बसवेश्वर व आंबेडकरांच्या प्रेरणेतील नवा भारत

    14-Apr-2026
Total Views |

आज दि. 14 एप्रिल... संविधाननिर्माते, क्रांतिसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, तर 19 एप्रिल ही महात्मा बसवेश्वर यांची जयंती. त्यानिमित्ताने समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही यांसारख्या विविध पैलूंच्या आधारे या दोन्ही महापुरुषांच्या विचारांचे केलेले हे आशयगर्भ चिंतन...

दि. 14 एप्रिल हा दिवस आपल्या राष्ट्रासाठी केवळ स्मरणाचा नाही, तर आत्मपरीक्षण आणि नव्याने संकल्प करण्याचा दिवस आहे. ‌‘भारतरत्न‌’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आणि कार्याला अभिवादन करतो. पण, त्याही पलीकडे जाऊन त्यांच्या विचारांचा अर्थ आपल्या सामाजिक आणि राष्ट्रीय जीवनात पुन्हा एकदा समजून घेण्याचा प्रयत्न करतो.

मानवी प्रतिष्ठा ही अबाधित आहे, समानता ही न्यायाची पायाभूत अट आहे आणि बंधुता ही लोकशाहीची आत्मा आहे, या ज्या विचारांची मांडणी डॉ. आंबेडकरांनी केली, तीच विचारधारा आपल्याला संत महात्मा बसवेश्वरांच्या शिकवणीतही तितक्याच प्रभावीपणे आढळते. या दोन्ही महान व्यक्तिमत्त्वांकडे पाहताना एक अखंड, कालातीत विचारप्रवाह दिसतो; तो म्हणजे समता, करुणा आणि सामाजिक परिवर्तनाचा. या विचारप्रवाहाचा केंद्रबिंदू म्हणजे प्रत्येक माणूस समान आहे, ही अढळ श्रद्धा!

महात्मा बसवेश्वरांनी ज्याकाळात आपले विचार मांडले, त्याकाळात समाज कठोर जातिव्यवस्थेच्या चौकटीत अडकलेला होता. तरीही, त्यांनी आपल्या वचनांमधून स्पष्टपणे सांगितले की, माणसाचे श्रेष्ठत्व त्याच्या जन्मावर नव्हे; तर त्याच्या आचरणावर अवलंबून आहे. श्रमाला त्यांनी पूजेसमान स्थान दिले आणि ईश्वरप्राप्तीचा मार्ग सर्वांसाठी खुला असल्याचे प्रतिपादन केले. शतकांनंतर डॉ. बाबासाहेबांना ज्या सामाजिक वास्तवाला सामोरे जावे लागले, तेही याच विषमतेने ग्रासलेले होते. त्यांनी या अन्यायाला केवळ विरोधच केला नाही, तर आधुनिक लोकशाही व्यवस्थेमध्ये त्यावर उपायही सुचवला. त्यांच्या संविधाननिर्मितीतून समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता यांना संस्थात्मक स्वरूप प्राप्त झाले. बसवेश्वरांच्या वचनांमध्ये आणि आंबेडकरांच्या विचारांमध्ये एक अद्भुत सुसंवाद दिसून येतो. जरी भाषेचा आणि अभिव्यक्तीचा भिन्नपणा दिसत असला, तरी कारण एकीकडे भक्तिपूर्ण आणि काव्यात्मक शैली आहे, तर दुसरीकडे तर्कशुद्ध आणि कायदेशीर मांडणी. तरीही, या दोघांचे ध्येय एकच आहे. जातिव्यवस्थेचा ठाम विरोध, मानवी सन्मानाची स्थापना आणि परस्पर आदरावर आधारित समाजरचना ही दोघांचीही मूलभूत भूमिका आहे.

बसवेश्वरांचे ‌‘अनुभवमंटप‌’ हे जणू आध्यात्मिक लोकशाहीचे पहिले व्यासपीठ होते, जिथे सर्वांना समानतेने आपले विचार मांडण्याची संधी होती. त्याच धतवर डॉ. आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला समान हक्क आणि संधी देणारी व्यवस्था निर्माण केली. ही केवळ तात्त्विक समानता नाही, तर ती आजही लाखो लोकांच्या जीवनात जिवंत आहे. बसवेश्वरांच्या शिकवणीवर आधारलेली लिंगायत-परंपरा सामाजिक आणि आध्यात्मिक समतेचा पुरस्कार करते. हीच भावना डॉ. आंबेडकरांच्या ‌‘शिक्षण, संघटन आणि संघर्ष‌’ या त्रिसूत्रीतून अधिक बळकट होते. शिक्षणाला त्यांनी मुक्तीचे साधन मानले आणि बसवेश्वरांनीही ज्ञानाला आत्मोन्नतीचा मार्ग मानले. दोघांच्याही दृष्टीने अज्ञान हे अन्याय टिकवून ठेवणारे आहे, तर ज्ञान हे केवळ बौद्धिक नसून नैतिक जागृतीचे साधन आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या मूलभूत आणि अधिकृत लेखनात महात्मा बसवेश्वरांविषयी विस्तृतपणे स्पष्ट उल्लेख केलेला आढळत नाही. तथापि, त्यांनी समाजातील जातीय विषमता आणि श्रेणीभेदाला आव्हान देणाऱ्या पूर्वकालीन संत आणि समाजसुधारकांच्या परंपरेचा सातत्याने गौरव केला आहे. या व्यापक समतावादी विचारपरंपरेत, 12व्या शतकातील बसवेश्वरांचे आंदोलन हा समानता, मानवी प्रतिष्ठा आणि बंधुता या मूल्यांचा एक प्रभावी ‌‘रेफरन्स‌’ म्हणून अनेक अभ्यासकांकडून पाहिले जाते. हीच मूल्ये पुढे डॉ. आंबेडकरांनी संस्थात्मक स्वरूपात स्थापित केली. बसवेश्वरांनी आध्यात्मिक, सामाजिक सुधारणा चळवळीची सुरुवात केली; तर डॉ. आंबेडकरांनी या मूल्यांना पुढे नेऊन त्यांना कायदेशीर, घटनात्मक आणि लोकशाही स्वरूपात संस्थात्मक रूप दिले.

आजच्या भारतात जिथे आर्थिक प्रगतीसोबत सामाजिक विषमता अजूनही अस्तित्वात आहे, तिथे या संयुक्त वारशाचे महत्त्व अधिक दिसून येते. कारण, समानता ही केवळ कायदेशीर असून चालणार नाही, तर ती सामाजिक आणि मानसिक पातळीवरही असायला हवी; तरच समाजात परिवर्तन घडू शकते. डॉ. आंबेडकरांनी स्पष्ट केले होते की, सामाजिक लोकशाहीशिवाय राजकीय लोकशाही टिकू शकत नाही. समतेची संकल्पना येथे केवळ भेदभावाचा अभाव असणे एवढीच मर्यादित नाही, तर ती सक्रिय समावेशकतेची असायला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला आपली क्षमता पूर्णत्वाने विकसित करण्याची संधी मिळाली पाहिजे, ही त्याची अपेक्षा आहे. समाजातील प्रत्येक अडथळा दूर करून परस्पर आदर आणि सहकार्याची भावना निर्माण करणे, हीच खरी समता आहे.

राज्यसभेचा सदस्य म्हणून विविधतेने नटलेल्या समाजाचे प्रतिनिधित्व करताना या मूल्यांची जाणीव अधिक तीव्रतेने होते. डॉ. आंबेडकरांनी घडवलेल्या संविधानाने आपल्याला दिशा दिली आहे. पण, त्या तत्त्वांना जीवनात उतरवण्याची जबाबदारी आपली आहे. शासन म्हणजे केवळ कारभार नाही, तर न्यायाची अंमलबजावणी आहे. नेतृत्व म्हणजे अधिकार नव्हे, तर सेवा आहे आणि प्रगती म्हणजे केवळ आर्थिक-वाढ नव्हे, तर सर्वांच्या उन्नतीची प्रक्रिया आहे. हा विचारप्रवाह कोणत्याही एका समाजापुरता मर्यादित नाही. तो सार्वत्रिक आहे. आजच्या जगात वाढत्या विभाजनाच्या पार्श्वभूमीवर समता आणि बंधुत्वाचा संदेश अधिकच महत्त्वाचा ठरतो. तो आपल्याला संकुचित ओळखींपलीकडे जाऊन व्यापक मानवतेकडे पाहण्यास प्रेरित करतो. बसवेश्वरांची नैतिक शिकवण या प्रवासात मार्गदर्शक ठरते. म्हणूनच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या या दिवशी या महामानवाने ज्या मूल्यांसाठी आयुष्य वेचले, त्या मूल्यांना स्थान देण्याची हीच खरी श्रद्धांजली ठरेल. ही मूल्ये इतिहासापुरती मर्यादित नाहीत, ती आजही जिवंत आहेत आणि आपल्या भविष्यास आकार देत आहेत.

समतापूर्ण समाज निर्माण करण्याचा प्रवास सोपा नाही. पण, तो अशक्यही नाही. या महान परंपरेतून प्रेरणा घेत, आपण अन्यायाला आव्हान देऊ शकतो आणि समानतेवर आधारित समाज उभारू शकतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करताना आपण त्या अखंड सामाजिक जागृतीच्या परंपरेलाही अभिवादन करतो, जी बसवेश्वरांच्या वचनांतून आणि आपल्या संविधानातून प्रकट होते. ही परंपरा आपल्याला सांगते की, अन्याय स्वीकारायचा नाही, समानता प्रस्थापित करायची आहे आणि बंधुत्वाच्या आधारावर समाज घडवायचा आहे. ही जबाबदारी प्रत्येकाची आहे आणि ती पार पाडणे, हेच आपले कर्तव्य आहे.

- डॉ. अजित गोपछडे
(लेखक राज्यसभेचे खासदार आहेत.)