अजिंक्य स्वरांचा अमर प्रवास...

Total Views |

आशा भोसले यांच्याविषयी काही लिहिणे, म्हणजे केवळ एका गायिकेबद्दल लिहिणे नसून, ते एका जिद्दीच्या संघर्षाचेही स्मरण ठरावे. त्यांच्या थोरल्या भगिनी, लता मंगेशकर, यांना जेव्हा ‌‘स्वराभिषेकाची देवता‌’ मानले जात होते, तेव्हा आशाताईंनी स्वतःचे अस्तित्व अतिशय मानवी, लवचिक आणि संघर्षाच्या आगीतून तावून-सुलाखून निघून सिद्ध केले. एक असाहाय्य मुलगी ते एका कणखर स्त्रीपर्यंतचा त्यांचा हा प्रवास ‌‘सायकॉलॉजिकल ग्रिट‌’ (मानसिक कणखरता)चे एक उत्तम उदाहरण आहे.

बंडखोरी आणि सुरुवातीच्या काळातील आघात

आशाताईंच्या व्यक्तिमत्त्वाचा पायाच मुळी बंडखोरीतून रचला गेला. वयाच्या अवघ्या 16व्या वष त्यांनी गणपतराव भोसले यांच्याशी लग्न करून घर सोडले. हा केवळ एक भावनिक निर्णय नव्हता, तर स्वायत्ततेसाठी मारलेली ती एक मोठी उडी होती. मात्र, ज्या स्वातंत्र्याचा त्यांनी शोध घेतला, तेच पुढे घरगुती हिंसेचे कारण बनले. आपण कमावलेले पैसे वापरायचे स्वातंत्र्य त्यांना मिळत नसे. रेकॉर्डिंगमध्ये त्यांना स्वतःच्या बहिणीशीही संवाद साधता येत नसे. तरुण वयात शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरे जावे लागणे, कोणत्याही स्त्रीला तोडण्यासाठी पुरेसे असते;

परंतु या छळातूनच त्यांच्यातील ‌‘बंडखोर स्त्री‌’ जन्माला आली. जेव्हा त्यांना घरातून बाहेर काढले गेले, तेव्हा त्या हार मानून परतल्या नाहीत, तर आपल्या मुलांसाठी आणि भविष्यासाठी ताठ कण्याने उभ्या राहिल्या.

वडाच्या झाडाची सावली आणि भगिनींमधील स्पर्धा

आशाताईंच्या आयुष्यातील सर्वांत गुंतागुंतीचा भाग म्हणजे त्यांच्या थोरल्या भगिनीशी, लतादीदींशी असलेली व्यावसायिक स्पर्धा. त्याकाळी चित्रपटसृष्टीत लतादीदींचे स्थान एखाद्या वडाच्या झाडासारखे विस्तीर्ण होते. आशाताईंकडे सुरुवातीला केवळ दुय्यम दर्जाची गाणी येत होती. अशा वेळी न्यूनगंड निर्माण होणे स्वाभाविक होते, पण आशाताईंनी या परिस्थितीचे संधीत रूपांतर केले. त्यांना जाणीव झाली की, टिकून राहण्यासाठी केवळ ‌‘चांगले‌’ असून चालणार नाही, तर आपले वेगळेपण जपणे गरजेचे आहे. त्यांनी पाश्चात्य संगीत, लोकसंगीत आणि शास्त्रीय संगीत अशा सर्व शैलींमध्ये स्वतःला झोकून दिले आणि स्वतःचे एक स्वतंत्र सुरांचे साम्राज्य निर्माण केले.

एकाकीपणाचा प्रवास आणि पंचमदांची लाभलेली साथ

त्यांनी समाजमान्यतेची ओढ फार पूवच सोडून दिली होती. त्यामुळेच संगीतातील बदल असो किंवा स्वतःच्या आयुष्यातील संघर्षाचे सत्य, त्या कोणत्याही आवर्तनाशिवाय मांडतात. त्यांच्या या मानसिक पारदर्शकतेमुळेच त्या आजही अस्सल वाटतात. चित्रपटसृष्टीच्या चकाकीत वावरताना आशाताईंच्या नावाभोवती अनेक ‌‘गॉसिप्स‌’ आणि चर्चांचे वादळ उठले. समाजाने त्यांच्या खासगी आयुष्यावर भाष्य करण्याची एकही संधी सोडली नाही. परंतु, या सगळ्या अफवांना आणि टीकेला पुरून उरून आपला मार्ग एकट्याने चालणे, हे सोपे नसते. अशा झंझावाती आणि संघर्षाच्या आयुष्यात प्रत्येकाला एका खंबीर साथीदाराची गरज असते, जो तुमच्यातील व्यक्तीला आणि तुमच्यातील कलेला समजून घेईल.

आशाताईंच्या आयुष्यात आर. डी. बर्मन (पंचमदा) यांचे येणे, ही केवळ एक वैयक्तिक घटना नव्हती, तर ती सर्जनशील क्रांती होती. पंचमदांनी त्यांना केवळ एक पत्नी म्हणून नव्हे, तर एक स्वतंत्र कलाकार म्हणून जपले. ही भागीदारी आशाताईंच्या मानसिक स्वास्थ्यासाठी आणि कलात्मक प्रगतीसाठी संजीवनी ठरली. जेव्हा एका स्त्रीला असा जोडीदार मिळतो, जो तिच्या पंखांमधील बळ ओळखतो, तेव्हा तिचे कर्तृत्व अधिकच उजळून निघते.

संगीत : दुःखातून मुक्तीचा दिव्य मंत्र

आशाताईंचे आयुष्य अनेक वैयक्तिक दुःखांनी व्यापलेले होते. आपली मुले वर्षा आणि हेमंत यांचा मृत्यू हा कोणत्याही मातेसाठी सर्वांत मोठा धक्का असतो. अशा दुःखातून बाहेर पडणे सोपे नसते. कन्येच्या निधनानंतर आशाताई पूर्णपणे कोलमडून गेल्या होत्या. त्यांनी लोकांशी बोलणे आणि भेटणे बंद केले होते. अशा वेळी त्यांचे धाकटे बंधू आणि गुरू हृदयनाथ मंगेशकर यांनी त्यांच्या हातात तानपुरा दिला आणि त्यांना पुन्हा सुरांशी जोडले. त्यांनी आशाताईंना एका शापित गंधर्वाचा दृष्टिकोन दिला. त्यांनी समजावले की, कलाकार हे ईश्वराच्या दरबारातील अशा गंधर्वांसारखे असतात, ज्यांना पृथ्वीवर पाठवले जाते, त्यांना कलेचे वरदान मिळते, पण दुःख सोसणे ही त्यांची नियती असते. त्यांनी आशाताईंना एक अमूल्य जीवनमंत्र दिला, “सुख जगाला वाटावे, पण दुःख मात्र काळजात दाबून ठेवावे; कारण रडणाऱ्यासोबत कोणी रडत नाही, लोक हसणाऱ्यासोबतच हसतात.” भावाच्या या शब्दांनी आणि संगीताच्या सामर्थ्याने आशाताईंच्या मनातील निराशेचे ढग दूर झाले.

ताठ कणा आणि स्वाभिमान

आशाताईंनी केवळ प्रसिद्धीसाठी गाणे गायले नाही, तर आपल्या मुलांच्या अस्तित्वासाठी आणि भविष्यासाठी त्या गायल्या. हा त्यांच्या मानसिक कणखरतेचा सर्वोच्च पुरावा आहे. समाजाने आणि कुटुंबाने नाकारलेले असतानाही, एक स्त्री इतका भव्य वारसा उभा करू शकते, हे त्यांनी जगाला दाखवून दिले.त्यांच्यातील स्पष्टवक्तेपणा त्यांच्या आत्मसन्मानाचे प्रतीक आहे. तरुणपणी अभिनयाच्या ‌‘ऑफर्स‌’ नाकारताना त्या म्हणाल्या होत्या, “मी रोज आरशात पाहते आणि मला नाही वाटत की, माझा चेहरा मोठ्या पडद्यासाठी योग्य आहे. त्यामुळे मी चित्रपट करणार नाही.” ही स्वतःच्या मर्यादांची आणि शक्तीची जाणीव असणे, हेच एका सक्षम स्त्रीचे लक्षण आहे.

अन्नपूर्णा : मायेचा आणि कर्तृत्वाचा संगम

आशाताईंच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांत प्रबळ पैलू म्हणजे त्यांचे अन्नपूर्णा रूप. जागतिक कीतच्या शिखरावर असतानाही त्या आपल्या कुटुंबासाठी स्वतः स्वयंपाक करत असत. जर त्यांच्या सुरांनी जगाचा आत्मा तृप्त केला, तर त्यांच्या हाताच्या चवीने त्यांच्या कुटुंबाला आधार दिला. त्यांच्यासाठी स्वयंपाक करणे हा त्यांच्या संगीताचाच एक विस्तार होता. त्यांच्या गाण्यात आणि अन्नात एकच गोष्ट समान आहे, ती म्हणजे अस्सलपणा!

महिला सक्षमीकरणाचे उत्तम उदाहरण

आज आशा भोसले यांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे अतूट जिद्दीचा एक नमुना आहे. परिस्थिती कितीही कठीण असली, तरी माणूस आपल्या प्रतिभेने आणि मेहनतीने पुन्हा उभा राहू शकतो, हे त्यांनी सिद्ध केले. सात दशकांहून अधिक काळ स्वतःला काळाप्रमाणे बदलण्याची लवचिकता आणि वैयक्तिक दुःखाचे रूपांतर सुरांच्या माधूर्यात करण्याची कला त्यांच्याकडे आहे.

आशाताईंचा रोखठोकपणा हा केवळ एक स्वभाव नसून, तो त्यांच्या संघर्षातून कमावलेला आत्मसन्मान आहे. कणखर मातृत्व आणि जागतिक दर्जाचे व्यावसायिक कौशल्य यांचा असा अद्वितीय संगम असलेले त्यांचे व्यक्तिमत्त्व खरोखरच लोकोत्तर आहे. आज समाजात ज्या स्त्रिया विविध संकटांचा सामना करत आहेत, त्यांच्यासाठी आशाताई हे महिला सक्षमीकरणाचे (Empowered Woman) सर्वांत मोठे आणि जिवंत उदाहरण आहेत. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने हे जगाला दाखवून दिले की, तुमची परिस्थिती तुमची ओळख ठरवत नाही, तर तुमचा ताठ कणा तुमची खरी ओळख ठरवतो.

एका बाजूला मुलांसाठी अहोरात्र कष्ट करणारी आई आणि दुसऱ्या बाजूला जागतिक कीतच्या शिखरावर असलेली व्यावसायिक कलाकार अशा दोन्ही भूमिका त्यांनी ज्या ताकदीने पेलल्या, तसा मेळ होणे दुमळ. त्यांच्या स्वरातील तो अलौकिक गोडवा आणि त्यांच्या जगण्यातील ती अदम्य जिद्द पाहून मनात कृतज्ञतेची भावना दाटून येते. त्यांच्या या संघर्षाला आणि सिद्धीला अभिवादन करताना बोरकरांच्या ओळी त्यांच्याच सुमधुर आणि प्रेरणादायी सुरांतून आठवतात,

दिव्यत्वाची जेथे प्रचिती,
तेथे कर माझे जुळती!


प्रो. डॉ. शुभांगी रघुनाथ पारकर

प्रोफेसर डॉ शुभांगी रघुनाथ पारकर, या एमबीबीएस, एमडी, पीएचडी, ज्येष्ठ मनोचिकीत्सक आणि आंतरराष्ट्रीय संशोधक असून. केईएम हॉस्पिटल, मुंबई येथे माजी अधिष्ठाता होत्या. जागतिक पातळीवर संशोधन लेखनासाठी त्याना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. मनोविकार, मानसिक आरोग्य आणि सकारात्मक मानसशास्त्र या विषयांवर विविध वृत्तपत्रांत आणि दिवाळी अंकात विपुल लेखन करत जनजागृती करत असतात.