बीकेसीत मेट्रो 2 बी कामादरम्यान क्रेन कोसळली

यांत्रिक बिघाडामुळे सुमारे ४०० टन वजनाची मोबाइल क्रेन उलटली

Total Views |
bkc metro 2
 
मुंबई : (BKC Metro 2) अंधेरी पश्चिम-मंडाले-मानखुर्द मेट्रो २ बच्या कामादरम्यान वांद्रे-कुर्ला संकुलात यांत्रिक बिघाडामुळे सुमारे ४०० टन वजनाची मोबाइल क्रेन उलटली. गर्डर उचलताना ही दुर्घटना घडली असून सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही. मात्र यामुळे बीकेसीतील वाहतुक काही काळासाठी प्रभावित झाली.
 
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मेट्रो २ ब(BKC Metro 2) चे काम हाती घेतले आहे. या कामांतर्गत पहाटे साडे चारच्या सुमारास बीकेसीतील एशियन हॉर्ट रुग्णालयाजवळ गर्डर स्थापित करताना ४०० टन वजनाच्या क्रेनमध्ये यांत्रिक बिघाड झाला आणि क्रेन उलटली. दोन क्रेनच्या साहाय्याने प्रीकास्ट (पूर्व निर्मित काँक्रीट) बीम मेट्रो स्टेशनवर बसवण्याचे काम सुरू असताना, त्यापैकी एक क्रेन यांत्रिक बिघाडामुळे कलंडली. त्या प्रक्रियेदरम्यान बीम हा बसवण्याच्या स्थितीत असल्याने तोही एका बाजूला झुकला. क्रेन कलंडल्यामुळे बीम कलंडला आहे. आकाराने मोठी क्रेन उलटल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. याचा वाहतुकीवर परिणाम झाला.
 
एमएमआरडीएने दिलेल्या माहितीनुसार,बीकेसी येथे सुरू असलेल्या मेट्रो मार्गिका २ब स्थानकाच्या बांधकामादरम्यान प्री-कास्ट बीम उचलत असताना काही यांत्रिक बिघाडामुळे सुमारे ४०० टन वजनाची मोबाईल क्रेन एशियन हार्ट हॉस्पिटल जंक्शनजवळ कलंडल्याची घटना घडली. कंत्राटदार जे.कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनीच्या मार्फत मेट्रो मार्गिकेच्या रात्रीच्या कामादरम्यान ही घटना घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही. (BKC Metro 2)
 
हेही वाचा :  Aditya Thackeray : आदित्य ठाकरे उबाठा गटाचे नवे कार्याध्यक्ष? चर्चांना उधाण
 
या घटनेनंतर कलंडलेली क्रेन तातडीने हटवून वाहतूक शक्य तितक्या लवकर सुरू करण्यासाठी एमएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.ही कलंडलेली क्रेन सुरक्षितपणे हटवण्यासाठी ६०० टन क्षमतेची क्रेन तैनात करण्यात येत आहे. नागरिकांना कमीत कमी त्रास होईल यासाठी आमची टीम सतत कार्यरत आहे.वाहतूक पोलिसांच्या समन्वयाने वाहतूक वळवण्यात आली असून शक्य तितक्या लवकर वाहतूक नियमित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच घटनास्थळी सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक ती अतिरिक्त उपाययोजना आणि तपासणी करण्यात येत आहे. (BKC Metro 2)
 
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.