आपल्या छंदाला महत्त्व देत, थोडी वेगळी वाट चोखंदळत मुंबईमध्ये ‘हुलाहूप’ हा कलाप्रकार रुजवणाऱ्या शिवानी धोपावकर यांच्याविषयी...
नुकताच हिंदू नववर्षाचे स्वागत करणारा गुढीपाडव्याचा सण उत्साहात साजरा झाला. गुढीपाडवा म्हटले की, शोभायात्रांची शोभा पाहण्याचे सुख हे निव्वळ अनुपमेयच! आज मुंबई आणि लगतच्या शहरांमधील शोभायात्रा हा देशभरात चर्चेचा विषय ठरताना दिसतो. या शोभायात्रांमध्ये अनेक शहरांतून विविध कलागुण सादर करणारे हौशी कलाकार सहभागी होत, त्यांची कला सादर करतात. आजकालच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये या कलाकारांना मिळणारी प्रसिद्धीही मोठीच. सध्या असेच एक नाव सोशल मीडियामध्ये गाजत आहे. यंदाच्या गिरगावच्या शोभायात्रेत नऊवारी साडी नेसून दुचाकीची सवारी करणाऱ्या असंख्य महिला दिसत असताना, लाल रंगाच्या नऊवारीमध्ये हाती ‘हूप’ घेऊन अंगीच्या कलागुणांचे सादरीकरण करणाऱ्या एका तरुणीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ही तरुणी होती ‘द बॉम्बे हुपर’ हे टोपणनाव धारण करणारी शिवानी राजेंद्र धोपावकर!
शिवानी आणि ‘हुलाहूप’चे नाते तसे वयाच्या पाचव्या वर्षापासूनच जडले. वयाच्या पाचव्या वष, तिच्या वाढदिवसानिमित्ताने भेट म्हणून ‘हुलाहूप’ अर्थात ती रिंग होती. याचे नेमके करायचे काय, हा प्रश्न शिवानीला पडला असतानाच, तिच्या वडिलांनी तिला मार्ग दाखवला. त्यांनी ते ‘हुलाहूप’ कंबरेत ठेवून कसे सादर करायचे, हे शिवानी यांना शिकवले. त्यानंतर सतत प्रयत्न करत राहिल्याने, शिवानी यामध्ये पारंगत झाल्या. साहजिकच यामध्ये त्यांना आनंद मिळत होताच. त्यामुळे या क्षेत्रामधील अधिक ज्ञान आत्मसात करण्याची त्यांची जिज्ञासाही जागृत झाली. पण, ही कला भारतामध्ये नवीनच होती. परिणामी, या कलेचे प्रगत शिक्षण देणाऱ्या संस्था त्यावेळी भारतामध्ये नव्हत्याच. अनेक ठिकाणी चौकशी केल्यानंतरही शिवानी यांच्या पदरी निराशाच आली.
पुढे, वय वाढत गेले आणि वाढत्या वयाबरोबर अभ्यासही. त्यामुळे साहजिकच ‘हुलाहूप’ची त्यांची आवड काहीशी मागे पडली. अभ्यासाच्या आणि करिअर घडवण्याच्या प्रयत्नांमध्ये शिवानी यांना त्यांच्या कलेचा विसर पडला. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर शिवानी यांनी पुढे त्यांनी ‘बीएस्सी आयटी’ क्षेत्रामध्ये पदवीही मिळवली. शिवानी सामान्य मध्यमवगय मराठी कुटुंबातून येत असल्याने, शिक्षणानंतर अर्थार्जनासाठी नोकरीचीच वाट धरली. पदवीमध्ये मिळालेले गुण आणि हुशारीमुळे त्यांना एका नामांकित कंपनीमध्ये नोकरीची संधी चालून आली. मात्र, पहिल्याच नोकरीमध्ये शिवानी यांचे मन रमत नव्हते. एकाच जागी बसून नोकरी करणे, त्यांना अवघड जात असे. त्यामुळे काही अन्य छंद जोपण्यासची त्यांची इच्छा प्रबळ झाली. त्यावेळी समाजमाध्यमांवर त्यांना असंख्य नृत्याचे व्हिडिओ दिसत होते. मात्र, नृत्याकडे वळण्यापेक्षा ‘हुलाहूपिंग’लाच पुढे नेण्याचा विचार शिवानी यांनी केला. त्यावेळी यासाठी आवश्यक असलेली ‘हुलाहूप’ शोधण्यासाठी शिवानी यांना कष्ट करावे लागले.
शिवानी नोकरीसाठी मुंबईहून ऐरोली पर्यंत प्रवास करायच्या. त्यामुळे त्यांना लवकर उठून जावे लागे; शिवाय कंपनीतील कामे संपवून त्यांना घरी येण्यासाठीही उशीर होत असे. मात्र, तरीही शिवानी रात्री घरी येऊन 2 वाजेपर्यंत ‘हुलाहूप’चा सराव करायच्या. यावेळी या कलेतील नवीन तंत्र शिकण्यासाठी त्यांनी युट्यूबवरूनच परदेशातील तज्ज्ञांचे व्हिडिओ पाहण्यास सुरुवात केली.
साधारणपणे पाच वर्षे नोकरी केल्यानंतर, काही तरी वेगळे करावे, असा विचार शिवानी यांच्या मनामध्ये रुंजी घालू लागला होता. त्याचवेळी भारतामध्ये ‘कोविड’ माहामारीमुळे ‘लॉकडाऊन’ची घोषणा झाली होती. त्यामुळे हा कालखंड शिवानी यांना त्यांच्या छंदाच्या विकासासाठी फारच मोठा पोषक ठरला. त्यांनी त्यांच्या कलेच्या प्रसारासाठी समाजमाध्यमांचाही अगदी खुबीने वापर केला. त्यावेळी थोड्या-बहुत प्रमाणात त्यांना समाजमाध्यमांवर प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर शिवानी यांनी मुंबईमध्येच ‘हुलाहूप’ अनेकांना शिकवण्याचे ठरवले. मात्र, सुरुवातीला त्यांना मिळालेला प्रतिसाद अत्यल्प असाच होता. शिवानी यांनी अनेक नृत्य प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांनाही संपर्क केला; मात्र, त्यांच्याकडूनही शिवानी यांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही.
शिवानी यांच्या आई मेहेंदी कलाकार असून, त्यांच्यामार्फतच शिवानी यांना ‘हुलाहूप’ शिकण्यास रस दाखवणारा विद्याथ मिळाला. त्यानंतर ही साखळी हळूहळू वाढतच गेली. मग शिवानी यांनी नरिमन पॉईंट येथे ‘संडे स्ट्रीट’ कार्यक्रमाच्या माध्यमातून या कलेचा प्रसार करण्यासही सुरुवात केली. या कार्यक्रमामुळे त्यांच्या कलेला प्रसिद्धी मिळाली. पुढे शिवानी यांनी नोकरीऐवजी या कलेच्या प्रसारासाठीच स्वतःला वाहून घेण्याचे ठरवले. त्यामुळे त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि ‘हुलाहूप’चे शिकवणी वर्ग घेण्यास सुरुवात केली.
शिवानी गेली पाच वर्षे गिरगावच्या शोभायात्रेमध्ये त्यांची कला सातत्याने सादर करत आहेत. यावष मात्र मिळालेली प्रसिद्धी गेल्या काही वर्षांपेक्षा मोठी असून, अनेकजण या कलेविषयी आपुलकीने चौकशी करत असल्याचे समाधान शिवानी व्यक्त करतात. आजवर शिवानी यांनी जवळपास एक हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना ‘हुलाहूप’ शिकवले असून, मुंबई आसपासच्या शोभायात्रांमध्येही हे कलाकार आपली कला सादर करतात. वयाच्या साडेचार वर्षांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण ही कला शिकत असल्याचे शिवानी सांगतात. शिवानी यांना या कलेचे शिक्षण देणारी एक नवीन ॲकेडमी सुरू करायची असून, देशामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘हूप’ तयार व्हावे, यासाठीदेखील त्या प्रयत्नशील आहेत. या ॲकेडमीमध्ये अत्यल्प शुल्कामध्ये लोकांनी शिक्षण घ्यावे, असे त्यांचे स्वप्न असून, त्यादृष्टीने त्या पाऊले टाकत आहेत. आपल्या छंदाला महत्त्व देत, थोडी वेगळी वाट चोखंदळणाऱ्या शिवानी धोपावकर यांना पुढील यशासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या हार्दिक शुभेच्छा!
- कौस्तुभ वीरकर
(अधिक माहितीसाठी संपर्क : 9773883237)