मुंबई : (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान हे समाजपरिवर्तनाचे शक्तिशाली साधन आहे. त्यांच्या विचारांमुळेच वंचित, पीडित आणि दुर्बल घटकांना आत्मसन्मान, समान संधी, न्यायाचा मार्ग मिळाला आहे. महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाची सुरुवात होत असून, या निमित्ताने जातीयतेपासून मुक्त आणि भेदभावविरहित समाज घडविण्याचा संकल्प करावा, असे आवाहन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी मंगळवारी केले.
दादरच्या चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त(Dr. Babasaheb Ambedkar Jayanti) आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, महापौर रितू तावडे यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.
राज्यपाल जिष्णु देव वर्मा म्हणाले की, "स्त्री-पुरुष समानतेच्या बाबतीतही डॉ. आंबेडकर अग्रणी होते. महिलांना शिक्षण, संपत्ती आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या योगदानामुळेच भारत प्रजासत्ताक झाल्यापासून महिलांना समान मतदानाचा अधिकार मिळाला. संविधानातील घटनात्मक पायाभरणीमुळे भारताची लोकशाही सशक्त झाली आहे."(Dr. Babasaheb Ambedkar Jayanti)
जागतिक अर्थव्यवस्थेत डॉ. बाबासाहेबांचे विचार महत्वाचे
"भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेले आर्थिक दृष्टिकोन, चलनव्यवस्था आणि आर्थिक स्थैर्य याविषयीचे विचार आजही कालसुसंगत आहेत. जागतिक पातळीवर अर्थकारणात होत असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या तत्त्वज्ञानाचे महत्त्व अधिक असून जागतिक अर्थव्यवस्थेतही भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार महत्त्वाचे आहे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधील संशोधनातून डॉ. आंबेडकरांनी भारतात केंद्रीय बँकेची गरज अधोरेखित केली होती. त्यांच्या विचारांवर आधारितच पुढे रिझर्व बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली. तसेच ‘गोल्ड स्टँडर्ड’ आणि चलनाच्या खरेदी शक्तीबाबत त्यांनी मांडलेले विचार आजच्या जागतिक अर्थव्यवस्थेतही मोलाचे ठरत आहेत. १९२३ मध्ये डॉ. आंबेडकरांनी मांडलेल्या आर्थिक विचारांच्या आधारावरच आज जग वाटचाल करत आहे. त्यांच्या प्रबंधात मांडलेल्या तत्त्वांवरच भारताची अर्थव्यवस्था उभी आहे."
बाबासाहेबांचे स्मारक पुढील पिढ्यांसाठी प्रेरणास्थान
"भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान हाच आपला राष्ट्रधर्म असून बाबासाहेब हे केवळ भारतीय संविधानाचे शिल्पकार नसून माणुसकीचेही शिल्पकार आहेत. त्यांनी लिहिलेल्या राज्यघटनेमुळे देशातील शेवटच्या माणसालाही न्याय आणि सन्मान मिळण्याचा मार्ग सुकर झाला. महापुरुष शांततेतून जेव्हा कृती करतात, तेव्हा ती क्रांती ठरते. बाबासाहेबांनी आयुष्यभर शोषित, दलित आणि वंचित घटकांसाठी काम करून त्यांना सक्षम केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे भारताची लोकशाही जगात भक्कमपणे उभी आहे. इंदू मिल येथे उभारण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे काम वेगाने सुरू असून हे स्मारक पुढील पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरेल."
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
देशाचा सर्वांगीण विकास साधणे हेच खरे अभिवादन
"भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही प्रेरणा, संकल्प आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा तसेच त्यांच्या विचारांचे स्मरण करण्याचा दिवस आहे. डॉ. आंबेडकर यांच्या मानवकल्याणाच्या विचारांना पुढे नेणे आणि समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन देशाचा सर्वांगीण व वेगवान विकास साधणे हेच त्यांना खरे अभिवादन आहे. चैत्यभूमी ही बाबासाहेबांच्या विचारांचे ऊर्जा केंद्र आहे."
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....