सहाय्यक कलाकारांना हिनतेची वागणूक, राजेश कुमारांनी सांगितले सिनेविश्वातले वास्तव

    14-Apr-2026
Total Views |

मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टी सुरुवातीपासूनच मोठ्या प्रमाणावर स्टार-केंद्रित राहिली आहे. अनेकदा एखाद्या चित्रपटाला केवळ एखाद्या मोठ्या स्टारच्या उपस्थितीमुळेच बजेट मिळते आणि त्याचा प्रचारही त्या स्टारभोवतीच फिरत असतो. मात्र, चित्रपटाचे यश केवळ त्या एका स्टारवर अवलंबून नसते, तर त्यामध्ये काम करणाऱ्या सर्व सहाय्यक कलाकारांवरही तितकेच अवलंबून असते. ‘धुरंधर’सारख्या चित्रपटाच्या यशानंतर या गोष्टी अधोरेखित झाल्या असल्या, तरी नेहमीच तसे घडते असे नाही.

‘साराभाई वर्सेस साराभाई’मुळे विशेष ओळख मिळवलेले अभिनेते राजेश कुमार यांनी नुकत्याच एका मुलाखतीत चित्रपटसृष्टीतील वास्तव मांडले. आफताब पुंटू यांच्या यूट्यूब चॅनलवर दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, मोठ्या चित्रपटांच्या सेटवर चर्चेचा केंद्रबिंदू केवळ ४-५ लोकांपुरताच मर्यादित असतो. दिग्दर्शक, कॅमेरामन, मुख्य अभिनेता आणि लेखक यांच्यामध्येच सर्व चर्चा होत असते, तर इतर कलाकारांच्या अनुभवाला फारशी किंमत दिली जात नाही.

राजेश कुमार यांनी पुढे सांगितले की, त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत थेट काम केले नसले तरी त्यांच्या बद्दल असे ऐकले आहे की, ते सहाय्यक कलाकारांसोबतही सीनची तयारी करायला प्राधान्य देतात. मात्र, सध्याच्या अनेक स्टार्समध्ये ही पद्धत दिसून येत नाही. “अलीकडे कोणताही मुख्य अभिनेता आमच्यासोबत रिहर्सल करताना दिसत नाही. ते लेखक किंवा सहाय्यकांसोबत व्यस्त असतात. सहाय्यक कलाकारांशी संवादच होत नाही, आणि त्यामुळे चित्रपटाचं नुकसान होतं,” असे त्यांनी स्पष्ट केले.


याशिवाय, काही स्टार्स टॅलेंटेड कलाकारांबाबत असुरक्षित वाटत असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे अनेकदा सहाय्यक कलाकारांना शेवटच्या क्षणी संवाद दिले जातात, ज्यामुळे त्यांना तयारीसाठी वेळ मिळत नाही. परिणामी, त्यांचा परफॉर्मन्सही खराब होतो. एका वैयक्तिक अनुभवाबद्दल सांगताना राजेश कुमार यांनी नाव न घेता एका मोठ्या अभिनेत्याचा उल्लेख केला. “काही ‘महान स्टार्स’ असे असतात की ते तुमच्याकडे पाहतही नाहीत. ते सहाय्यकाला विचारतात, ‘हा असा का बोलतोय?’ आणि थेट टेक घेण्यावर भर देतात. मला वाटतं, आपल्याला या पद्धतीत बदल करण्याची गरज आहे,” असे त्यांनी सांगितले.

नकारात्मक अनुभवांबरोबरच त्यांनी काही सकारात्मक अनुभवही शेअर केले. ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जोधपूरमध्ये अभिनेत्री डिंपल कपाडिया यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव त्यांनी खास असल्याचे सांगितले. “त्या फक्त स्वतःपुरत्या मर्यादित राहत नाहीत, तर इतर कलाकारांशी संवाद साधून त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्या खूप प्रेरणादायी वाटतात,” असे ते म्हणाले.

राजेश कुमार यांनी ‘साराभाई वर्सेस साराभाई’नंतर ‘बा बहू और बेबी’, ‘नीली छतरी वाले’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच ‘कोटा फॅक्टरी’, ‘ये मेरी फॅमिली’ यांसारख्या वेब सिरीज आणि ‘सैयारा’, ‘निशांची’, ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ यांसारख्या चित्रपटांमधूनही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.