पुणे :(Dr. Babasaheb Ambedkar Birth Anniversary)विश्रांतवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहात जयंतीनिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान माओवादी संदर्भ असलेल्या गाण्यावर सादरीकरण झाल्याने वाद निर्माण झाला असून या प्रकरणाची पोलिसांसह संबंधित यंत्रणांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी “ओ रे बंदूक वाले” या गाण्यावर नृत्य सादर केले. संबंधित गाण्यात माओवादी कमांडर माडवी हिडमा याचे कथित गौरवगान असल्याचा आरोप व्यक्त होत असून या सादरीकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रकरण चर्चेत आले आहे. याच कार्यक्रमात ‘जंगल का राजा हिडमा’ या नावाचे नाट्यसादरीकरणही करण्यात आल्याचे समोर आले आहे. गाण्यातील काही ओळींमुळे कुख्यात माओवादी नेत्याचे उदात्तीकरण होत असल्याची चर्चा रंगली आहे.
या घटनेची दखल पुणे पोलिस, दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) तसेच समाजकल्याण विभागाने घेतली असून या प्रकरणामागे कोणत्याही नक्षलवादी विचारसरणीचा प्रभाव आहे का, तसेच विद्यार्थ्यांना चुकीच्या दिशेने वळविण्याचा कोणताही प्रयत्न झाला आहे का, याची तपासणी सुरू आहे.
समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, प्राथमिक तपासात संबंधित गाण्याची निवड विद्यार्थ्यांकडून अनवधानाने झाल्याचे आढळून आले आहे. यूट्यूबवर उपलब्ध असलेल्या गाण्यांमधून केवळ संगीत आवडल्यामुळे विद्यार्थ्यांनी ते निवडले होते. सादरीकरणासाठी कोणतीही पूर्वतयारी नव्हती आणि अल्पावधीत कार्यक्रम ठरविण्यात आला होता. कार्यक्रमाचा उद्देश पूर्णपणे सांस्कृतिक होता, असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात विविध भागांतील पारंपरिक पोशाख परिधान करून विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. संबंधित वसतिगृह परिसरात एकूण सात वसतिगृहे असून सुमारे एक हजार विद्यार्थ्यांची क्षमता आहे. परीक्षेनंतर सुमारे ६०० ते ७०० विद्यार्थी कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्यापैकी सुमारे ८५ टक्के विद्यार्थी अनुसूचित जाती प्रवर्गातील असल्याची माहिती देण्यात आली.(Dr. Babasaheb Ambedkar Birth Anniversary)
दरम्यान, या घटनेनंतर संबंधित अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना या प्रकाराचे गांभीर्य समजावून सांगत समुपदेशन केले आहे. तसेच कार्यक्रमासाठी आवश्यक अधिकृत परवानगी घेण्यात आलेली नसल्याची बाबही तपासात समोर आली असून पुढील चौकशी सुरू आहे.
सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी "चांगली धून वाटली म्हणून मडावी हिडमाचे गीत घेतले" असा खुलासा केला आहे परंतु चांगली धून असलेली बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज यांची अनेक गाणी आहेत ती न घेता पोलिसांना मारणाऱ्या मडावी हिडमाचे गीतच नेमकं कसं घ्यावे वाटले हा प्रश्न यानिमित्ताने उभा राहतो. तुषार दामगुडे (सामाजिक कार्यकर्ते) , पुणे