मुंबई : प्रसिद्ध गायिका आशा भोसले आता आपल्यात राहिलेल्या नाहीत. १२ एप्रिल रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेत संगीतविश्वाला कायमचा निरोप दिला. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये त्यांची जिवलग मैत्रीण आणि ज्येष्ठ अभिनेत्री हेलेन हेदेखील दिसून आल्या. आशा भोसले आणि हेलेन यांची मैत्री ही खूपच घट्ट होती. त्यांच्या मैत्रीचे अनेक किस्से आजही चर्चेत आहेत. एकदा आशा ताईंनी स्वतः हा खास किस्सा सांगितला होता. त्या India's Best Dancer Season 2 या कार्यक्रमात पाहुण्या म्हणून गेल्या होत्या, त्यावेळी त्यांनी हेलेनबद्दलची एक आठवण शेअर केली होती.
आशा ताई सांगतात, “माझ्या कारकिर्दीतली अनेक हिट गाणी मी हेलेनसाठी गायली आहेत. ती माझ्या अत्यंत जवळच्या मैत्रिणींमधील एक आहे. मला आजही आठवतं, जेव्हा जेव्हा मी तिच्यासाठी गाणं गाणार असायचे, तेव्हा आधी तिचा मला फोन यायचा. ती म्हणायची, ‘आशा जी, मला कळलं आहे की तुम्ही माझं गाणं गाणार आहात, ते खूप छान गा. त्यासाठी मी तुम्हाला चॉकलेट देईन.’” अशा गोड आठवणी आशा ताईंनी शेअर केल्या होत्या. आज आशा भोसले यांच्या निधनानंतर हेलेन आपल्या मैत्रिणीला अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचल्या. यावेळी त्या आशा ताईंच्या दुःखी कुटुंबीयांना धीर देताना दिसून आल्या.
गायिका म्हणून आशा भोसले यांनी हेलेनवर चित्रित झालेल्या अनेक गाजलेल्या गाण्यांना आपला सुरेल आवाज दिला. त्यामध्ये ‘तीसरी मंजिल’मधील ओ हसीना जुल्फों वाली, आजा आजा मैं हूं प्यार तेरा, ‘यह रात फिर न आएगी’मधील हुजूर-ए-वाला, ‘फर्ज’मधील बार बार दिन ये आए, ‘तलाश’मधील मेरा क्या सनम, ‘कारवां’मधील पिया तू अब तो आजा, ‘अनामिका’मधील आज की रात कोई आने को है आणि ‘हम तुम और वो’मधील हुस्न अगर जिद पे आ जाए यांसारखी अनेक लोकप्रिय गाणी आजही चाहत्यांच्या मनात घर करून आहेत. आशा भोसले आणि हेलेन यांची मैत्री, तसेच त्यांच्या कलात्मक सहकार्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक अजरामर गाणी लाभली. त्यांच्या या आठवणी कायमच चाहत्यांच्या मनात जिवंत राहतील.