विद्ध्वंस झाला; तसेच 1921 साली मलबारमध्ये मोपल्यांच्या बंडादरम्यान ज्या मंदिरांची वाताहत झाली, अशा मंदिरांचा जीर्णोद्धार या निधीमधून करण्यात येणार आहे.

मल्लपुरम जिल्ह्यातील ज्या तीन मंदिरांवर टिपू सुलतानाने हल्ले केले होते, त्या तीन मंदिरांना याद्वारे आर्थिक साहाय्य दिले जाणार आहे. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याचप्रमाणे अनंत अंबानी यांनी प्रसिद्ध गुरुवायूर मंदिर, राजराजेश्वरी मंदिर या मंदिरानाही निधी दिला आहे. मल्लपुरम जिल्ह्यातील निरमकैथाकोट्टा भगवती मंदिर, त्रिप्राणगोडे शिव मंदिर आणि थरीकांडीयुर महादेव मंदिर यांचा समावेश आहे. या तीनही मंदिरांचा संघर्षाचा प्रदीर्घ इतिहास आहे. तिरूर येथील शिव मंदिर टिपू सुलतानाच्या सैन्याने पाडले होते, तर 1921 मध्ये जे मोपल्यांचे बंड झाले, त्या काळात अनेक हिंदू मंदिरे पाडण्यात आली. याच काळात मुन्डोरशिक्कादावू महाविष्णू मंदिर पाडण्यात आले. केरळम्‌‍ राज्यातील आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ठेवा जपण्याच्या हेतूने आपण हा निधी दिला असल्याचे अनंत अंबानी यांनी म्हटले आहे. त्रिप्राणगोडे शिव मंदिराच्या ऐतिहासिक दीपमाळेसाठी अनंत अंबानी यांनी एक कोटी रुपये दिले आहेत. झामोरीन राजवटीच्या काळापासून चालत आलेली परंपरा जपण्याचा यामागील हेतू आहे. अनंत अंबानी यांनी दिलेल्या निधीमधून केरळम्‌‍ राज्यातील ऐतिहासिक मंदिरे विकसित केली जातील. त्या ठिकाणी पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.

9869020732

दत्ता पंचवाघ

एम. ए. (अर्थशास्त्र), पत्रकारिता क्षेत्रात ३३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. ‘हिंदुस्थान समाचार’ या वृत्तसंस्थेपासून पत्रकारितेस प्रारंभ. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पर्यटन आदी विषयांवर विपुल लेखन. आकाशवाणी मुंबई केंद्रासाठी लेखन.