मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग

Mumbai-Ahmedabad Bullet Train : सावली येथे दुसऱ्या टीबीएमच्या असेंब्लीला सुरुवात

Total Views |
bullet train work update
 
मुंबई : (Mumbai-Ahmedabad Bullet Train) मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत भूमिगत टनेलिंग कामाला मोठी गती मिळाली असून, घनसोलीजवळील सावली येथे दुसऱ्या टनेल बोरिंग मशीनच्या असेंब्लीला सुरुवात झाली आहे. जमिनीपासून सुमारे ३९ मीटर खोलीवर हे काम अत्यंत नियोजनबद्ध आणि सुरक्षित पद्धतीने सुरू आहे.
 
या टीबीएमद्वारे सावलीहून विक्रोळीच्या दिशेने टनेल खोदकाम करण्यात येणार आहे. आज या मशीनसाठी महत्त्वाचा १९० मेट्रिक टन वजनाचा गॅन्ट्री यशस्वीपणे खाली उतरवण्यात आला. या गॅन्ट्रीची लांबी १८ मीटर, रुंदी १० मीटर आणि उंची ९ मीटर आहे.
 
प्रकल्पात वापरल्या जाणाऱ्या दोन्ही टीबीएममध्ये एकूण चार गॅन्ट्री असतील, जे मुख्य शिल्ड असेंब्ली आणि कटरहेडशी जोडले जातील. हे गॅन्ट्री टनेलमध्ये पुढे सरकत राहून उत्खनन, वॉटरप्रूफिंग आणि टनेल लाइनिंग सेगमेंट बसवण्यास महत्त्वपूर्ण मदत करतील.
 
या प्रकल्पांतर्गत(Mumbai-Ahmedabad Bullet Train) बीकेसी ते शिळफाटा दरम्यान एकूण २१ किमी लांबीचा बोगदा बांधण्यात येते आहे. ज्यामध्ये भारतातील पहिला ७ किमी लांबीचा ठाणे खाडीखालील समुद्राखालील बोगदा समाविष्ट आहे. यापैकी ५ किमी काम न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धतीने पूर्ण झाले असून उर्वरित १६ किमी टनेल टीबीएम तंत्रज्ञानाने पूर्ण केले जणार आहे.
 
हेही वाचा :  मुंबई १०० किलोमीटरचे मेट्रो नेटवर्क तयार | Mumbai Metro | MMR | InfraMTB
 
हा बोगदा सुमारे १३.१ मीटर व्यासाचा सिंगल ट्यूब टनेल, ज्यामध्ये ट्विन ट्रॅक बसवले जातील. या बोगद्याची खोली २५ ते ५७ मीटर दरम्यान असून काही ठिकाणी ती ११४ मीटरपर्यंत जाते.
 
या प्रकल्पासाठी अत्याधुनिक टीबीएम मशीन वापरण्यात येत असून त्यांचे वजन अनुक्रमे ३०८० टन आणि ३१८४ टन आहे. या मशीन ४ आरपीएमपर्यंत वेगाने कार्य करत सुरक्षित आणि नियंत्रित उत्खनन सुनिश्चित करतात.
 
सावली शाफ्टमध्ये जागा मर्यादित असल्यामुळे TBM ची असेंब्ली अत्यंत काळजीपूर्वक नियोजन करून केली जात आहे. या टीबीएमची प्रारंभिक ड्राइव्ह जुलै २०२६ मध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे, तर मुख्य ड्राइव्ह ऑक्टोबर २०२६ पर्यंत गती घेईल. एकूणच, मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील टनेलिंग काम आता निर्णायक टप्प्यात प्रवेश करत असून, या प्रकल्पामुळे भविष्यातील हाय-स्पीड कनेक्टिव्हिटीसाठी मजबूत पायाभरणी होत आहे.
 
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.