मुंबई : (Bihar New CM) बिहारमध्ये सत्तांतराच्या हालचालींना वेग आला आहे. पायउतार होणारे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गेल्या आठवड्यात राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. त्यानंतर आता मंगळवारी १४ एप्रिल रोजी ते आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. त्यानंतर १५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे इतर काही राष्ट्रीय स्तरावरील प्रमुख नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. (Bihar New CM)
माध्यमांमधून समोर आलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्रिपदासाठी भाजपने सम्राट चौधरी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. तर नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार हे उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. बुधवारी १५ एप्रिल रोजी, सकाळी ११ वाजता लोक भवन येथे शपथविधी सोहळा पार पडणार आहे. तिथे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना शपथ दिली जाईल. निशांत कुमार आणि विजय चौधरी यांची उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती जवळपास निश्चित आहे. (Bihar New CM)
बिहारच्या राज्यपालांच्या सचिवांनी सोमवारी सम्राट चौधरी यांची भेट घेतली. लोक भवनात होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासंदर्भात राज्यपालांच्या सचिवांनी त्यांची भेट घेतली आणि या सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या प्रमुख व्यक्तींविषयी त्यांना सविस्तर माहिती दिली. सम्राट चौधरी यांनी राज्यपालांच्या सचिवांसोबत संभाव्य मंत्र्यांच्या यादीवर चर्चा केली. यादरम्यान भाजपाने रविवारी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांची बिहारच्या विधिमंडळ पक्षाचा नवीन नेता निवडण्यासाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. सध्या हे पद सम्राट चौधरी यांच्याकडे आहे. (Bihar New CM)
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\