इतिहासाचे भविष्य

    13-Apr-2026   
Total Views |

मानवी संस्कृतीचा चेहरामोहरा बदलण्याची ताकद दोन विद्याशाखांमध्ये आहे. पहिले म्हणजे विज्ञान आणि दुसरी म्हणजे इतिहास! इतिहास या विद्याशाखेचा विचार करताना, बऱ्याचदा केवळ विशिष्ट घटना आणि त्यासंदर्भातील प्रवाह यांवरच भाष्य केले जाते. मात्र, बरेचदा यापेक्षा वस्तुस्थिती पूर्णपणे वेगळी असते. वर्तमानातील संस्कृतीवर ऐतिहासिक घटनांचा, व्यक्तिरेखांचा, जीवनपद्धतीचा प्रभाव असतो. ‌‘व्यक्ती ते समष्टी‌’ अशा सर्वंकष प्रभावाखालीच आपला समाज जगतो. इतिहासाचे सम्यक्‌‍ आकलन नसेल, तर कुठलेही राष्ट्र प्रगती करू शकत नाही. यामध्ये इतिहासकारांची, संशोधकांची भूमिका महत्त्वाची अशीच. म्हणूनच कदाचित, प्रख्यात इतिहासकार एडवर्ड हॅलेट कार एके ठिकाणी असे म्हणाले होते की, “मांडलेल्या वस्तुस्थितीचा अभ्यास करण्यापूर्वी, मांडणाऱ्या इतिहासकाराचा अभ्यास करावा!” आज आपल्या भोवतालचा परिवर्तनाचा वेग प्रचंड वाढला असताना, इतिहास दररोज आपल्यासमोर नवीन आव्हानं घेऊन उभा ठाकत आहे.

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे, सगळ्यांचेच जीवन बदलून गेले आहे. कलेच्या क्षेत्रातही आज याचा वापर वाढला आहे. ‌‘एआय‌’च्या माध्यमातून तयार केलेले व्हिडिओ, गाणी यांचादेखील समाजमाध्यमांवर सध्या बोलबाला आहे. ऐतिहासिक पात्रांना जिवंत करून, आपल्याला हवी तशी माहिती त्यांच्याकडून वदवून घेणारे महाभागही कमी नाहीत. या सगळ्या गोष्टी मनोरंजनाच्या कक्षेपुरत्या मर्यादित असल्या, तरी खऱ्या अर्थाने वारसा आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी ‌‘एआय‌’ तंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. उदाहरणार्थ, एखाद्या जुन्या चित्राचे विलेषण करताना, ‌‘एआय‌’मधील ‌‘इमेज प्रोसेसिंग‌’ अल्गोरिदम क्ष-किरण आणि ‌‘इन्फ्रारेड डेटा‌’चा वापर करून, चित्राच्या मूळ थराची पुनर्रचना करतात. यालाच ‌‘डिजिटल रीस्टोरेशन‌’ म्हणतात. यामुळे मूळ पेंटिंगला स्पर्श न करता, चित्रकाराने सुरुवातीला काय काढले होते, याचे हुबेहूब डिजिटल चित्र ‌‘एआय‌’ तयार करून देते. मशीन लर्निंग मॉडेल्सना जुन्या काळातील रंगांच्या डेटाबेसचे प्रशिक्षण दिलेले असते. त्यामुळे रंगसंगतीमधील फरक ‌‘एआय‌’ अगदी अचूकपणे सांगतो. याच्याही पुढे जाऊन, ‌‘एआय‌’ चित्रांमध्ये वगकरण करून, त्यातील सूक्ष्म नोंदी आपल्याला सांगते. ऐतिहासिक कागदपत्रं, दस्तऐवज, काही विशिष्ट लिपींमधील कागदपत्रं यांचे मोठ्या प्रमाणत जतन-संवर्धन सुरू असते. त्यातूनच येणाऱ्या काळात इतिहास संशोधनाला नवी दिशा मिळेल, यात शंका नाही.

मात्र दुसऱ्या बाजूला कृत्रिम बुद्धिमत्ता आपला इतिहासाकडे आणि समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकते. काही दिवसांपूव ‌‘पीएनएएस नेक्सस‌’ येथे प्रकाशित करण्यात आलेल्या एका अभ्यास अहवालानुसार, जेव्हा लोक ऐतिहासिक तथ्यांसाठी चॅटबॉट्सवर अवलंबून राहतात, तेव्हा त्यांच्या राजकीय विचारसरणीवर परिणाम होतो. संशोधकांनी या अभ्यासामध्ये सहभागी झालेल्या लोकांना काही ऐतिहासिक आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील विषयांवर प्रश्न विचारण्यास सांगितले होते. यामध्ये ‌‘एआय‌’ने दिलेल्या उत्तरांचा अभ्यास करण्यात आला. ‌‘एआय‌’ जेव्हा एखाद्या ऐतिहासिक घटनेचे विलेषण करते, तेव्हा त्यातील भाषेचा कल वापरकर्त्याच्या विचारांवर प्रभाव पाडत असल्याचे दिसून आले.

‌‘एआय‌’ माहिती देताना काही तथ्ये ठळकपणे मांडते, तर काही जाणीवपूर्वक किंवा तांत्रिक मर्यादांमुळे वगळते. यामुळे वाचकाला पूर्ण सत्य समजल्याचा भास होतो. अभ्यासात असे दिसून आले की, वापरकर्त्यांनी वारंवार ‌‘एआय‌’ वापरल्यास त्यांच्या मूळ राजकीय भूमिकांमध्ये बदल होऊन, त्या ‌‘एआय‌’ने मांडलेल्या भूमिकेकडे झुकू लागतात. याला संशोधकांनी ‌‘अल्गोरिदमिक पर्स्युएशन‌’ असे म्हटले आहे. ऐतिहासिक घटनांकडे पाहण्याचे अनेक दृष्टिकोन असतात मात्र, ‌‘एआय‌’ अनेकदा एका सरासरी किंवा मुख्य प्रवाहातील दृष्टिकोनातूनच माहिती देते. जेव्हा वापरकर्ते यालाच अंतिम सत्य मानतात, तेव्हा इतिहास समजून घेण्याची त्यांची क्षमता मर्यादित होते. या पार्श्वभूमीवर येणाऱ्या काळात इतिहासकारांची भूमिका किती महत्त्वाची आहे, हे वेगळे सांगायला नको. अशा वेळी “इतिहासकाराचे काम हे भूतकाळावर प्रेम करणे किंवा त्यापासून स्वतःची सुटका करून घेणे नसून, वर्तमानकाळाच्या आकलनाची गुरूकिल्ली म्हणून भूतकाळावर प्रभुत्व मिळवणे आणि तो समजून घेणे, हे आहे,” हे एडवर्ड हॅलेट कारचं वाक्य महत्त्वाचं ठरतं.

मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.