आवाज चांदण्यांचे...

    14-Apr-2026
Total Views |

ये हैं रेशमी ज़ुल़्फों का अँधेरा, ना घबराइए...
जहाँ तक महक हैं मेरे गेसुओं की, चले आइए...


1960च्या दशकात आशाताईंनी ओ. पी. नय्यर यांच्यासाठी गायलेलं हे विलक्षण प्रसिद्ध गीत. आज आशाताई देहाने आपल्यात नाहीत. तेव्हा, या गीताचा, विशेषतः या पंक्तींचा विचार करता हे लक्षात येतं की, या पंक्ती त्यांच्या गाण्यांची परिभाषा आणि व्याप्ती समजावून देतात. एकेक गाणं हे रेशमी केसांच्या गुंतवळीसारखं. ही गुंतवळ भावपूर्ण आहे, सुखावणारी आहे आणि त्याचा दरवळ आपण जिथे कुठे जाऊ, तिथंवर येणारच आहे. आशाताईंचा बंडखोर, परिवर्तनशील आणि भावविभोर संगीतविचार आपल्या आयुष्याचा स्थायीभाव होऊन राहिला, त्यामागे त्यांच्या गायनातलं वैविध्य आणि त्यामागचे अपार कष्ट आहेत.

वडील दीनानाथ मंगेशकर यांच्या अकाली निधनानंतर लतादीदी आणि आशाताईंनी पार्श्वगायनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं, ते 50च्या दशकात. यातून त्यांच्या 83 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिदचा आणि त्यातील प्रयोगशीलतेचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून, जवळजवळ सर्व पिढीच्या गीतकार-संगीतकारांसह त्यांनी अविरत काम केलं. ओ. पी. नय्यर यांच्यासाठी गायलेल्या गीतांमधून आशाताईंच्या गायनातल्या वैविध्याची पहिली चुणूक लक्षात येते. ‌‘किस्मत‌’, ‌‘सीआयडी‌’ आणि ‌‘नया दौर‌’मधील त्यांच्या गाण्यांत मिश्कील छटा दिसून येते. तोच ‌‘कश्मीर की कली‌’मधून भावोत्कट, तरीही लाजरी नायिका त्यांच्या आवाजातून लीलया उभी राहात असे. ही त्यांच्या सशक्त कारकिदची सुरुवात म्हणता येईल.

यापुढील महत्त्वाचा टप्पा सचिनदेव आणि राहुलदेव बर्मन या संगीतकारांसाठी गायलेल्या गीतांनी व्यापून टाकल्याचा दिसतो. त्यांच्या आवाजाने चिक्कार प्रयोग केले, तो काळ इथून सुरू होतो. ‌‘विरहाची छटा ते दर्जेदार कॅब्रे गीतांची माळ‌’ असा तो विस्तीर्ण कॅनव्हास. ‌‘दम मारो दम‌’, ‌‘पिया तू‌’, ‌‘हंगामा हो गया‌’ आणि अशी इतर कित्येक गाणी! ज्यांची यादी करायला घेतली, तर शेकडो पाने लागतील. स्त्रीचा आवाज सोज्वळ, प्रासादिक आणि वात्सल्यपूर्ण असावा, असा समाजविचार असतानाच्या काळात या बंडखोरीला जन्म दिला आशाताईंनी! त्यांच्यात ही बंडखोरी आणि जिद्द जात्याच होती. कला ही प्रवाही असते आणि असावी, या वचनाला त्या पुरेपूर जागल्या. हे वचन त्या आनंदाने जगल्या आणि म्हणून येणाऱ्या प्रत्येक दशकात त्यांनी नवा कॅनव्हास रंगवायला घेतला. ‌‘कॅब्रे‌’ची उत्कट धामधूम पुढे शांतावली आणि त्यांच्या गळ्यातली तेजस ऊर्जा त्यांनी खय्याम यांच्या ‌‘उमराव जान‌’मध्ये ओतली. ‌‘दिल चीज क्या हैं...‌’ असं नुसतं गुणगुणलं तरी आजूबाजूचा पुढची ओळ आपसूक पूर्ण करून जाईल, इतकं या गाण्याचं रुजणं! खरं तर अशा कैक गाण्यांचं! विशेष म्हणजे, हेलनच्या गाण्यातील मादकता उर्मिला मातोंडकरच्या गाण्यात आल्याची दिसत नाही. भावना एक असली, तरीही आशाताईंनी त्यातही देखणे भेद करून ठेवले आहेत. अर्थात, अशी कित्येक उदाहरणे देता येतील. ‌‘नय्यर ते रहमान‌’ असा विस्तीर्ण कॅनव्हास त्यांनी रंगवलाच; पण याव्यतिरिक्त भावगीतं, लावण्या, स्वतंत्र गीते आणि तामिळ, कन्नड, बंगाली आणि इतर कित्येक भाषांत अक्षरशः हजारो गाणी गाऊन ठेवली. अशक्यप्राय वाटावं असं कर्तृत्व आणि त्यामागे असणारं तितकंच खंबीर व्यक्तिमत्त्व म्हणजे आशाताई!

आशाताई मराठी भाषिक होत्या. परंतु, भारतातल्या जवळजवळ सर्वच भाषांशी त्यांचा सक्रिय संबंध आला. वडिलांच्या नाट्यगीत गायनाच्या परंपरेचा त्यांच्यावर स्वाभाविक संस्कार होता. नाट्यगीत गायनावर त्यांची पकड होती. केवळ ताना, मुरक्या आणि आलापाच्या अर्थपूर्ण, परंतु चक्रव्यूहात त्यांचं गाणं अडकून पडलं नाही. त्यांच्या गायनाची शास्त्रीय बैठक कसलेली होतीच. पण, म्हणून त्यांनी शब्दांमधली अर्थपूर्णता कुठेही हरवू दिली नाही आणि हे आशाताई व लतादीदी या दोघींच्या बाबतीत अचूकपणे खरं आहे.

कविता आणि साहित्य यांच्याशी त्यांचा विशेष बंध होता. वीर सावरकर, वीर वामनराव जोशी, शांताबाई शेळके, आरती प्रभू, सुरेश भट, ना. धों. महानोर, सुधीर मोघे आणि अगदी सौमित्र अशा कित्येक कवी-गीतकारांच्या कवितांना अधिक लौकिक प्राप्त झाला तो आशाताईंच्या आवाजामुळे! ‌‘ही वाट दूर जाते‌’मधली वाट धुरकट आहे, हे आपल्याला दिसून येतं. ‌‘अशा वलस राती‌’मधली शारीर उत्कटता, ‌‘जिवलगा‌’मधील अभिसारिकेचा पिळवटून टाकणारा सूर, ‌‘मेरा कुछ सामान‌’मधला एकाकीपणा आणि ‌‘केव्हा तरी पहाटे‌’मधलं मुक्त, परंतु अनिश्चिततेचं स्तवन असं अफाट वैविध्य इतरत्र शोधूनही सापडणार नाही! आशाताईंनी कष्टप्रद आयुष्य पाहिलं. त्यांच्या वेदनेचे सूर झाले. पण, म्हणून त्या सुरांनी वेदनेच्याच कक्षेत भ्रमण केलं, असं आशाताईंनी होऊ दिलं नाही. त्या स्वरांच्या, कवितांच्या सहवासात उत्स्फूर्त जगल्या आणि अनंतात अंतर्धान पावल्या. मुळात मानवी आवाजाशी त्यांचा संबंध नव्हताच. उरात उरलेल्या चांदण्यांचे आवाज त्यांच्या तोंडी गात होते, इतकंच!

- सौरभ सद्योजात
9404603900