Noida Protest : पगारवाढीवरून सुरु असलेल्या कामगारांच्या आंदोलनाला हिंसक वळण, उत्तर प्रदेशमध्ये नेमकं काय घडलं?

    14-Apr-2026   
Total Views |
Noida Protest

Noida Protest :
उत्तर प्रदेशच्या नोएडातील खासगी कारखान्यांमधील कर्मचारी ९ एप्रिलपासून पगारवाढीसाठी आंदोलन करत होते. सोमवारी १३ एप्रिलला अचानक या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले. हजारो कामगार हातात काठ्या घेऊन रस्त्यावरती उतरले. कामगारांचा गेल्या तीन दिवसांपासून धुमसत असलेला असंतोष उफाळून आला. संतप्त कामगारांनी कारखान्यांवर दगडफेक सुरू केली. गाड्यांची तोडफोड केली. अनेक ठिकाणी आगीच्या, जाळपोळीच्या घटना घडल्या. आंदोलन थांबवायला आलेल्या पोलिसांवरही , दगडफेक केली. काल सोमवारी हे सगळं घडल्यानंतर आज मंगळवारी सुद्धा नोएडात हीच परिस्थिती पाहायला मिळाली. आंदोलनादरम्यान कर्मचाऱ्यांनी कंपन्यांच्या कार्यपद्धतीवर उघडपणे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि अनेक धक्कादायक आरोप केले. कारखान्यांच्या मालकांचा दावा आहे की कामगारांना भडकवण्यात आले. हे संपूर्ण प्रकरण पगारवाढीच्या मागणीपुरते मर्यादित नसून त्यामागे कर्मचाऱ्यांचा दीर्घकाळापासून धुमसत असलेला संताप, असंतोष असल्याचेही काहींचे म्हणणे आहे. उत्तर प्रदेशच्या एका मंत्र्यांनी या आंदोलनाचा संबंध पाकिस्तानशी असू शकतो, असं म्हटलंय. हा विषय नेमका आहे काय? नोएडात अचानक कामगारांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलनं का सुरू केली? त्यांच्या मागण्या नक्की काय आहेत? कामगारांना भडकवण्यात आले होते का? सरकारनं याचा संबंध पाकिस्तानशी असू शकतो, असं का म्हटलंय? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तर जाणून घेऊयात... 
सगळ्यात आधी गेल्या तीन- चार दिवसांत नोएडात नेमकं काय काय घडलं? हे थोडक्यात पाहूया... तर १० एप्रिलपासूनच नोयडात शांततापूर्ण वातावरणाता कामागारांच्या आंदोलनाला सुरुवात झाली होती. १० आणि ११ एप्रिल दरम्यानच नोएडाच्या होजरी कॉम्प्लेक्स आणि सूरजपूर-दादरी रोडवर जवळपास एक हजार कामगारांनी आंदोलनाला सुरुवात केली होती. पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमुळे हा तणाव आणखी वाढला. हे प्रकरण लखनऊपर्यंत पोहोचलं. यानंतर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वतः या प्रकरणाची दखल घेऊन २४ तासांत प्रकरण सोडवण्याचे निर्देश दिले होते. १२ एप्रिलला नोएडाच्या जिल्हाधिकारी मेधा रूपम यांनी कारखान्यांच्या मालकांसोबत बैठका घेतल्या होत्या. तसेच एक कंट्रोल रूम देखील बनवण्यात आली. १३ एप्रिलला मात्र परिस्थिती हाताबाहेर गेली. सोमवारी सकाळी हजारो कामगार रस्त्यावर उतरले आणि शांततेत सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक रुप प्राप्त झालं.
सोमवारी नोयडातील सेक्टर ८१ मधील मदरसन कंपनीबाहेर ४०० कामगारांचं धरणे आंदोलन सुरु होतं. सकाळी ९ वाजता कर्मचाऱ्यांनी कारखान्याच्या मालकांविरुद्ध आणि प्रशासनाविरुद्ध घोषणाबाजी सुरू केली. याच दरम्यान कोणीतरी अफवा पसरवली की, कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या जाणार नाहीत. यानंतर जमाव संतप्त झाला. संतप्त कामगारांनी १३ ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तोडफोड आणि जाळपोळ केली. ३५० हून अधिक कारखान्यांवर दगडफेक आणि तोडफोड केली. १५० हून अधिक गाड्या फोडल्या. ५० हून अधिक गाड्या जाळल्या. आंदोलन थांबवायला आलेल्या पोलिसांवरही दगडफेक केली, त्यांच्या गाड्या उलटवल्या. यात ३० पेक्षा जास्त लोक जखमी झालेत. पोलिसांनी आतापर्यंत ६० लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. या आंदोलनामुळे सुमारे ३००० कोटी रुपयांचा व्यवसायावर परिणाम झाल्याचं बोललं जातंय. सगळ्यात म्हत्त्वाचं म्हणजे हे आंदोलन अचानक का पेटलं? यामागं नेमकी काय कारणं आहेत? कारखान्यातील कामगारांच्या रोषाचं मुख्य कारण आहे शेजारील हरियाणा राज्याच्या सरकारने घेतलेला एक निर्णय. ९ एप्रिल रोजी हरियाणा सरकारने कॅबिनेट बैठकीत कारखाना कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात ३५% वाढ करण्याचा निर्णय घेतला. १० एप्रिल रोजी याची अधिसूचना जारी केली. ही बातमी नोएडाच्या इंडस्ट्रीयल एरियामध्ये पसरताच, येथील कर्मचाऱ्यांनीही पगार वाढवण्याची मागणी करण्यास सुरुवात केली.
हरियाणा आणि उत्तरप्रदेशमध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारात किती फरक?

हरियाणामध्ये अकुशल कामगारांचे वेतन ११,२७५ वरून १५,२२० रुपये, अर्धकुशल कामगारांचे वेतन १२,४३० वरून १६,७८० रुपये आणि कुशल कामगारांचे वेतन १३,७०४ वरून १८,५०० रुपये करण्यात आले. उच्च कुशल कामगारांचे वेतन १४,३८९ वरून १९,४२५ रुपये करण्यात आले. ही वाढ सुमारे ३५ टक्के आहे. उत्तर प्रदेशमधील नोएडा येथे अकुशल कामगारांना सुमारे ११,३१३ रुपये पगार मिळत आहे. हरियाणात रोजची मजुरी ५८० ते ७५० रुपयांपर्यंत पोहोचली आहे, तर नोएडा येथे ती फक्त ४३५ ते ५३५ रुपयांच्या दरम्यान आहे.
कामगारांच्या ५ मागण्या ज्या कंपन्या मान्य करण्यास टाळाटाळ करत आहेत. कारखान्यातील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, वाढती महागाई आणि एलपीजी सिलेंडरच्या वाढत्या किमतींमध्ये सध्याच्या पगारात घर चालवणे अशक्य आहे. त्यामुळे कामगारांनी पाच मागण्या केल्यात. पहिले मुख्य कारण म्हणजे पगारवाढ- हरियाणाप्रमाणेच उत्तरप्रदेशमध्येही किमान पगारात कमीतकमी ३५% वाढ करावी. नवीन कामगार नियमांनुसार, जर कर्मचारी अतिरिक्त काम करत असेल, तर त्याला दुप्पट दराने वेतन मिळावे. म्हणजेच ओव्हरटाइमचे दुप्पट पैसे मिळावे, ही मागणी कर्मचाऱ्यांची आहे. दर महिन्याच्या १० तारखेपर्यंत पगार बँक खात्यात जमा व्हावा. सॅलरी स्लिप अनिवार्यपणे दिली जावी. तसेच आठवड्यातून एक दिवसाची साप्ताहिक सुट्टी मिळावी. जर सुट्टीच्या दिवशी काम घेतले, तर त्याचेही दुप्पट पैसे मिळावेत. तसेच बोनस थेट बँक खात्यात जमा व्हावा, मध्यस्थ किंवा ठेकेदारांमार्फत कामगाराला मिळू नये.
 
या सगळ्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे कामगार मंत्री अनिल राजभर यांनी या हिंसाचारामागे एक मोठे षडयंत्र असण्याची शक्यता वर्तवली आहे. ते म्हणालेत, प्राथमिक तपासात या घटनेचा उद्देश अस्थिरता निर्माण करणं होता, असं दिसतंय. अलिकडेच नोयडा आणि मेरठ इथून दहशतवादाचा संशय असलेल्या ४ जणांना अटक करण्यात आली. त्यांचे पाकिस्तानातल्या हँडलर्सशी संबंध असल्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत हा उत्तर प्रदेशात अस्थिरता निर्माण करण्याचा कट असू शकतो, अशी शंका आहे. यंत्रणा या संपूर्ण घटनेचा गांभिर्यानं तपास करत असल्याची त्यांनी म्हटलंय. कारखान्याच्या मालकांचा दावा आहे की कामगारांना भडकवण्यात आले आहे. तर, प्रशासन आणि कामगार यांच्यातील दरी देखील या गोंधळाचे एक कारण मानले जातंय. याचदरम्यान, सोशल मीडियावरही आंदोलनाबाबत अफवा सुरू झाल्या. कर्मचाऱ्यांच्या मृत्यूच्या आणि जखमी झाल्याच्या खोट्या बातम्या पसरवण्यात आल्या. यामुळे कर्मचारी आणखी भडकले. कोणत्याही नेतृत्वाशिवाय इतके मोठे आणि संघटित हिंसक आंदोलन कसे उभे राहिले? तपास यंत्रणा आता याची साखळी जोडण्यात गुंतल्या आहेत. तसेच उत्तर प्रदेश सरकारच्या म्हणण्याप्रमाणे खरंच या सगळ्याशी पाकिस्तानचा काही संबंध आहे का, हे पाहणं म्हत्त्वाचं असणार आहे.

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\