आशाताईंना अखेरचा निरोप देण्यासाठी कलाविश्वातून अनेकांची हजेरी

    13-Apr-2026
Total Views |

मुंबई : सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचे वयाच्या ९२व्या वर्षी निधन झाले असून त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपट तसेच संगीत क्षेत्रातील एक सुवर्णयुग संपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. ११ एप्रिल २०२६ रोजी अचानक प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईतील Breach Candy Hospital येथे दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली होती, मात्र त्यांची नात जनाई भोसले हिने नंतर स्पष्ट केले की, आशा ताईंना छातीमध्ये संसर्ग झाला होता. उपचार सुरू असतानाच १२ एप्रिल रोजी त्यांचे मल्टिपल ऑर्गन फेल्युअरमुळे निधन झाले.

आशा भोसले यांचा जन्म १९३३ साली झाला. वडिलांच्या निधनानंतर केवळ ९व्या वर्षी त्यांनी गायनाची सुरुवात केली आणि पुढे त्या भारतीय संगीतसृष्टीतील एक अजरामर आवाज बनल्या. त्यांच्या नावावर दोन वेळा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली असून ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय गायिका ठरल्या. त्यांच्या निधनानंतर अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. तर आज १३ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी अनेक कलाकार, राजकिय नेते आणि अन्य मान्यवरांनी हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे.

अभिनेता नील नितीन मुकेश वडील नितीन मुकेश यांच्यासह अंतिम दर्शनासाठी काही वेळापूर्वीच पोहोचला आहे. नितीन मुकेश यांचे वडील मुकेश यांनी आशा भोसले यांच्यासोबत अनेक गाजलेली गाणी गायली होती. आशा ताईंना आईसमान मानणाऱ्या नितीन मुकेश यांनी भावुक होत, “मी माझी आई गमावली आहे,” अशी भावना व्यक्त केली.
गायक जावेद अली यांनीही त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करत श्रद्धांजली वाहिली. तसेच क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हे पत्नी अंजली तेंडुलकर यांच्यासह अंतिम दर्शनासाठी आले होते. आशा ताईंच्या कुटुंबीयांशी बोलताना ते भावुक झाल्याचे दिसून आले.


संगीतकार ए. आर. रहमान यांनीही आशा भोसले यांना अखेरचा निरोप दिला. ९० आणि २००० च्या दशकात या दोघांनी ‘रंगीला’, ‘राधा कैसे ना जले’, ‘तन्हा तन्हा’ यांसारखी अनेक सुपरहिट गाणी दिली होती. त्यांची जोडी विशेष गाजली होती. याशिवाय अभिनेता रितेश देशमुख, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, हेलेन, राकेश रोशन, अनुराधा पौडवाल असे अनेकजन हजेरी लावत आहेत.

१२ एप्रिलच्या रात्री आशा भोसले यांचे पार्थिव त्यांच्या लोअर परेल येथील निवासस्थानी आणण्यात आले. त्यानंतर अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी अंतिम दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. परिसरात शोककळा पसरल्याचे चित्र पाहायला मिळाले.

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ एप्रिल रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत त्यांच्या लोअर परेल येथील निवासस्थानी अंतिम दर्शन ठेवण्यात आले होते. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता शिवाजी पार्क येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आशा भोसले यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली असून, त्यांच्या अमूल्य योगदानाची आठवण कायम राहील. त्यांच्या सुरांचा वारसा पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.