पारगड ते मुंबई लालपरी : सामाजिक सहभागातून जनसेवा!

    15-Apr-2026
Total Views |

पारगड किल्ला म्हणजे कोल्हापूरच्या चंदगडचा लौकिक. पूव चंदगड तालुका ते मुंबई अशी एसटी सेवा होती. मात्र, ‌‘कोविड‌’मध्ये ही बससेवा शासनाने बंद केली. 2020 ते 2026 बससेवा बंद होती. पण, लोकसहभागाने ही सेवा पुन्हा सुरू झाली. त्याचा आढावा घेणारा हा लेख...

दि. 10 एप्रिलचा दिवस. चंदगड तालुक्यातील पारगड किल्ल्याच्या जवळ लोक जमले. आयाबाया माणसं पोरंसोरं अगदी दिवाळी-दसऱ्यासारखे नटून-थटून तिथे आले. इतक्यात ‌‘ती‌’ आली. लालजर्द आणि सुंदर. तिला पाहताच सगळ्यांनी टाळ्या पिटल्या. समाधान आणि हर्षोल्लासाने सगळे उत्साहित झाले. ती होती, लालपरी एसटी. ती मुंबईहून आली होती. लोकांनी एसटीचालक आणि वाहकाचा सन्मान केला, एसटीची पूजा केली. लक्ष्मीच आली, असे म्हणत तिचे औक्षण केले. चंदगडमध्ये एसटीचा इतका सन्मान, इतके कौतुक का? तर कोल्हापूरचा चंदगड तालुका, तालुक्यातली छोटी छोटी गावे, परिसराने मराठमोळी संस्कृती जपलेली. कोल्हापूरचे धार्मिक वातावरण ते निखळ उदारता सगळंच या परिसरात ठासून भरलेले. चंदगडमधून मुंबईमध्ये अनेकजण स्थायिक झाले. नोकरीसाठी, धंद्यासाठी किंवा आपलं नशीब आजमावण्यासाठी हे चंदगडमधले बांधव मुंबईत आले. चंदगड ते मुंबई प्रवास तसा सोपा नव्हताच. दररोज दुपारी लालपरी सुटायची, ती पहाटे मुंबईला पोहोचायची. नंतर ती पुन्हा 6 वाजता मुंबईहून सुटून संध्याकाळी चंदगडला पोहोचायची. 2020 पर्यंत चंदगड ते मुंबई प्रवास हा अत्यंत नियोजित पद्धतीने होई. एक बस सुटली, तर ताटकळत बसावे लागे किंवा प्रवासच रद्द करावा लागे.

पण, ‌‘कोरोना‌’मध्ये तर आणखीनच समस्या वाढली. ‌‘कोरोना‌’चा प्रादुर्भाव वाढू नये, प्रसार होऊ नये, म्हणून प्रशासनाने एसटी बंद केल्या होत्या. रेल्वेही ठप्प झाली होती. याचाच फटका चंदगड मुंबई लालपरी एसटी सेवेलाही बसला. ‌‘कोरोना‌’मुळे एसटी रद्द करण्यात आली. 2020 ते 2022 ‌‘कोरोना‌’चा हाहाकार होताच, कुणीही प्रवास करायला धजावत नव्हते. ‌’क्वारंटाईन‌’ केले जाईल, या भीतीने चंदगडचे लोकही मुंबई-पुण्याकडे जात-येत नव्हते आणि मुंबईहून किंवा इतर शहराकडूनही कुणी ये-जा करत नव्हते. त्यामुळे एसटी सेवा बंद पडली, याकडे कुणी विशेष लक्ष दिले नाही. पण ‌‘कोरोना‌’वर भारताने मात केली. चंदगडनेही ‌‘कोरोना‌’चा डंख सहन केला होताच. पण, ‌‘कोरोना‌’ गेला आणि चंदगडमध्येही जीवन परत आले. हळूहळू लोक कामधंद्याकडे वळू लागले. घरातून खऱ्या अर्थाने बाहेर पडू लागले. मुंबईमध्ये नोकरी-धंदा करणारे, पण गाव चंदगड असणारे अनेकजण अनवधानाने चंदगडमध्ये ‌‘कोरोना‌’काळात अडकले होतेच. मुंबईमध्ये शासनदरबारी किंवा नातेवाईकांकडे काम असणारेही चंदगडमध्ये लोक होतेच. राज्याच्या राजधानी मुंबईशी चंदगडच्या नागरिकांचीही भावनिक आणि आर्थिक नाळ जुळलेली आहेच. त्यामुळे ‌‘कोरोना‌’ गेल्यावर गावकऱ्यांची पावलं कामानिमित्त मुंबईकडे वळू लागली. पण मुंबईला जायचे म्हटले, तर चंदगडमध्ूान म्हणजे दक्षिण कोल्हापूरमधून आधी कोल्हापूर रेल्वे स्टेशनला जायचे आणि मग तिथून मुंबईला ट्रेनने जायचे. हे वेळखाऊ आणि खर्चिक होते. चंदगडमध्ये अनेक दुर्गम गावखेडी आहेत. कष्टकरी आणि मातीत रमणारे शेतकरी आहेत. दिवसभर कष्ट करून राबणारे लोक आहेत. त्यांना हा खर्च आणि इतका वेळ घालवणे परवडण्यासारखे नव्हते. त्यामुळे मुंबईला जायचे रखडले गेले.

माझे गाव चंदगडमधले. पण, रेल्वेत नोकरीला होतो, त्यामुळे मुंबईत स्थायिक झालो. वर्षाला अनेक फेऱ्या चंदगडला व्हायच्या. रेल्वेत कामाला असल्याने रेल्वेच्या सुविधा आहेत, तरीही लालपरीने गावी जायची ओढ आणि सवय होती. ‌‘कोरोना‌’नंतर गावी गेल्यावर गावकऱ्यांनी कैफियत मांडली. लालपरी बंद झाली; त्यामुळे कसा त्रास होतो, ते सातत्याने सांगत राहिले. आपण काहीतरी केले पाहिजे, असे मनात वाटून राहिले. रेल्वेत माझ्यासोबत मदनमोहन कुशवाहा हे कामाला होते. ते भाजप मुंबई ओबीसी मोर्चाचे सचिव आहेत आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत, हे मला माहीत होते. त्यामुळे मुंबईत आल्यावर त्यांच्याशी चर्चा केली. गावात एसटी कशी सुरू करता येईल, याची माहिती घेतली. मुंबईत मुंबई सेंट्रल आणि तिकडे चंदगड एसटी डेपो, तसेच ‌‘एसटी व्यवस्थापन मंडळा‌’ला पत्र लिहिले. मदनमोहन म्हणाले की, यामध्ये लोकसहभाग आवश्यक आहे. लोकांच्या मागण्या लोकांमार्फत पोहोचवल्या पाहिजे. शासन लोकांचे आहे आणि ते समाजासाठी काम करते. त्यांच्या म्हणण्यानुसार मग आम्ही चंदगडमधील 15 गावांच्या बैठका घेतल्या. ग्रामपंचायतीची मदत घेतली. चंदगड तालुक्यामध्ये एसटी सेवा सुरू करा, असे नियोजन केले आणि चंदगड तालुक्यातील 15 गावांतल्या लोकांच्या सह्या घेतल्या. ते सह्या केलेले निवेदन संबंधित सर्वांना दिले. मी गावात सगळ्यांचे मत घेत असताना चंदगड ते मुंबई एसटी सुरू करावी, यासाठी बनलेल्या शिष्टमंडळाला घेऊन मदन ‌‘एसटी व्यवस्थापक मंडळा‌’ला भेटले. तिथे चंदगडवासीयाच्या समस्या मांडल्या. आमच्याकडे एसटी आहेत, पण कर्मचारी नाहीत, असे सुरुवातीला उत्तर मिळाले. पण आम्ही शांत बसलो नाही. चंदगड, कोल्हापूर मुंबई सेंट्रल असा संपर्क करत राहिलो. काही दिवसांतच चक्रे फिरली आणि शेवटी दि. 10 एप्रिल रोजी पुन्हा चंदगड ते मुंबई एसटी सेवा सुरू झाली आणि 14 एप्रिल रोजी चंदगड ते कल्याण एसटी सुरू झाली. हे सगळे लोकसहभागाने शक्य झाले.

लोकसहभागातून लोककल्याण!

लोकशाही म्हणजे जनतेचे राज्य. या राज्यात प्रशासकीय चौकटीत राहून लोक आपले हक्क आणि न्याय यांसाठी समन्वय साधू शकतात, हेच खरे. चंदगडच्या 15 गावकऱ्यांनी दाखवलेल्या एकतेमुळे पुन्हा गावात एसटी सेवा सुरू झाली. यात भाजप पदाधिकारी आणि माझे मित्र मदनमोहन कुशवाहा यांचे मार्गदर्शन सहकार्य लाभले. सरकार आणि प्रशासनाचे धन्यवाद!

- प्रकाश पाटकर