देशाने नक्षलवादाविरोधातील एक फार मोठा लढा जिंकला. देशाला विरोध करणारी, रक्तरंजीत हिंसाचार घडवणारी सशस्त्र विचारधारा जरी सपशेल पराभूत झाली असली, तरीही शहरी नक्षलवादाच्या रुपाने त्यांचे काही वारसदार आजही समाजाला भ्रमीत करण्याचे कार्य करत आहेत. असे असले तरीही प्रदीर्घकाळ लढा देऊन, देशाने माओवादावर विजय मिळवला, हे सत्य नाकारता येणार नाही.
सशस्त्र माओवादी दहशतवादाचा मोठ्या प्रमाणावर अंत झाला असला, तरी शहरी नक्षल्यांचे जाळे आजही सक्रिय असल्याची चिंता व्यक्त केली जाते. नक्षलवाद-माओवादाच्या रक्तरंजित पंजांनी देशात कशी दहशत माजवली होती, याची साक्ष त्या प्रत्येक तारखेत आहे, ज्या दिवशी आपल्या वीर जवानांनी माओवाद्यांविरुद्ध शौर्याने लढा दिला. छत्तीसगढच्या कानाकोपऱ्यात, विशेषतः बस्तरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी, अनेक जवानांनी आपले प्राण अर्पण केले आहेत. अशाच इतिहासातील एक काळीज पिळवटून टाकणारी तारीख म्हणजे, दि. 6 एप्रिल 2010. त्या दिवशी दंतेवाडा येथे, माओवादी दहशतवाद्यांनी ‘सीआरपीएफ’च्या 62व्या बटालियनवर घात लावून हल्ला केला. सुकमा (त्यावेळी दंतेवाडा) येथील चिंतागुफा-ताडमेटला परिसरात हा भीषण हल्ला झाला. माओवाद्यांनी क्रौर्याची परिसीमा गाठली होती; मात्र तरीही आपल्या जवानांचे मनोबल ढळले नाही. या चकमकीत 76 जवानांनी सर्वोच्च बलिदान दिले.
‘सीआरपीएफ’ने या वीरांना स्मरून म्हटले होते की,“आमचे 75 शूर जवान सहा तास चाललेल्या भीषण संघर्षात ठामपणे लढले. त्यांनी सात माओवाद्यांना ठार केले आणि आठजणांना जखमी केले. त्यानंतरच त्यांनी देशासाठी आपले प्राण अर्पण केले. 500 हून अधिक जड शस्त्रांनी सज्ज माओवाद्यांनी आणि शेकडो ‘आयईडीं’नी वेढलेल्या परिस्थितीतही, त्यांनी अद्वितीय शौर्य दाखवले. अनेक ठिकाणी जिथे जवान आसरा घेऊ शकले असते, तिथे ‘आयईडी’ लावण्यात आले होते. काही वीरांनी आपल्या सहकाऱ्यांचे प्राण वाचवण्यासाठी आणि शत्रूला निष्प्रभ करण्यासाठी, स्वतः ग्रेनेडवर झोपून सर्वोच्च बलिदान दिले. अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी आपली शस्त्रे शत्रूच्या हाती लागू नयेत, म्हणून ती स्वतःखाली लपवून ठेवली.”
या अमानुष हल्ल्याचा मुख्य सूत्रधार माडवी हिडमा हा होता. या घटनेनंतर ‘जेएनयू’मध्ये काही तथाकथित ‘शहरी नक्षल’ समर्थकांनी आनंद व्यक्त केल्याचेही समोर आले. त्यावेळी दंतेवाडा परिसरात ‘डीआयजी’ म्हणून कार्यरत असलेले आयपीएस अधिकारी कल्लुरी यांनी म्हटले होते की, “ताडमेटला येथे 76 जवानांनी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाचा काही विद्यार्थ्यांनी ‘जेएनयू’मध्ये उत्सव साजरा केल्याचे समजल्यावर, मला अतिशय दुःख झाले.”
कांकेरसह विविध भागांत तथाकथित ‘शहरी नक्षल’समर्थकांनीही, या घटनेबद्दल आनंद व्यक्त केल्याचेही सांगितले गेले. घटनेनंतर तब्बल 19 दिवस अरुंधती रॉय दंतेवाडा येथे थांबल्या होत्या आणि त्यांनी एक अहवालदेखील तयार केला, जो सैन्य, प्रशासन आणि छत्तीसगढ सरकारच्या विरोधात असल्याचे म्हटले जाते. आता विचार करा एका बाजूला आपल्या 76 जवानांनी सर्वोच्च बलिदान दिले, तर दुसऱ्या बाजूला काहीजण त्याकडे ‘विजय’ म्हणून पाहात होते. भारताविरुद्ध छेडलेल्या सशस्त्र संघर्षातील या घटनेवर आनंद व्यक्त केला जात होता. सैन्य, पोलीस आणि शासनाविरुद्ध प्रोपेगंडा स्वरूपाची मांडणी केली जात होती; जवानांना खलनायक ठरवले जात होते, तर माओवादी दहशतवाद्यांना समर्थन दिले जात होते. कारण, काही ’शहरी नक्षल’ समर्थकांसाठी माओवाद्यांनी जवानांची हत्या करणे, हेच ‘यश’ खरे होते!
हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की, ’शहरी नक्षल’ आणि सशस्त्र माओवादी यांच्यात विशेष फरक नसल्याचे मानले जाते. दोघेही देशाच्या संविधानाला मानत नाहीत आणि राष्ट्राप्रती त्यांची निष्ठाही नाही, अशी टीका केली जाते. त्यांचा उद्देश भारतात हिंसा पसरवणे आणि ‘जल-जंगल-जमीन’च्या नावाखाली संघर्ष उभा करणे, हाच असल्याचा आरोप वारंवार केला जातो. यामुळेच आदिवासी व वनवासी समाजालाही मोठेच नुकसान सहन करावे लागले आहे. शहरी नक्षल स्वतः हत्यार उचलत नाहीत; मात्र गरीब आणि वंचितांना पुढे करून आपली विचारसरणी पसरवण्याचा प्रयत्न करतात, असेही म्हटले जाते.
आपल्या शूर जवानांनी देशाच्या सुरक्षेसाठी दाखवलेले अदम्य साहस, खरोखरच प्रेरणादायी आहे. त्यांनी अनेक वर्षे माओवाद्यांच्या अड्ड्यांमध्ये घुसून त्यांचा सामना केला आणि त्यांना मोठा झटकाही दिला. आज छत्तीसगढ या रक्तरंजित दहशतीतून बाहेर पडला आहे, तो या वीरांच्या बलिदानामुळेच. सशस्त्र माओवादी दहशतवाद मोठ्या प्रमाणावर कमकुवत झाला असला, तरी अर्बन नक्षलवाद्यांची भूमिका संपलेली नाही. ते आजही विविध प्रकारे अशा विचारसरणीचे संरक्षण करत असल्याची, चिंता व्यक्त केली जात आहे.
शहरी नक्षलवादी नक्षलवादाच्या समर्थनार्थ साहित्य लिहिणे, मुलाखती देणे, संपादकीय लेखन करणे, नाट्यप्रयोग सादर करणे, डफली वाजवत आंदोलने करणे अशा विविध माध्यमांतून सक्रिय ते दिसत होते. मानवाधिकारांच्या नावाखाली ते माओवादी हिंसेचे समर्थन करतात. मात्र, माओवादी दहशतवाद्यांनी निर्दोषांची हत्या केली की, त्याच मानवाधिकारांबाबत मौन बाळगतात. बस्तरमधील जनजातीय समाजावर माओवाद्यांनी केलेल्या अत्याचारांकडे त्यांनी दुर्लक्ष केले. स्थानिक आदिवासी युवक, महिला आणि लहान मुलांना जबरदस्तीने उचलून, त्यांच्याच हातात शस्त्रे देऊन, रक्तपाताच्या मार्गावर ढकलण्यात आले होते. ज्या मुलांच्या हातात पुस्तके असायला हवी होती, त्या मुलांना बंदूक उचलण्यास भाग पाडले गेले. त्यांचे बालपण, कुटुंब आणि सामाजिक आयुष्यच हिरावून घेतले गेले; बारूदी वातावरणात जगण्यास त्यांना भाग पाडले गेले. निष्पाप आणि साध्या स्वभावाच्या जनजातीय समाजाला, त्यांच्या स्वतःच्या लोकांविरुद्ध उभे केले गेले, हा एक अमानुष अपराधच होता. अशा कृत्यांबद्दल कोणतीही सहानुभूती दाखवता येऊ शकते का? हाच गंभीर प्रश्न आहे.
आज काही शहरी नक्षल समर्थक माडवी हिडमाला नायक ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत; त्याच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत आहेत. मात्र, हे विसरता कामा नये की, 76 जवानांच्या हत्येचा तोच मुख्य सूत्रधार होता. त्याने असंख्य कुटुंबे उद्ध्वस्त केली; अनेक निर्दोषांना गोळ्या घालून ठार केले. अशा रक्तरंजित इतिहास असलेल्या व्यक्तीची तुलना, महान क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांच्याशी करण्याचा प्रयत्न हा अत्यंत गंभीर आणि निंदनीयच आहे. हा आपल्या आदर्शांचा, संस्कृतीचा आणि जनजातीय समाजाचाही घोर अपमान आहे.
समाजाच्या कल्याणाची खरी चिंता असेल, तर कोणतेही ध्येय अशक्य नाही. आपल्या सुरक्षाबलांनी देशाच्या रक्षणासाठी वेळोवेळी दिलेले सर्वोच्च बलिदान हे आपल्या अभिमानाचे प्रतीक आहे आणि त्याबद्दल संपूर्ण राष्ट्र त्यांचे कृतज्ञ आहे. आज छत्तीसगढ आणि बस्तर नव्या आशेने पुढे वाटचाल करत आहेत. बस्तरची माती आणि तिची संतती आता विकास, शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या दिशेने नवे स्वप्न उभारत आहेत. अभावग्रस्तांपर्यंत संसाधने पोहोचत आहेत. वीर गुंडाधुर, भगवान बिरसा मुंडा आणि दंतेश्वरी मातांच्या वारशाची जाणीव ठेवत, बस्तरचे लोक सृजनाचा नवा अध्याय लिहित आहेत, प्रकृतीच्या सान्निध्यात शांतता आणि समृद्धीची नवी चित्रे रंगवत आहेत.
- कृष्णमुरारी त्रिपाठी अटल
(लेखक छत्तीसगढ येथे साहित्यिक, स्तंभलेखक आणि पत्रकार आहेत.)
(अनुवाद : ओंकार मुळ्ये)