मुंबई बँकेची झपाट्याने वाढ; सर्वसामान्यांसाठी सेवा विस्तार

Pravin Darekar : मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला विश्वास मुंबई बँकेच्या बांद्रा शाखेचे उदघाटन प्रसंगी संवाद

Total Views |

pravin darekar (1)
मुंबई :(Pravin Darekar)मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (मुंबई बँक) सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय नागरिकांच्या गरजांना केंद्रस्थानी ठेवून वेगाने प्रगती करत असल्याचे प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष व आमदार प्रवीण दरेकर यांनी केले. मुंबई बँकेच्या बांद्रा शाखेचे उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
 
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या रामकृष्ण परमहंस मार्ग, गांधीनगर बांद्रा (पूर्व) येथील शाखेचा उदघाटन सोहळा सोमवार, दि.१३ एप्रिल रोजी आमदार अनिल परब व मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांच्या शुभहस्ते पार पडला.
 याप्रसंगी मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, मुंबई बँकेचे जेष्ठ संचालक शिवाजीराव नलावडे, नगरसेवक आणि संचालक प्रकाश दरेकर, संचालक विष्णू घुमरे, आनंदराव गोळे, संतोष दुवाळी, संचालिका शिल्पा सरपोतदार, जयश्री पांचाळ, तेजस्विनी घोसाळकर, कविता देशमुख, राज्य कंझ्युमर फेडरेशनचे अध्यक्ष विठ्ठलराव भोसले, बँकेचे कार्यकारी संचालक डी. एस. कदम, मुख्य सरव्यवस्थापक संदीप सुर्वे यांसह बँकेचे कर्मचारी, सहकारातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.(Pravin Darekar)
यावेळी बोलताना दरेकर (Pravin Darekar)म्हणाले, मुंबईतील मराठी मध्यमवर्गीय नागरिक मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास असलेल्या भागात बँकेची नवीन शाखा सुरू केली जात असून, यामुळे स्थानिकांना सोयीस्कर सेवा उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई बँकेने १६,६०० कोटी रुपयांचा टप्पा पार करत राज्यातील अग्रगण्य बँक म्हणून नावलौकिक मिळवला आहे, असेही दरेकर म्हणाले.
 
इतर बँकांप्रमाणे केवळ नफ्यावर भर न देता सामाजिक बांधिलकी जपत काम करणे हे मुंबई बँकेचे वैशिष्ट्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गिरणी कामगार, माथाडी कामगार, पोलीस कर्मचारी यांना घरांसाठी तसेच महिलांना व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
 
 
स्वयं पुनर्विकास योजना ही बँकेची महत्त्वाकांक्षी योजना असल्याचे सांगताना दरेकर म्हणाले की, आतापर्यंत सुमारे १६०० प्रस्ताव प्राप्त झाले असून ४६ संस्थांना कर्ज मंजूर करण्यात आले आहे. त्यापैकी २१ इमारती पूर्णत्वास आल्या आहेत. या योजनेमुळे मराठी नागरिकांना मुंबईबाहेर स्थलांतर करावे लागू नये, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
 
सहकार क्षेत्र राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असून सहकारी संस्थांना बळकटी देणे आवश्यक आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले. केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनीही सहकार व्यवहार सहकारातच व्हावेत, असे मत व्यक्त केले असल्याचे सांगत दरेकरांनी नागरिकांना मुंबई बँकेला सहकार्य करण्याचे आवाहन केले. मुंबईच्या जीवनमान उंचावण्यात मुंबई बँक निश्चितच महत्त्वपूर्ण योगदान देईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.(Pravin Darekar)
 
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.