अथांग ईश्वरी इच्छाशक्ती

Total Views |

श्रीलंका आणि भारत यांच्यामधील पाल्कची सामुद्रधुनी पार करून, एक ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित करणाऱ्या ईश्वरी पांडे यांच्याविषयी...

खवळलेल्या लाटा, समुद्राचा प्रवाह, जेलीफिशचा धोका आणि त्या सगळ्यांमध्ये एक 17 वर्षांची एक दृष्टिहीन मुलगी, त्या समुद्राशी दोन हात करत होती. ही होती तिच्या जिद्दीची लढाई; आणि त्या लढाईत विजय मिळवणारे नाव म्हणजे नागपूरची ईश्वरी पांडे! नागपूरची 17 वषय ईश्वरी पांडे ही केवळ एक जलतरणपटू नाही, तर जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाचे जिवंत उदाहरण आहे. पूर्णतः दृष्टिहीन असूनही, तिने श्रीलंका आणि भारत यांच्यामधील पाल्क सामुद्रधुनी पार करून एक ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला. या कामगिरीमुळे हा आव्हानात्मक समुद्री मार्ग यशस्वीपणे पार करणारी ती, जगातील पहिली पूर्णतः दृष्टीहीन जलतरणपटू ठरली आहे. तब्बल 29 किमीचा हा सागरी मार्ग ईश्वरीने अवघ्या 11 तास, 15 मिनिटांत पोहून पार करत विश्वविक्रमाला गवसणी घातली.

ईश्वरीच्या या यशामागील कहाणीही तितकीच रंजक आणि प्रेरणादायी आहे. ईश्वरीचे वडील कमलेश पांडे जिल्हा परिषदेत ‌‘कम्प्युटर ऑपरेटर‌’ म्हणून काम करतात. घरची परिस्थिती सामान्य असतानाही मुलीला पोहायला शिकवण्याचा चंग वडिलांनी बांधला. यासाठी कारण ठरलेली घटनाही तितकीच गंभीर. ईश्वरीच्या गावापासून काही किमी अंतरावर असलेल्या वडद गावातील तलावात, काही मुलं पोहायला गेली होती. त्यावेळी सेल्फी काढण्याच्या नादात, त्यांची बोट उलटली आणि काही क्षणांतच होत्याचे नव्हते झाले. त्या दिवशी पाण्याने केवळ जीवच घेतले नाहीत, तर ईश्वरीच्या वडिलांच्या मनात भीती, अस्वस्थता आणि एक प्रश्नही निर्माण केला. ‌‘उद्या असं जर माझ्या मुलांसोबत झालं तर?‌’ ही भीतीच पुढे एका अद्भुत प्रवासाची सुरुवात ठरली.

कमलेश यांनी तत्काळच मुलगा इशांत याच्याकडून पोहोण्याचा सराव करुन घेण्यास सुरुवात केली. रोज संध्याकाळी कामावरून घरी आल्यानंतर ते त्याला पोहायला घेऊन जात. ईश्वरी आणि इशांत जुळी भावंडे असल्याने, घरात ‌‘स्विमिंग‌’ शब्द रोज ईश्वरीच्या कानावर पडू लागला. ईश्वरी तेव्हा अवघी चारच वर्षांची होती. त्यामुळे तिला ‌‘स्विमिंग‌’चा अर्थही तिला उमगत नसे. पण तिच्या मनात एकच गोष्ट निश्चित झाली होती, ती म्हणजे ‌‘मीपण येणार!‌’ तिच्या हट्टापायी वडील कमलेश यांनी सुरुवातीला, तिला फक्त पाण्यात खेळण्यासाठी म्हणून घेऊन जाण्यास सुरुवात केली. तब्बल एक वर्ष ती फक्त पाण्यात खेळत राहिली.

याच काळात वडील कमलेश यांची ओळख प्रशिक्षक संजय बटवे यांच्याशी झाली. ईश्वरीच्या यशामागे तिचे प्रशिक्षक संजय बटवे यांचे योगदान मोलाचे आहे. जेव्हा पहिल्यांदा बटवे यांनी ईश्वरीला पहिले तेव्हा त्यांनी ईश्वरीच्या वडीलाांना स्पष्ट केले की, त्यांनी दिव्यांग मुलांना शिकवले असले, तरीही पूर्णतः दृष्टीहीन मुलाला शिकवण्याचा अनुभव नाही. मात्र, वडिलांचा विश्वास आणि मुलीची जिद्द पाहून त्यांनी प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला.

ईश्वरीचा सराव सुरू झाला आणि लगेचच जगावर ‌‘कोविड‌’चे संकट आले. परिणामी, तरणतलाव बंद झाले. अनेकांसाठी हा थांबण्याचा क्षण होता; पण ईश्वरीसाठी नाही!

नागपूरमधील अंबाझरी तलावच तिचे नवीन प्रशिक्षण केंद्र बनले. तलावात पोहण्यासाठी वेगळे कौशल्य लागते. तिथे लाटा असतात, अनिश्चितता असते. पण, इथेच ईश्वरीची खरी जडणघडण सुरू झाली. एका टप्प्यावर तिने दोन किमीचे अंतर सहज पार केले. त्या दिवशी तलावाच्या मधोमध तिने झेंडा फडकावला. हा क्षण तिच्यासाठी आत्मविश्वास वाढवणारा अत्यंत महत्त्वाचा क्षण होता. यानंतर समुद्राने तिला हाक दिली. गुजरात राज्यातील पोरबंदरमध्ये पहिल्यांदा ती समुद्रात उतरली. पाच किमीचे आव्हान तिच्यासमोर होते. अडीच किमी लाटांच्या विरुद्ध आणि अडीच किमी लाटांसोबत, असे अंतर पार करायचे होते. सुरुवातीला सगळे व्यवस्थित चालले; पण वेळ वाढत गेला तशी चिंताही वाढली. इतर स्पर्धक पोहोचले, पण ईश्वरी अजूनही समुद्रातच होती. किनाऱ्यावर उभ्या असलेल्या तिच्या कुटुंबीयांची धडधडदेखील वाढली होती. प्रशिक्षक मात्र शांत होते. त्यांचा विश्वास अढळ होता, ती येईल! आणि खरंच, काही वेळाने लाटांमधून तिच्या हातांची हालचाल दिसू लागली. त्या क्षणी सगळ्यांना जाणवले की ही मुलगी काहीतरी वेगळं करून दाखवणार, इतिहास घडविणार, हे निश्चित आहे.

वर्ष 2023 मध्ये एका अपघाताने तिच्या आयुष्याला मोठा धक्का दिला. गाडीच्या धडकेत तिचा पाय फ्रॅक्चर झाला. डॉक्टरांनी तीन महिन्यांच्या पूर्ण विश्रातींचा सल्ला दिला. त्यामुळे स्वप्न थांबल्यासारखे वाटले खरे पण, ईश्वरीने हार मानली नाही. जखमा अजून भरल्या नव्हत्या, तरी ती पुन्हा पाण्यात उतरली. फेब्रुवारी 2024 मध्ये ईश्वरीने घारापुरीची लेणी ते गेटवे ऑफ इंडिया हा 17 किमीचा प्रवास, 4 तास, 3 मिनिटांत पूर्ण केला. ही कामगिरी करणारी ती पहिलीच दृष्टिहीन मुलगी ठरली आणि तिची नोंद ‌‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स‌’मध्ये झाली.

यानंतर तिच्यासमोर श्रीलंका ते भारत समुद्र प्रवासाचे एक मोठे स्वप्न उराशी बाळगले. पाल्कच्या सामुद्रधुनीतून तब्बल 29 किमीचा समुद्र, जेलीफिशचा धोका आणि 11 तासांचा अखंड संघर्ष करण्याचे हे स्वप्न होते. दि. 6 एप्रिल रोजी ती श्रीलंकेजवळील समुद्रात उतरली. प्रत्येक स्ट्रोकसोबत ती लाटांशी लढत होती. समुद्रातील प्रत्येक धोक्यांवर मात करताना प्रशिक्षक आणि साहाय्यक टीमने, अत्यंत दक्षतेने तिला मार्गदर्शन केले. शेवटी ईश्वरी पांडे जगातील पहिली पूर्णतः दृष्टीहीन जलतरणपटू ठरली, जिने हा मार्ग पार केला. नुकतीच ती नागपूरमध्ये परतली असून, तिथे तिचे जंगी स्वागतही झाले.

ईश्वरीची कथा केवळ एका मुलीची कथा नसून; ही कथा पालकांच्या अतूट विश्वासाची, प्रशिक्षकांच्या अपार मेहनतीची आणि ईश्वरीच्या अटळ जिद्दीची आहे. आज ईश्वरी आज असंख्य दिव्यांग मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी आशेचा किरण आहे. ईश्वरी एक मूर्त उदाहरण आहे, भीतीवर मात करून स्वतःचं आकाश शोधण्याचे! ईश्वरीला बारावीच्या परीक्षेसाठी आणि पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी दै. ‌‘मुंबई तरुण भारत‌’कडून अनेकानेक शुभेच्छा!

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.