Bandra East Navpada : बांद्रा पूर्वमध्ये यंदा पावसाळ्यात पाणी साचणार नाही
Bandra East Navpada : कल्व्हर्ट साफसफाईमुळे मोकळा झाला मार्ग
13-Apr-2026
Total Views |
मुंबई : (Bandra East Navpada) बांद्रा पूर्वमधील नवपाडा–घास बाजार परिसरात यंदाच्या पावसाळ्यात पाणी साचण्याच्या समस्येतून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पालिकेच्या एच पूर्व विभागाने रेल्वेसोबत बैठक घेऊन कल्व्हर्ट साफसफाई तसेच पाणी निचऱ्यासाठी पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण केल्यामुळे या भागातील पाणी साचण्याची समस्या दूर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अशी माहिती मनपाचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.
बांद्रा पूर्वमधील नवपाडा आणि घास बाजार परिसरात अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या पाणी साचण्याच्या समस्येच्या समाधानासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. दरवर्षी पावसाळ्यात या भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.
तपासणीदरम्यान असे आढळून आले की पश्चिम रेल्वेच्या गेट क्रमांक १८ जवळील कल्व्हर्ट क्रमांक २२ याची अनेक वर्षे साफसफाई झाली नव्हती, त्यामुळे पाण्याचा प्रवाह अडथळलेला होता. एच/पूर्व विभागाच्या सहाय्यक आयुक्त मृदुला अंडे यांनी ही बाब गांभीर्याने घेत रेल्वे अधिकाऱ्यांशी सातत्याने पाठपुरावा केला आणि तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
सुरुवातीला रेल्वेकडून विलंब होत असल्याने अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनीही रेल्वे अधिकाऱ्यांना त्वरित कारवाईचे निर्देश दिले. त्यानंतर रेल्वेकडून मेगा ब्लॉक घेऊन कल्व्हर्ट साफसफाईचे काम पूर्ण करण्यात आले. यासोबतच महापालिका क्षेत्रातील नाल्यांचीही साफसफाई करण्यात आली असून पाण्याचा निचरा होण्यासाठीचा मार्ग पूर्णपणे मोकळा करण्यात आला आहे.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या संयुक्त प्रयत्नांमुळे येत्या पावसाळ्यात नवपाडा ( Bandra East Navpada) आणि घास बाजार परिसरात पाणी साचण्याच्या समस्येतून दिलासा मिळेल. मात्र, ही समस्या यापूर्वी पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या निदर्शनास आली नव्हती, यामुळे विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
पालिका प्रशासनाने आता सर्व विभागांमध्ये रेल्वे कल्व्हर्टची स्थिती तपासून त्यांची नियमित साफसफाई करण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून भविष्यात अशा समस्या उद्भवू नयेत.