स्वरांच्या चांदण्यात फिरताना...

    13-Apr-2026
Total Views |

सुरांची अजरामर सम्राज्ञी, अभिजात गायिका आशा भोसले यांच्या निधनाने एक चिरतरुण आवाज काल काळाच्या पडद्याआड गेला. गेल्या वर्षी आशाताईंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‌‘चांदणे स्वरांचे‌’ हा गौरवग्रंथ पुण्याच्या ‌‘उत्कर्ष प्रकाशन‌’तर्फे प्रसिद्ध करण्यात आला होता. या गौरवग्रंथात संगीत, साहित्य, राजकारण अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आशाताईंसोबतचे ऋणानुबंध उलगडले होते. शिवाय, या गौरवग्रंथात आशाताईंच्या काही मुलाखतींचाही समावेश आहे. आज आशाताईंच्या स्वरस्मृतींना उजाळा देण्यासाठी ‌‘चांदणे स्वरांचे‌’ या गौरवग्रंथाच्या संपादक रेखा चवरे-जैन यांनी शब्दबद्ध केलेले मनोगत प्रसिद्ध करीत आहोत.

चांदणे स्वरांचे‌’ हा आशाताईंवरील गौरवग्रंथ साकारताना मन अत्यानंदांच्या चांदण्यांनी हर्षित आणि प्रकाशित झालं आहे. नादब्रह्माचं हे गौरवगान आहे. नादब्रह्म आणि शब्दब्रह्म यांचा हा सुरेल संगम आहे. आशाताई ही मंगेशकर घराण्यातील स्वप्रकाशाने तेजाळलेली, तेजस्वी, देदीप्यमान, स्वतः चमकत इतरांना प्रकाशमान करणारी तेजस्वी तारका. त्यांच्या स्वरांच्या चांदण्यात रसिक न्हाहून निघाले.

‌‘गोरी गोरी पान‌’, ‌‘एका तळ्यात होती‌’, ‌‘तुझ्या गळा माझ्या गळा‌’ ही गाणी ऐकतच मी लहानाची मोठी झाले. ‌‘चांदण्यात फिरताना‌’, ‌‘येरे घना येरे घना, ‌‘नभ उतरू आलं‌’, ‌‘पान जागे फूल जागे‌’ या गाण्यांनी मन सुरेल झालं. ‌‘जिवलगा‌’ने श्रवणसोहळा काय असतो, याची अद्भुत अनुभूती दिली. ‌‘ए मेरा दिल‌’, ‌‘पिया तू अब तो आजा‌’ यांसारख्या गाण्यांनी, जीवन सुंदर झालं. ‌‘तोरा मन दरपन कहलाये‌’ यासारख्या गाण्यांनी जीवनाचं सत्य शिकवलं. अशी आशाताईंची एकूण सर्वच गाणी अख्ख्या आयुष्यावर प्रभाव टाकणारी.

आशाताईंचे बरेच कार्यक्रम मी प्रत्यक्ष बघितले. साक्षात आशाताईंचं गाण प्रत्यक्ष ऐकताना काय आनंद असतो, हे मी अनुभवलं आहे. गाणी ऐकताना अंगावर रोमांच उभे राहतात. देवताचं दर्शन आणि प्रत्यक्ष गाणं ऐकणं, हा समृद्ध करणारा अनुभव संस्मरणीय असतो. समरसून गाणाऱ्या आशाताईंची चैतन्यमय मूत सदैव डोळ्यांपुढे तरळते. स्वप्नवत वाटणारे हे क्षण खूप श्रीमंत करतात. जीवनात जे काही मिळवायचं, ते सर्व गाणं ऐकताना मिळालं आहे, अशी अद्भुत अनुभूती येते. ती गाणी कानांत-मनात गुंजत राहात मन निरंतर टवटवीत आणि प्रफुल्लित ठेवतात. आशाताईंच्या गाण्यांत बुडून जाण्याची अनुभूती घेत बसावं; विशेषतः ‌‘चांदण्यात फिरताना‌’ या गाण्यातील ‌‘श्वास तुझा मालकंस स्पर्श तुझा पारिजात‌’ या पंक्तीतील ‌‘पारिजात‌’ या शब्दाचा अतिशय तरल उच्चार साक्षात आशाताईंच्या कंठातून ऐकताना, नाजूक-सुगंधी अशा पारिजातकाचा सडा अंगावर पडण्याचं सुख लाभतं. असं प्रत्येक गाणं खूप काही देऊन जातं. हे संचित मनात जपून ठेवण्याचा आनंद काही वेगळाच! आशाताईंची गाणी समाधी अवस्थेचा प्रत्यय देतात, ते फारच विलक्षण असतं.

आशाताईंची केवळ गाणीच नाहीत, तर संपूर्ण जीवनच प्रेरणादायी आहे. जीवनात संकटे आणि दुःखे तर येतातच; पण त्यावर मात करत हसत हसत कसं जगायचं, ही शिकवण आशाताईंकडून सहज मिळते. निरंतर सर्वत्र हसतमुखाने वावरणाऱ्या चैतन्यदायी आशाताईंचा आदर्श सर्वांनी ठेवावा असाच आहे.

आशाताईंसारख्या प्रतिभावंताचं व्यक्तिमत्त्व रसिकांना कायम कुतूहल वाटण्याजोगं राहिलं आहे. त्यांचं जीवन एक अलौकिक यशोगाथा आहे. त्यांचं गाणं, गाण्यासाठी त्यांनी केलेली तपस्या, गाण्याचा ध्यास हा संशोधनाचा विषय आहे. मंगेशकर घराणं हे संगीत क्षेत्रातील इतिहास प्रस्थापित करणारं बहुमोल घराणं. या घराण्यातील आशाताई हे एक आगळं ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व. अशा व्यक्तिमत्त्वाबद्दल केलं गेलेलं लेखनही आगळं आणि ऐतिहासिक असेच आहे. संगीत आणि साहित्याच्या दृष्टीने या लेखनाचं महत्त्व अनन्यसाधारण असेच.

आशाताईंसारख्या महान व्यक्तिमत्त्वावर संगीत, साहित्य, राजकारण, समाजकारण, उद्योग, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांतील उच्च स्थानावर असलेल्या असामींच्या लेखण्या, आशाताईंच्या वाढदिवसानिमित्त आणि विशेष कारणप्रसंगी त्यांच्याबद्दलच्या आदर भावना आणि अभिमान व्यक्त करण्यासाठी सुवर्णाक्षरांनी बहरल्या. माझ्या संग्रही असलेले असे पूर्वप्रकाशित लेख आणि गौरवग्रंथासाठी नव्याने लिहून घेतलेले काही लेख असा मौलिक ऐवज, ‌‘चांदणे स्वरांचे‌’ या गौरवग्रंथात एकत्रितपणे रसिकांसमोर आणण्याची सुवर्णसंधी मला मिळाली, हे माझं परमभाग्यच! असा सुरेल दर्जेदार ग्रंथ आशाताईंच्या चाहत्यांसाठी एक सुरेख पर्वणीच आहे. पुस्तकातील लेख आशाताईंच्या विविध रूपांनी आणि गुणवैशिष्ट्यांनी बहरले आहेत. एक परिपूर्ण गायिका आणि गायिकेपलीकडे एक माणूस म्हणून, बहुआयामी अशा आशाताईंच्या विविध लोभस रूपांचं दर्शन हे लेख घडवितात.

चिरतरुण सदाबहार व्यक्तिमत्त्व, टवटवीत सुरांच्या धनी, सुरांचा झंझावात, अफाट आणि अचाट मिश्किल, चैतन्यदायी, तेजस्वी नवी आव्हानं स्वीकारणाऱ्या, संकटावर मात करत पुढे जाणाऱ्या, समर्पित ग़ृहिणी, आदर्श आई, हौशी आतिथ्यशील गृहिणी, अन्नपूर्णा, यशस्वी उद्योजिका अशी आशाताईंची स्तिमित करणारी विविध रूपं या लेखांनी दाखवली आहेत. गायिका म्हणून आशाताईंचं रूप रसिकांना ज्ञात आहे; तथापि लेखांमधून दिसलेल्या या नानाविध रूपांबद्दल रसिक अनभिज्ञ असतो. अशी अज्ञात विलोभनीय रूपं बघताना एवढे दुमळ गुण एकट्या आशाताईंमध्ये कसे एकवटले आहेत, याचं आश्चर्य वाटतं राहतं आणि आशाताई दैवी आहेत, असा साक्षात्कार होतो.

संगीत ज्यांच्या श्वासाश्वासांत भरलं आहे अशा आशाताईंनी “ज्या दिवशी माझं गाणं बंद होईल, संगीत माझ्यापासून दूर जाईल, तो दिवस मी सहनच करू शकणार नाही,” अशा हृद्य शब्दांत, त्यांचा आणि संगीताचा दृढ आणि सुंदर असा आंतरिक ऋणानुबंध उद्धृत केला आहे. “मी गायलेलं प्रत्येक गाणं मी स्वतःच्या मेरिटवर मिळविलेलं आहे,” हे शब्दच गायिका म्हणून आशाताईंचं परिपूर्ण रूप दाखवण्यास पुरेसे आहेत!

आशाताईंच्या स्वरांनी रसिकांचं जीवन समृद्ध केलं. या भावना काही लेखांतून फार सुंदरपणे मांडल्या आहेत. ‌‘आशाबाईंचा स्वर हा माझ्या आयुष्याचा प्राणवायू आहे‌’, ‌‘दैवी स्वरांनी आयुष्य भारून टाकलं आहे‌’, ‌‘गेली सहा दशकं आशाताईंनी सतत स्वतः टवटवीत ताजंतवानं राहून आणि गाऊन, चार पिढ्यांना उत्साही ठेवलं आहे,‌’ अशा शब्दांमधूनच अनेक लेखकांनी आशाताईंचं गाणं हे जीवन समृद्ध आणि आनंदी करणारा अविभाज्य घटक असल्याचे दर्शविलं. ‌‘उत्कटतेने गाण्यात प्राण फुंकत काहीतरी अद्भुत घडवणाऱ्या आणि स्वतःच गाणे होणाऱ्या आशाताई‌’ या शब्दांमध्ये, आशाताई आणि गाण्याचं सुंदर नातं लेखामध्ये सांगितलं आहे.

ध्वनिमुद्रणाच्या वेळेचे किंवा प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या वेळेचे काही सर्जनशील अनुभव काही लेखकांनी सांगितले आहेत. त्यावेळी गायिका म्हणून आशाताईंचं जे परिपूर्ण रूप दिसतं, ते थक्क करणारं आहे. रसिकांना त्यांचं असं रूप दिसणं तर दूरच, पण ते कल्पनेतही येऊ शकत नाही! प्रतिभावंतांनी आशाताईंचं कलावंत म्हणून असणारं अस्सल पण अज्ञात, दुर्लभ असं रूप दाखवून दिलं आहे.

माणूस म्हणून आशाताईंमधील श्रेष्ठत्व दाखवणारे, अनेक घटना-प्रसंग लेखकांनी सांगितले आहेत. गायिका म्हणून आशाताई महान तर आहेतच, पण माणूस म्हणूनदेखील त्या महान आहेत. हे दाखवणारे लेख आशाताईंमधल्या कित्येक मौल्यवान गुणांकडे लक्ष वेधतात, तेव्हा त्यांना सलाम केल्यावाचून राहावत नाही!

आशाताईंच्या निकटच्या सहवासात आलेल्या दिग्गजांनी, त्यांची गाण्यापलीकडची विविध मोहक रूपं दाखविली आहेत. आशाताईंच्या सहवासातील सुवर्णक्षण आणि घटना-प्रसंग यांचं चित्रण करणारे विविध लेख, त्यांच्याबद्दलच्या आदरभाव आणि कृतज्ञता भावनांनी हृद्य झाले आहेत. खूप मोठ्या अनुभव भांडारातून काही संपन्न क्षण रसिकांसमोर आणताना, अनुभवातला सच्चेपणा आणि स्वाभाविकपणातील सुंदरता प्रत्ययाला येते. कृतार्थ भावनेनी भारलेलं असं सहज-सुंदर लेखन मनाला भावते.

साक्षात अन्नपूर्णेचं रूप असणाऱ्या आशाताईंबद्दलचे अनेक प्रसंग, विविध लेखांतून आले आहेत. नवनवीन स्वादिष्ट-चविष्ट जिन्नस बनवणे आणि ते सर्वांना आग्रहाने स्वतः वाढून खाऊ घालणे हे दुमळच पण, असे विशेष गुण आशाताईंसारख्या महान कलावंताच्या ठायी आहेत याचंच आश्चर्य वाटतं. त्यांच्यातील या विलोभनीय पैलूंमुळे त्यांच्याबद्दलचा आदर दुणावतो.

आशाताईंसारख्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाशी संवाद साधणं, ही मोठीच पर्वणी असते. त्यांच्यासारख्या प्रतिभावंतांचं मन कल्पना, विचार, चिंतन, सत्य, सौंदर्य यांनी भरलेलं असतं. आशाताईंशी हृदयसंवाद साधून त्यातून जो अज्ञात, अमूर्त, अदृश्य ऐवज मुलाखतकारांनी बाहेर काढला आहे, तो फार मौलिक असाच. संगीत हा मुलाखतींचा केंद्रबिंदू तर होताच, पण याही व्यतिरिक्त अनेक विषयांवर आशाताईंनी मतं प्रकट केली आहेत, ती महत्त्वाची आहेत. पर्यावरणाबद्दल आशाताई किती जागरूक आहेत, हेही मुलाखतीतून दिसून आलं आहे. आशाताईंचा संगीतप्रवास आणि जीवनप्रवास खुद्द त्यांच्या तोंडून ऐकण्याचा आनंद मुलाखतींनी दिला. त्यांचे मौलिक विचार व संगीताच्या संदर्भातलं चिंतन रसिकांपर्यंत पोहोचविणाऱ्या या संवादात्मक लेखांना, एक वेगळंच परिमाण लाभलं आहे.

आशाताईंची लखलखीत नाममुद्रा ज्या गाण्यांवर उमटली आहे, अशा नानाविध गाण्यांचे उल्लेख विविध लेखांमधून आले आहेत. हे लेख जुन्या गाण्यांचे स्मरण करून देत आहेत. ही गाणी ज्यांच्या विस्मरणात गेली आहेत, त्यांना हे लेख त्या गाण्यांना आणि त्या गाण्यांशी संबंधित अशा आठवणींना जागृत करतील. पूव ही गाणी ज्यांनी ऐकली नसतील, अशा नवीन पिढीला ही गाणी माहीत होऊन, त्यांबद्दलची उत्सुकता निर्माण होऊन ऐकावीशी वाटतील आणि बहुमोल आनंदाचा ठेवा त्यांना सापडेल.

आशाताईंच्या गाण्यामुळे समृद्ध झाल्याचा अनुभव रसिक घेऊ शकतात, पण त्यांच्या प्रत्यक्ष सहवासाचा अनुभव रसिकांना येणं शक्य नसतं. आशाताईंच्या सहवासाचा परीसस्पर्श लाभल्यामुळे कृतार्थ झाल्याच्या विलक्षण भावनांचं चित्रण, काही लेखांनी केलं आहे. भारावून टाकणारी अनुभूती देणारे हे लेख दृश्यचित्र आणि प्रसंग डोळ्यांसमोर उभे करतात आणि आशाताईंच्या सान्निध्याचा अप्रत्यक्षपणे काही क्षण लाभ घेता आला, याचं समाधान वाचकांना मिळतं. प्रत्येक लेख खूप काही देणारा, श्रीमंत आणि समृद्ध करणारा.

लेख वाचत असताना भरगच्च काहीतरी मिळालं आहे, याची जाणीव होते आणि लेख संपू नये, अशी भावना मनात निर्माण होते. प्रत्येक लेखाबद्दल अशी अतृप्ती वाटत असताना, त्यातून मिळालेलं आंतरिक समाधान आणि आनंदही प्रत्ययास येतो.

मंगेशकर कुटुंबीयांबद्दलच्या अत्यंतिक आदर आणि कृतज्ञ भावनेतून मला एक भरजरी चमचमती वाट सापडली. या वाटेवरून प्रवास करताना ‌‘हे रत्न भारताचे लता मंगेशकर‌’, ‌‘मोगरा फुलला‌’, ‌‘स्वरसाधना‌’ या दीदींबद्दलच्या आणि ‌‘हृदयगंधर्व‌’ या पंडित हदयनाथ मंगेशकरांवरील पुस्तकांची निर्मिती झाली. माझ्या मनातील आदरभाव आणि कृतज्ञतेचं शब्दरूप असणारी ही पुस्तकं मंगेशकर कुटुंबीयांपर्यंत पोहोचवताना, मनात अपार आनंद दाटून येत असे. आशाताईंवरील कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा गौरवग्रंथ साकारतानाही तशाच अपार आनंदाने मन भरून गेलं आहे. रसिक या पुस्तकाचं स्वागत करतील,
अशी आशा आहे.

- रेखा चवरे जैन
9881900690