सह्याद्रीसाठी 'सह्याद्री वाईल्डलाईफ फाऊंडेशन'ची धाव; व्याघ्र प्रकल्पाला २५ लाख रुपयांच्या साहित्य पुरवठा

    15-Apr-2026
Total Views |
sahyadri Tiger Reserve



मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील व्याघ्र स्थानांतरण प्रकल्पाला बळकटी देण्यासाठी 'सह्याद्री वाईल्डलाईफ फाऊंडेशन'ने प्रकल्पाला २५ लाख रुपयांची मदत केली आहे (sahyadri Tiger Reserve) . गेल्या चार महिन्यांमध्ये संरक्षण कुट्यांवरील साहित्य, सोलार फेन्सिंग, कॅमेरा ट्रॅप या स्वरुपाच्या माध्यमातून ही मदत पुरविण्यात आली आहे (sahyadri Tiger Reserve) . सामाजिक भावना म्हणून केलेल्या या मदतीचा फायदा प्रकल्पातील वनकर्मचाऱ्यांना व्याघ्र स्थानांतरण प्रकियेदरम्यान झाला आहे. (sahyadri Tiger Reserve)
 
नोव्हेंबर, २०२५ पासून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये व्याघ्र स्थानांतरण सुरू आहे. व्याघ्र स्थानांतरणासाठी क्षेत्रीय वन कर्मचाऱ्यांना विविध मार्गाने बळकटी देण्याची गरज होती. क्षेत्रीय वनकर्मचाऱ्यांकडून वनसंरक्षणासाठी वापरण्यात येणाऱ्या संरक्षण कुटीवर साहित्याची गरज, बफर क्षेत्रातील गावकऱ्यांचे बळकटीकरण आणि वाघांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरा ट्रॅपची आवश्यकता व्याघ्र प्रकल्पाला होती. या सर्व साहित्याचा पुरवठा सामाजिक मदत म्हणून 'सह्याद्री वाईल्डलाईफ फाऊंडेशन'च्या माध्यमातून करण्यात आला आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीव संवर्धनाच्या कामाला बळकटी यावी म्हणून आम्ही प्रकल्पाला विविध साहित्यांचा पुरवठा करुन एका अर्थी संवर्धन कार्याला हातभार लावल्याची भावना फाऊंडेशनचे आशिष पिलानी यांनी व्यक्त केली आहे.
 
फाऊंडेशनने चांदोली राष्ट्रीय उद्यानातील जवळपास २४ संरक्षण कुट्यांसाठी १२ लाख रुपयांच्या साहित्याचा पुरवठा केला आहे. यामध्ये वनमजूरांना दैनंदिन कामासाठी लागणारी स्वयंपाकाची भांडी, शेगडी, खुर्ची-टेबल, खाट अशा काही साहित्यांचा समावेश आहे. तसेच चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या बफर क्षेत्रातील उदगिरी आणि उखळू या गावातील ५० शेतकऱ्यांना साडे सात लाख रुपये किंमतीच्या सोलार फेन्सिंगचे वाटप केले आहे. वन्यजीवांना शेतीमध्ये घुसण्यास मज्जाव करणार हे सोलार फेन्सिंग असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शिवाय वाघांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी प्रकल्पाला सहा लाख रुपये किंमतीचे कॅमेरा ट्रॅप देण्यात आले आहेत. तसेच उदगिरी येथील गुरववाडी, केदारलिंग आणि भिसेवाडीमधील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मजबूत खिडक्या बसवून देण्यात आल्या आहेत.
 
 
 
सामाजिक भान म्हणून सह्याद्री वाईल्डलाईफ फाऊंडेशन आजवर व्याघ्र प्रकल्पातील क्षेत्रीय वनकर्मचाऱ्यांच्या बळकटीसाठी आवश्यक साहित्यरुपी मदत केली आहे. येत्या काळात त्यांच्याकडून पाणवठ्यांवर पाण्याचा पुरवठा करण्यासाठी ट्रॅक्टर आणि पाण्याचा टॅंकर देण्यात येणार आहे. तसेच कोयना अभयारण्यातील संरक्षण कुटीवर देखील जीवनावश्यक साहित्य पुरविण्यात येणार आहेत. - तुषार चव्हाण, क्षेत्र संचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प