पावसाळ्यापूर्वी घरे रिक्त करण्याची डीआरपीची विनंती
प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करण्यासाठी रहिवाशांनी सहकार्य करावे
भाडे करार, स्थलांतर संबंधी शंकांचे निरसन करण्यासाठी हेल्पलाईन आणि सहाय्यता कक्ष सज्ज
मुंबई :(Dharavi Redevelopment)अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या धारावी पुनर्विकासाच्या प्रत्यक्ष बांधकामाला लवकरच सेक्टर -६ मधून सुरुवात होणार आहे. माटुंगा येथील रेल्वेच्या जागेवर पुनर्वसन प्रकल्पातील इमारती उभारल्या जाणार आहेत. इथे वास्तव्याला असलेल्या स्थानिक रहिवाशांना याबाबत माहिती देण्यासाठी आणि त्यांच्या सहकार्याने प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यासाठी, धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या (डीआरपी) वतीने विशेष नोटीस जारी करण्यात आली आहे.
डीआरपीच्या वतीने जारी करण्यात आलेल्या या नोटिशीमध्ये प्रामुख्याने गणेश नगर-मेघवाडी, एसव्हीपी नगर, आझाद नगर ए- बी, आझाद नगर -सी आणि कमला रामण नगर या परिसरातील रहिवाशांना घरे रिक्त करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पात लाखो धारावीकरांना 'की टू की ' (जुन्या घरातून थेट नव्या घरात) पद्धतीने घर उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यासाठीच सेक्टर ६मधील जागेचा वापर केला जाणार असल्याची माहिती या नोटिशीमध्ये देण्यात आली आहे. यावर्षीच्या पावसाळ्यापूर्वी अथवा नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी घरे रिक्त करण्याची विनंती डीआरपीच्या वतीने रहिवाशांना करण्यात आली आहे.
डीआरपीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते, सेक्टर- 6 मधील रहिवाशांनी वेळेत घरे रिक्त करून सहकार्य केल्यास, प्रत्यक्ष पुनर्विकासाला (Dharavi Redevelopment)विनाविलंब सुरूवात करता येईल आणि आसपासच्या परिसरातील रहिवाशांची गैरसोय होणार नाही. पुनर्विकासाच्या कामाला गती मिळू शकेल. एकाच वेळी विविध पातळ्यांवर प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करणे शक्य होईल. यामुळे धारावीकरांना नव्या घरांचा ताबा देखील लवकरात लवकर देता येईल" अशी प्रतिक्रिया डीआरपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
डीआरपीच्या मते, मोकळ्या जागेवर प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करता येईल, याच उद्देशाने रेल्वेची मोकळी जागा, धारावी अधिसूचित क्षेत्रात (डीएनए) मध्ये समाविष्ट करण्यात आली.
"मात्र, प्रत्यक्षात रेल्वेच्या जागेवर देखील झोपडीधारक वास्तव्याला आहेत.त्यामुळे, पुनर्विकासातील(Dharavi Redevelopment) इमारतींचे बांधकाम सुरू करण्यासाठी इथल्या रहिवाशांना घरे रिक्त करण्याची विनंती करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही."
स्थलांतराची ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी, संक्रमण शिबिर अथवा भाडे तत्वावरील घरात जाण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. यासाठी रहिवाशांना एकरकमी ५००० रुपयांचा स्थलांतर भत्ताही दिला जाणार आहे. तसेच, भाडेतत्त्वावरील घराचा पर्याय निवडणाऱ्या रहिवाशांचा देखील सहानुभूतीपूर्वक विचार केला जाणार आहे. अशा रहिवाशांना, नव्या घराचा ताबा मिळेपर्यंत त्यांच्या पात्रतेनुसार, दरवर्षी ५ % भाडेवाडीसह अर्थसहाय्य करण्यात येणार आहे.
स्थानिकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी आणि स्थलांतराच्या संपूर्ण प्रक्रियेत त्यांना सहकार्य करण्यासाठी विशेष सहाय्यता केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. भाडेकरार धोरण, कागदपत्रांची पूर्तता आणि रहिवाशांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी ४ था मजला, शालिमार इंडस्ट्रियल इस्टेट, टाटा पॉवर जवळ, टी एच कटारिया मार्ग, माटुंगा लेबर कॅम्प, मुंबई येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.(Dharavi Redevelopment)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.