sahyadri tiger - तारा-चंदाच्या गळ्यातील रेडिओ काॅलर काढले; हद्दनिश्चिती, गर्भधारणी अशी बरीच कारणे

    14-Apr-2026
Total Views |

sahyadri tiger
 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात ताडोबामधून स्थानांतरित केलेल्या चंदा आणि तारा या वाघिणीच्या गळ्यातील रेडिओ कॉलर काढून टाकण्यात आल्या आहेत (sahyadri tiger). या वाघिणींनी चांदोली राष्ट्रीय उद्यानात हद्दनिश्चिती केल्याने आणि त्या गर्भवती असण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यात आला (sahyadri tiger). यापुढे या दोघी वाघिणींवर कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाईल. (sahyadri tiger)
 
 
 
ताडोबामधून सह्याद्रीत स्थानांतरित करताना चंदा आणि तारा या वाघिणींच्या गळ्यात रेडिओ-काॅलर बसविण्यात आल्या होत्या. त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी या काॅलर त्यांच्या गळ्यात बसविण्यात आल्या होत्या. मात्र, चार महिन्यानंतर या काॅलर काढण्यात आल्या आहेत. वन्यजीवांच्या गळ्यातील रेडिओ काॅलर हे ड्राॅप आॅफ या यंत्रणेद्वारे दोन पद्धतींमध्ये काढल्या जातात. यामध्ये रेडिओ काॅलरला रिमोटव्दारे कमांड देऊन वन्यजीवांच्या गळ्यातील रेडिओ काॅलर पडते किंवा सॅटलाईटद्वारे संकेत देऊन काॅलर पाडली जाते. रिमोटद्वारे कमांड देण्यासाठी प्राण्यांच्या जवळ जावे लागते. चंदा-तारा या कोअर जंगलात असल्यामुळे त्यांच्या जवळ जाऊन रिमोटद्वारे कमांड देऊन काॅलर पाडणे शक्य नव्हते. त्यामुळे सॅटेलाईटला विहित तारखेला विशिष्ट वेळेत काॅलर पाडण्याचा संकेत देण्यात आला. तो संकेत सॅटेलाईटने कॉलरच्या रिसीव्हरला पाठवला. रिसीव्हरकडून काॅलरला अनप्लग करण्यात आले आणि कॉलर गळून खाली पडली. काॅलर पडल्यानंतर सॅटेलाईटने ती पडलेल्या ठिकाणाचे लोकेशन पाठवले. त्याठिकाणी वनकर्मचाऱ्यांनी जाऊन व्हीएचएफच्या माध्यमातून काॅलरचा ठावठिकाणी शोधून ती ताब्यात घेतली. चंदाचा काॅलर हा कोण्या एका सड्यावर, तर ताराची काॅलर पाण्यात पडलेली दिसून आली.
 
 
कॉलर काढण्यामागचे कारण की, कॉलरचे आयुष्य एका वर्षाचे असते. परंतु, तिची कार्यान्वित राहण्याची क्षमता ही बॅटरीवर अवलंबून असते. तर बॅटरीची कार्यान्वित राहण्याची क्षमता ही आपण दिवसातून किती वेळा लोकेशन प्राप्त करुन घेत आहोत त्या वेळवर अवलंबून असते. सुरुवातीच्या काळामध्ये चंदा-ताराच्या सूक्ष्म निरीक्षणासाठी दिवसातून दर अर्धा तासाने तिच्या लोकेशनचे सिग्नल घेण्यात आले. त्यामुळे बॅटरी बऱ्यापैकी कार्यान्वित होऊन तिची क्षमता संपुष्टात येण्यावर पोहोचली. याशिवाय दोन्ही वाघिणींनी आपले हद्द क्षेत्र कोअर भागात निश्चित केल्यामुळे आणि त्या त्याच भागामध्ये फिरत असल्याने आता सॅटेलाईट सिग्नलद्वारे त्यांचे निरीक्षण करण्याची गरज संपली आहे. यापुढे त्यांच्यावर कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येईल. यासाठी चांदोली राष्ट्रीय उद्यानात ५०० कॅमेरा ट्रॅप लावण्यात आलेत. तसेच चंदा-तारा गर्भवती असण्याची शक्यता आहे. या काळात त्यांच्या शरीरीचे आकारमान वाढण्याची शक्यता असून त्यांच्या गळ्याचा घेराव देखील वाढू शकतो. त्यामुळे काॅलरचा कोणताही अडथळा त्यांच्या शारीरिक हालचालींमध्ये येऊ नये म्हणून काॅलर काढण्याचा निर्णय घेण्यात आला.