जगात दोन प्रकारच्या सत्ता असतात; एक म्हणजे राजकीय सत्ता, जी कायदे, सैन्य आणि अर्थव्यवस्था यांच्या जोरावर चालते आणि दुसरी म्हणजे धर्मसत्ता, जी नैतिकता, मूल्ये आणि लोकांच्या श्रद्धांवर आधारलेली असते. जेव्हा या दोन सत्तांमध्ये संघर्ष होतो, तेव्हा तो केवळ मतभेद राहात नाही, तर त्याचे दूरगामी पडसाद उमटतात. आज अमेरिकेत जे घडत आहे, ते याचाच प्रत्यय देणारे म्हणावे लागेल. कारण, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे राजकारण हे आक्रमक राष्ट्रवाद, सैनिकी हस्तक्षेप आणि ‘मीच सर्वकाही’ या अहंकारी भूमिकेवर उभे आहे. त्याउलट पोप लिओ (14वे) यांची भूमिका ही शांती, करुणा आणि मानवी मूल्यांची बाजू घेणारी. यामुळेच हा संघर्ष ‘व्यक्ती विरुद्ध व्यक्ती’ नसून ‘विचारसरणी विरुद्ध विचारसरणी’ असा सध्या रंगल्याचे दिसते.
धर्म आणि राजकारणातील संघर्ष अजिबात नवीन नाही. इतिहासात तर अनेकदा समाजावर प्रचंड पगडा असल्याने चर्चने राजसत्तेला आव्हान दिले. मध्ययुगीन युरोपमध्ये पोप आणि सम्राट यांच्यातील सत्तासंघर्षही गाजले. 11व्या-12व्या शतकादरम्यान पोप आणि पवित्र रोमन सम्राट यांच्यात धर्मगुरू नेमण्याच्या अधिकारावरून मोठा संघर्ष झाला होता. इंग्लंडमध्ये ‘हेन्री आठवा’ याने पोपच्या विरोधात जाऊन स्वतंत्र चर्च स्थापन केले. फ्रेंच राज्यक्रांतीदरम्यान चर्चच्या सत्तेला मोठा धक्का बसला. या सर्व घटनांमध्ये एक गोष्ट समान होती; ती म्हणजे, राजसत्ता स्वतःला सर्वोच्च मानत होती, तर चर्च समाजावर नैतिक नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत होते.
अमेरिकेच्या स्थापनेपासूनच ‘चर्च आणि राज्य वेगळे’ ठेवण्याचा सिद्धांत स्वीकारला गेला. मात्र, याचा अर्थ धर्माचा प्रभाव संपला, असे होत नाही. उलट, अमेरिकेतील राजकारणात धार्मिक मतदारांचा प्रभाव प्रचंड आहे. विशेषतः इव्हँजेलिकल ख्रिश्चन आणि कॅथलिक गट हे निवडणुकांचे गणित बदलू शकतात. 2024च्या निवडणुकीत ट्रम्प यांच्या विजयात इव्हँजेलिकल ख्रिश्चनांचा मोठा वाटा होता. ट्रम्प यांच्या एकूण मतदारांपैकी 34 टक्के असे ख्रिश्चन होते, तर त्यांच्या प्रतिस्पध कमला हॅरिस यांच्या मतदारांमध्ये हे प्रमाण फक्त आठ टक्के होते. एकूण मतदारांपैकी सुमारे 20 टक्के असे मतदार होते आणि त्यांपैकी 79 टक्के लोकांनी ट्रम्प यांना मतदान केले. पण, आता तेच लोक नाराज झाले, तर त्याचा फटका थेट ट्रम्प यांनाही बसू शकतो.
ट्रम्प आणि पोप यांच्यातील संघर्ष तीव्र होण्याचे कारण म्हणजे, एकप्रकारे नैतिकतेवर राजकारणाचा हल्ला. ट्रम्प यांनी स्वतःला येशू ख्रिस्तासारखे दाखवणारा ‘एआय’ फोटो पोस्ट केला. यावरुन वादंग उठताच त्यांनी तो फोटो हटवलाही. सोमवारी त्यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की, त्यांना वाटले, हा फोटो त्यांना डॉक्टरसारखा दाखवत आहे. पण, स्वतःला मुळात येशूसारखे दाखवणे, हे केवळ राजकीय नाही, तर धार्मिक भावना दुखावणारे पाऊल होते. यातून एक संदेश जातो की, ‘मीच अंतिम सत्य आहे’ आणि ‘मीच देव आहे’, ‘माझ्यापेक्षा श्रेष्ठ कुणी नाही.’ पण, अशा पराकोटीच्या अहंकारामुळे धार्मिक मतदार दुरावले, तर निवडणुकीत थेट नुकसान होऊ शकते. पुराणमतवादी असलेल्या रिपब्लिकन पक्षातही ट्रम्प यांनी स्वत:चे केलेले हे ‘दैवीकरण’ रुचलेले नाहीच. यामुळे ट्रम्प यांचीच नव्हे तर अमेरिकेचीही आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिमा खराब होऊ शकते. तसेच अन्य ख्रिश्चन देशांशी संबंधही नाहक ताणले जाऊ शकतात, याचेही भान ट्रम्प यांना नाही. राजकारणात एकवेळ विरोधकांशी भांडणे परवडले, पण श्रद्धेशी टक्कर घेणे धोकादायक ठरते! तेच ट्रम्प यांच्या बाबतीत घडताना दिसते. आधीच ‘नो किंग्ज’ आंदोलनामुळे ट्रम्प यांची लोकप्रियता घटली आहे. आता थेट पोप यांच्याशी पंगा घेतल्याने ख्रिश्चन जगतात ट्रम्प चेष्टेचा आणि घृणेचाच विषय ठरले.
त्यातच आताचे पोप हेही अमेरिकेचे. त्यामुळे अमेरिकेमध्येही त्यांचा मोठा प्रभावगट आहे. त्यांनी ‘मी ट्रम्प यांना अजिबात घाबरत नाही’ म्हणत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचीच टोपी उडवली आहे. त्यामुळे आजचा संघर्ष आपल्याला एक गोष्ट स्पष्टपणे शिकवतो; सत्तेचा अहंकार आणि श्रद्धेचा अपमान हे कोणत्याही नेत्यासाठी घातकच! आणि कदाचित म्हणूनच, हा संघर्ष ट्रम्प यांच्यासाठी केवळ राजकीय नाही, तर भविष्यात अस्तित्वाचा प्रश्न नक्कीच ठरू शकतो.