Ashwini Bhide : महापालिकेच्या मासिक आढावा बैठकींचे पुनरागमन ‘बॅक टू बेसिक्स’वर भर : अश्विनी भिडे
13-Apr-2026
Total Views |
मुंबई : (Ashwini Bhide) मनपाच्या नव्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या एका आठवड्यातच मनपाच्या मासिक आढावा बैठका पुन्हा सुरू केल्या आहेत. कोविडनंतर ही पद्धत जवळपास बंद पडली होती. आता दर शनिवारी होणाऱ्या या बैठकीत नवकल्पनांचा आढावा घेतला जाईल तसेच घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवले जाईल.
११ एप्रिल रोजी झालेल्या पहिल्या आढावा बैठकीत भिडे यांनी मूलभूत नागरी सेवांना अधिक बळकटी देण्यावर भर देत “बॅक टू बेसिक्स” या दृष्टिकोनानुसार काम करण्याचे निर्देश दिले. त्यांनी सांगितले की, पालिकेचे प्रमुख कार्य नागरिकांना सेवा पुरवणे आहे; मात्र आता प्रशासनाने यापुढे जाऊन त्या सेवांचा दर्जाही उंचावणे आवश्यक आहे. (Ashwini Bhide)
शहरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या रस्ते कामांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी रेल्वेच्या धर्तीवर “मॉडेल ऑपरेशनल नॉर्म्स” तयार करण्याचे निर्देश दिले, ज्यामुळे रस्त्यांची दीर्घकालीन मजबुती, उत्तम वाहतूक व्यवस्थापन आणि देखभाल सुनिश्चित होईल. या निकषांमध्ये पुढील १० वर्षांतील वाहतूक गरजा आणि दुरुस्ती कामांचाही समावेश करण्यात येणार आहे. ७० टक्क्यांहून अधिक पूर्ण झालेली सर्व रस्ते कामे १ जूनपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले, जेणेकरून पावसाळ्यात वाहतुकीवर परिणाम होऊ नये. (Ashwini Bhide)
गेल्या तीन वर्षांत खड्ड्यांची संख्या आणि दुरुस्तीवरील खर्चात लक्षणीय घट झाल्याचे त्यांनी नमूद केले. २०२३-२४ मध्ये खड्डे दुरुस्तीसाठी २०२ कोटी रुपये खर्च झाले होते, ते २०२४-२५ मध्ये १५६ कोटींवर आणि २०२५-२६ मध्ये ८९ कोटींवर आले. चालू वर्षात हा खर्च सुमारे ४४ कोटी रुपये राहण्याचा अंदाज आहे. (Ashwini Bhide)
नगरसेवकांशी संबंध दृढ करा, समन्वय वाढवा
भिडे (Ashwini Bhide) यांनी लोकप्रतिनिधींशी सातत्यपूर्ण संवाद ठेवण्यावर भर दिला आणि अधिकाऱ्यांना नाला सफाई, स्वच्छता आणि रस्ते प्रकल्पांची प्रगती याबाबत नियमित माहिती देण्याचे निर्देश दिले. पावसाळ्यापूर्व तयारीचा आढावा घेताना त्यांनी पाणी साचणाऱ्या ठिकाणांसाठी दीर्घकालीन उपाययोजना तयार करण्यास सांगितले. तसेच पावसापूर्वी सर्व मॅनहोल सुरक्षितरीत्या झाकलेले असावेत, कुठेही उघडे राहू नयेत, असेही स्पष्ट केले. (Ashwini Bhide)
नाला सफाईबाबत त्यांनी सांगितले की, कामाची दररोजची प्रगती जनप्रतिनिधींसोबतच सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचवावी, ज्यामुळे पारदर्शकता वाढेल आणि नागरिकांचा अभिप्राय मिळेल.
बैठकीत बदलत्या शहरी गरजांवरही चर्चा झाली. ऑनलाइन फूड डिलिव्हरी आणि गिग वर्कसारख्या नव्या क्षेत्रांसाठी आवश्यक पायाभूत सुविधांवर भर देत अधिकाऱ्यांना विकास आराखड्यात यांचा समावेश करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच राखीव भूखंडांची स्थिती तपासून जीआयएससारख्या तंत्रज्ञानाद्वारे त्यांचे मॅपिंग करण्यासाठी व्यापक धोरण तयार करण्याची सूचना करण्यात आली. (Ashwini Bhide)
या बैठकीला मनपाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे, संयुक्त आयुक्त (सतर्कता) डॉ. एम. देवेंद्र सिंह तसेच सर्व संयुक्त आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आणि विभागप्रमुख उपस्थित होते. (Ashwini Bhide)