देशातील समतावादी, समावेशक आणि निखळ आध्यात्मिक परंपरा असलेला संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. आज महाराष्ट्राची पुरोगामी राज्याची प्रतिमा उभी करण्यात याच परंपरेचा मोठा आधार. पण, संकुचित जातीयवादी विचारांनी ग्रस्त असलेल्या शरद पवारांसारख्या नेत्यांना ही चांगली परंपरा पाहावत नाही. या संप्रदायाची बदनामी करतानाच, समाजात विघातक फुटीचा ‘वार’ करण्याचा त्यांचा हा कुटील डावच!
महाराष्ट्रातील वारकरी परंपरा ही अत्यंत उच्चकोटीची आध्यात्मिक परंपरा. काही शतकांपूर्वी महाराष्ट्रासह देशाला मोगलाईचा विळखा पडलेला असताना आणि देशातील हिंदू धर्म बुडण्याच्या काठावर असताना, तो टिकवून धरण्याचे महत्कार्य वारकरी संप्रदायाने केले. ते करताना त्यांनी मराठी समाजात सामाजिक समताही निर्माण केली होती. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या कानाकोपऱ्यातून भाविक शेकडो किमी चालत जाऊन आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेतात. या वारीत कोण महार आहे, कोण मराठा आहे, वैश्य-वाणी आहे की, आणखी कोणत्या जातीचा आहे, याची तमा कोणत्याच वारकऱ्याला नसते. वारीतील प्रत्येक वारकरी हा विठ्ठलभक्तीत लीन झालेला हरिभक्त. ते सर्व वारीत अंगाला अंग स्पर्श करीत सहभागी होतात आणि विठ्ठलनामात तल्लीन होतात. लेकुरवाळ्या विठ्ठलाचे दर्शन घेणे, इतकाच त्यामागील परमोद्देश. आज महाराष्ट्र हा पुरोगामी आणि तुलनेने जातपातमुक्त मानला जातो, त्याचे मूळ या वारकरी परंपरेतच आहे. इतकी निरपेक्ष आणि समतापूर्ण धार्मिक व्यवस्था भारतात क्वचितच पाहायला मिळते.
पण, शरद पवार यांच्यासारख्या कट्टर जातीयवादी विचारसरणीच्या नेत्याला ही परंपरा राजकीयदृष्ट्या सोयीची वाटत नाही. कारण, त्यांचे आजवरचे राजकारण हे जातिभेदाच्या पायावरच आधारित आहे. म्हणूनच, “राज्यातील वारकरी संप्रदायात 60 टक्के वारकरी हे प्रतिगामी व धर्मांध विचारांचे घुसले आहेत,” असा साक्षात्कार त्यांना नुकताच झाला. राज्य सरकारच्या महिला अधिकाऱ्यांच्या एका मासिकात लेख लिहून त्यांनी हा नवा आणि निरर्थक वाद निर्माण केला. एखादा माणूस किती विघ्नसंतोषी असतो, त्याचे हे उदाहरण म्हणावे लागेल. पण, पवारांनी या संप्रदायाबद्दल ही माहिती आणि आकडेवारी नेमकी कुठून आणली? या वारकऱ्यांनी असे काय कृत्य केले आहे की, ज्यामुळे पवार यांनी हा असा आरोप करावा? यापैकी कशाचीही उत्तरे पवार देतील, ही अपेक्षाच नाही. याचे कारण त्यांच्याकडे त्याची उत्तरे नाहीच. त्यांना यातूनही फक्त आपला राजकीय नतद्रष्टपणा दाखवून द्यायचा आहे, असेच दिसते.
तसे पाहिले, तर पवार आणि वारकऱ्यांचा काय संबंध? असा प्रश्न विचारणे अजिबात वावगे ठरणार नाही. कारण, पवारांनी आपल्या दीर्घ राजकीय कारकिदत लक्षात राहील असे वारकरी पंथाच्या हिताचे कार्य केलेले दिसत नाही. महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात ‘हज हाऊस’ बांधण्याचा निर्णय पवार-समर्थक राज्य सरकारने घेतला होता. पण, राज्यात सोडाच, वारकऱ्यांच्या वारीच्या मार्गावर एखादी धर्मशाळाही पवारांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात उभी केल्याचे ऐेकीवात नाही. आजकाल काही शहरी सुशिक्षित लोक दोन दिवस वारीत सहभागी होतात. पवार मुख्यमंत्री असतानाही कधी वारीत चार पावले चालले का? मग त्यांना वारकऱ्यांवर असे बेबंद आरोप करण्याचा अधिकार तो काय? मुळात पवार कधी स्वत:ला नास्तिक मानतात, ‘आपण देवांचेही बाप आहोत,’ असेही म्हणतात; तर कधी दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मंदिराच्या प्रवेशद्वारी जाऊन आज आपण मांसाहार केल्याने मंदिरात दर्शनाला गेलो नाही, असेही स्पष्टीकरण देतात. पण, मुळाच दर्शनच घ्यायचे नव्हते, तर मंदिराच्या दारात जाण्याचे कारणच काय? पवार यांची मुलगी व खासदार सुप्रिया सुळे यांनी तर जाहीरसभेत म्हटले होते की, “आपण संकष्टीच्या दिवशी मुद्दाम मटण खाल्ले.” शेवटी खाण तशी माती म्हणा! कोणी देवळात जावे, जाऊ नये, आस्तिक असावे अथवा नास्तिक, हा ज्याचा-त्याचा प्रश्न. पण, देवाधर्माबद्दलची भूमिका जेव्हा राजकीय सोयीनुसार बदलते, तेव्हा प्रश्न उपस्थित होणे साहजिकच. परंपरेनुसार आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात पहिली पूजा करण्याचा मान राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा असतो आणि पवार यांनी अनेकदा हा मान उपभोगला. पण, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ते ही पूजा करणार, ही गोष्ट जातीयवादी मनोवृत्तीच्या पवारांना सहन झाली नाही. तेव्हा पवारांनी त्यावरुन विनाकारण वाद निर्माण केला आणि वातावरण विखारी केले. ‘फडणवीस हे या पूजेला आले, तर वारीत साप सोडले जातील,’ असा विषारी प्रचार त्यांनी घडवून आणला. जात्याच सभ्य असलेल्या फडणवीसांनी वारीचे वातावरण बिघडू नये, म्हणून स्वत:हून या पूजेला न जाण्याचा निर्णय घेतला आणि तेव्हा तत्कालीन उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी ही पूजा केली.
पवार हे विलक्षण जातीयवादी मनोवृत्तीचे असून, त्यांचा ब्राह्मणद्वेष सर्वज्ञात. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना पवार तेव्हा हेतुत: त्यांचा ‘पंत’ असा उल्लेख करीत. मनोहर जोशी यांच्या कारकिदचा उल्लेख ते ‘पेशवाई’ असा करीत. तोही याच जातीयवादी दृष्टिकोनातून. पण, इतका उघड जातिद्वेष करूनही हे स्वत:ला ‘पुरोगामी’ आणि ‘सेक्युलर’ म्हणवून घेतात, हा क्रूर विनोदच!
मुळात इतिहास व परंपरांची मोडतोड करून लोकांची दिशाभूल करायची, हे पवारांचे जुनेच राजकारण. छत्रपती शिवाजी महाराजही त्यांच्या या जातीयवादी राजकारणातून सुटले नाहीत, तेथे अन्य नेत्यांची काय कथा! अशा राज्यातील जात्यांध संघटनांनाही पवारांनी राज्यात राजाश्रय दिला. काही वर्षांपूर्वी मराठा आरक्षण आंदोलनाचा वापरही त्यांनी फडणवीस सरकारला अडचणीत आणण्यासाठीच केला होता, हेदेखील विसरुन चालणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पवारांच्या या आरोपाला चोख आणि तर्कसंगत प्रत्युत्तर दिले. वारकरी संप्रदायाने गेली 800 वर्षे समता आणि बंधुत्वाचा विचार मांडला आहे, असे सांगून फडणवीस म्हणाले की, “भागवत धर्माची पताका हाती घेतलेल्या या संप्रदायाने नेहमीच समतेचा विचार जपला आहे. या संप्रदायात काही वर्षांपूर्वी अर्बन नक्षली विचारांचे लोक घुसले होते आणि ते विघातक आणि फाटाफुटीचा विचार मांडीत होते.” सुदैवाने अशा लोकांना या संप्रदायाने बाहेर काढले असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. ‘सुंभ जळाला, तरी त्याचा पीळ जात नाही,’ असे म्हणतात. शरद पवार हे वयोमानानुसार थकले असले, तरी राज्यातील राजकारणातील आपले उपद्रवमूल्य कायम जपण्याइतकी ऊर्जा त्यांच्यात अजूनही शिल्लक आहे, हे या ताज्या वादावरून दिसून येते. या ताज्या आरोपाद्वारे त्यांनी राज्यातीलच नव्हे, तर देशातील एक समतावादी आध्यात्मिक संप्रदाय असलेल्या वारकरी संप्रदायावर वार केला. त्याची बदनामी करण्याचा हा कुटिल डाव पवारांच्या नतद्रष्ट मनोवृत्तीचेच आणखीन एक उत्तम उदाहरण!