Asha Bhosle funeral : आशाताईंना अखेरचा निरोप! शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

    13-Apr-2026   
Total Views |

Asha Bhosle Funeral

मुंबई : (Asha Bhosle Funeral) ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे रविवार दि. १२ एप्रिल रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पुत्र आनंद भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज म्हणजेच १३ एप्रिलला दुपारी ४ वाजता दादरच्या शिवाजी पार्कमध्ये त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचे पार्थिव आज सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत लोअर परळ येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. त्यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्रातील एक चिरतरुण सूर हरपल्याची भावना व्यक्त होत असून सर्वत्र शोककळा पसरली आहे.

आठ दशकांहून अधिक काळ आपल्या सुमधूर गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या आशा भोसले यांच्या निधनानंतर संगीतविश्वातील एका पर्वाचा अंत झाला. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी असंख्य पुरस्कार प्राप्त केले. यामध्ये भारतीय चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्काराचा समावेश आहे. तसेच भारत सरकारकडून त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.(Asha Bhosle Funeral)

असा असणार अंत्ययात्रेचा मार्ग

आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेचा मार्ग कसा असेल याची माहिती समोर आली आहे. कासा ग्रँड एक्झिट गेट- डावे वळण- पेनिन्सुला सिग्नल - उजवे वळण - गणपतराव कदम मार्ग - श्रीराम नाका - वरळी नाका- उजवे वळण डॉक्टर ॲनी बेझंट मार्ग -पोद्दार जंक्शन - ग्लॅस्को जंक्शन - सास्मिरा जंक्शन - हार्डीकर जंक्शन - सेंचुरी जंक्शन- किस्मत जंक्शन- हत्तीचा पुतळा -सिद्धिविनायक मंदिर- काशिनाथ धुरू- कीर्ती कॉलेज- सूर्यवंशी हॉल- डावी वळण-स्मशान भूमी, असा आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेचा मार्ग असणार आहे.(Asha Bhosle Funeral)


अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\