वारसा बाबासाहेबांचा...

    14-Apr-2026   
Total Views |

वंचिततेवर मात करत स्वत:चे अस्तित्व घडवून, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार-वारशाने समाजहितासाठी आरोग्यक्षेत्रात सातत्यपूर्ण कार्य करणाऱ्या डॉ. राजेंद्र नानावरे यांच्याविषयी...

त्यावेळी राजेंद्र दोन वर्षांचे होते आणि त्यांच्या आईला क्षयरोग झाला. त्यातच त्यांच्या आईचे निधन झाले. क्षयरोगाने राजेंद्र यांना आईच्या मायेपासून, छायेपासून वंचित केले. तेच राजू पुढे डॉ. राजेंद्र तातू नानावरे हे शिवडीच्या क्षयरोग रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत झाले. आज ते क्षयरोगतज्ज्ञ आहेत, क्षयरोग उपचारांसंदर्भात संशोधक आहेत आणि प्राध्यापकही आहेत. त्यांनी ग्रॅण्ट मेडिकल कॉलेज येथून ‌‘एमबीबीएस‌’चे शिक्षण घेतले असून, क्षयरोग व छातीचे आजार, पर्यावरणीय क्षयरोग व श्वसनरोग, सार्वजनिक आरोग्य, हॉस्पिटल प्रशासन या विषयांवर उच्चशिक्षण प्राप्त केले आहे. तसेच ‌‘इंडियन जर्नल ऑफ ट्युबेरक्युलोसीस‌’ याचे संपादकीय व्यवस्थापक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. ते दादर टीबी क्लिनिकचे सल्लागार असून, ‌‘एमडीआर‌’/‌‘एक्सडीआर‌’ टीबी व कॅन्सर असलेल्या टीबी रुग्णांचे व्यवस्थापन करण्यात त्यांचे कौशल्य. त्यांची आजपर्यंत 35 संशोधनपत्रे प्रकाशित झाली आहेत. थोडक्यात, ज्या क्षयरोगाने राजेंद्र यांच्या आईला हिरावून नेले, त्या क्षयरोगाचे आणखीन बळी जाऊ नयेत, म्हणून डॉ. राजेंद्र अनेक दशके तन-मन-धन अर्पून कार्यरत आहेत. क्षयरोगाविरोधातले त्यांचे कार्य हे खरेच मोलाचे आहे. त्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ‌‘आयएमए बेस्ट ॲकेडिमिशियन अवॉर्ड‌’, ‌‘हॉनररी प्रोफेसर आयएमए‌’, ‌‘डब्ल्यूसीपीए इंटरनॅशनल अवॉर्ड‌’, ‌‘हॉनररी डॉक्टरेट पब्लिक हेल्थ‌’, ‌‘कोरोना वॉरियर अवॉर्ड‌’ यांसारख्या अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

तातू नानावरे हे मूळचे खटाव-सांगलीचे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर जीव ओवाळून टाकणारे आंबेडकरप्रेमी. त्यांची पत्नी द्रौपदाबाई. उभयतांना चार अपत्ये. त्यांपैकी एक राजेंद्र. तातू गोदीमध्ये काम करायचे. कामानिमित्त वरळी बीडीडी चाळीत ते वास्तव्यास होते. कष्टाचे दिवस होते; पण त्याच कष्टात जगायची सवय होती, तर द्रौपदाबाई यांचे निधन झाल्यानंतर राजेंद्र यांना गावी त्यांच्या आत्याकडे पाठवण्यात आले. पुढे तातू यांनी जनाबाई यांच्याशी लग्न केले आणि पुन्हा राजेंद्र यांना मुंबईला आणण्यात आले. तेव्हा ते सहा वर्षांचे होते.

घरी आर्थिक गरिबी असली, तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची श्रीमंती होती. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये मुलांनी शिकायलाच हवे, ही तातू यांची इच्छा. तसे राजेंद्र लहानपणापासून अभ्यासात हुशार. पण, ती घटना घडली. ते सातवी इयत्तेत शिकत असताना ‌‘मराठावाडा‌’ नामांतरणावरून वरळीमध्ये जातीय दंगल उसळली. त्यावेळी राजू शाळेतून येत होते आणि एका टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांना गंभीर इजा झाली. काही दिवस रुग्णालयात दाखल करावे लागले. समाजात जातीय दंगली घडवणाऱ्यांनी लहान बालकालाही लक्ष्य केले होते. या घटनेनंतर राजेंद्र नैराश्यात गेले. अभ्यास सोडला, शाळेला दांड्या मारू लागले. परिणामी, परीक्षेत नापास झाले. त्यावेळी त्यांच्या वडिलांना झालेले दु:ख त्यांनी पाहिले होते. कारण, आपल्या मुलाने डॉक्टर बनावे, अशी त्यांची इच्छा होती. हे सगळे पाहून राजेंद्र यांनी ठरवले की, आपण शिकायचेच. त्यानुसार, त्यांनी पूर्ण लक्ष शिक्षणावर केंद्रित केले. पुढे ‌‘एमबीबीएस‌’मध्ये प्रवेश घेतला.

1980 साल होते ते. वरळी बीडीडी चाळीत जातीय दंगल पेटली होती. परिसरात शांतता नांदावी, म्हणून पोलिसांनी संपूर्ण परिसरावर कारवाई केली. सुक्याबरोबर ओलेही जळते, या न्यायाने त्यात ‌‘एमबीबीएस‌’च्या दुसऱ्या वर्षाला शिकत असणाऱ्या राजेंद्र यांनाही पकडण्यात आले. त्या प्रकरणात राजेंद्र यांना मारहाण झाली. त्यांची काहीएक चूक नव्हती. मार खाताना त्यांना वाटत होते की, बाबासाहेबांनी किती अन्याय सहन केला, त्रास सहन केला. पण, त्यांनी उच्चशिक्षणाचे आणि समाजहिताचे ध्येय सोडले नाही. मी पण माझे उच्चशिक्षणाचे ध्येय सोडणार नाही. तिथून बाहेर पडल्यावर त्यांनी पुन्हा अभ्यासावर लक्ष केंद्रित केले.

पण, त्यावेळी वरळीत वरचेवर जातीय दंगली व्हायच्या. त्यामुळे वरळी बीडीडी चाळीत न राहता, जेजे हॉस्पिटलच्या वसतिगृहात राहायचे त्यांनी ठरवले. पण, आर्थिक चणचण होती. कधीकधी उपवासही घडे. पण, त्यावेळीही राजेंद्र मनात विचार करत की, “बाबासाहेब विदेशात एक ब्रेडच्या तुकड्यावर 18-18 तास अभ्यास करत. त्यामानाने माझा त्रास काहीच नाही.” पुढे या सगळ्या कष्टाचे चीज झाले. ते डॉक्टर झाले. क्षयरोगासंदर्भातील बहुतेक सर्वच वैद्यकीय उच्चशिक्षण त्यांनी घेतले. शिवडीच्या टीबी हॉस्पिटलमध्ये नोकरीची संधी मिळाली. त्यांनी क्षयरोगाविरोधात आघाडी उघडली. क्षयरोगाविरोधात आरोग्य शिबिरे आयोजित करणे, जागृती करणे, रुग्णांना सर्वतोपरी मदत करणे ही सगळी कामे ते करू लागले. क्षयरोगासंदर्भात त्यांनी वस्तीपातळीवर अभ्यास केला. त्यांना आयुष्यात जातीय आणि सामाजिक विषमतेचे चटके सोसावे लागले. पण, ते म्हणतात, “भूतकाळात कुणी जातीय विषमतेतून माझ्यावर अत्याचार केला आहे, तर त्याचे ओझे मी वर्तमान आणि भविष्यकाळात का वागवू? मी डॉ. बाबासाहेबांचा अनुयायी आहे. त्यामुळे देश आणि समाजाच्या हिताचाच विचार करणार! क्षयरोगाला वस्तीपातळीहून हद्दपार करायचे आहे. त्यासाठी आयुष्यभर काम करणार आहे.” आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि असे हे डॉ. आंबेडकरांचा कार्यवारसा राखणारे डॉ. राजेंद्र नानावरे. त्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा!

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.