तपश्चर्येतून घडलेला संघनिष्ठ ‌‘कर्मयोगी‌’

    12-Apr-2026
Total Views |

कोकणच्या मातीतून उगवलेले आणि राष्ट्रसेवेच्या ध्येयाने संपूर्ण आयुष्य घडवलेले कै. वामनराव अनंत प्रभुदेसाई, हे खऱ्या अर्थाने ‌‘कर्मयोगी‌’ होते. बालवयातच संघकार्याची गोडी लागलेला हा साधा स्वयंसेवक पुढे संघटन, उद्योग, सहकार आणि समाजकारण या सर्व क्षेत्रांत आपली वेगळी छाप उमटवतो, हीच त्यांच्या जीवनाची खरी प्रेरणादायी कथा. संघाच्या शाखेत रुजलेले संस्कार त्यांनी केवळ जपलेच नाहीत, तर ते विविध क्षेत्रांत प्रत्यक्ष सत्यात उतरवून दाखवले. त्यांच्या जीवनप्रवासातून एका सामान्य स्वयंसेवकाने असामान्य कर्तृत्व कसे घडवावे, याचा जिवंत आदर्शच आपल्यासमोर उभा राहतो.

कोकणच्या मातीतील राष्ट्रभक्तीचे एक देदीप्यमान उदाहरण म्हणजे कै. वामनराव अनंत प्रभुदेसाई. त्यांचे बालपण कोकणातील राजापूर-तळवडे गावामध्ये गेले. वयाच्या दहाव्या वर्षापासून त्यांनी संघाच्या शाखेत जाण्यास सुरुवात केली आणि तिथूनच त्यांच्या मनात राष्ट्रसेवेची ठिणगी पेटली. 1944 साली वयाच्या अवघ्या 14व्या वष त्यांनी, संघशिक्षा वर्गासाठी पुण्याला जाण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्याकाळी राजापूरसारख्या दुर्गम भागातून पुण्याला जाणे हे मोठेच दिव्य होते. घरातून विरोध असतानाही, केवळ जिद्द आणि राष्ट्रभक्तीच्या ओढीने हा मुलगा एकटा पुण्याला पोहोचला. त्यावष राजापूरहून संघशिक्षेला जाणारे ते एकमेव स्वयंसेवक होते आणि तिथेच खऱ्या अर्थाने, त्यांच्यातील ‌‘स्वयंसेवक‌’ तावून-सुलाखून निघाला.

पुण्यातील संघशिक्षेच्या पहिल्याच दिवशी त्यांची भेट, द्वितीय सरसंघचालक प. पू. गोळवलकर गुरुजींशी झाली. गुरुजींनी वयाबद्दल विचारले असता, संघप्रक्रियेत सामील होण्याच्या तीव्र ओढीने वामनरावांनी आपले वय एक वर्षाने वाढवून, म्हणजेच 15 वर्षे सांगितले. गुरुजींनी त्यांचे हे बोलणे तत्काळ ओळखले पण, या छोट्या बालकाची तळमळ पाहून त्यांनी हसत वामनरावांना उचलून घेतले आणि ‌‘वस्ताद आहेस‌’ असे गौरवोद्गार काढले. एका सर्वोच्च नेतृत्वाने साध्या स्वयंसेवकाशी दाखवलेली ही आपुलकी, वामनरावांच्या कायमची लक्षात राहिली. या एका भेटीने वामनरावांच्या आयुष्याची संघप्रेरित दिशा निश्चित केली.

त्यांच्यातील नेतृत्व-गुणांमुळे त्यांना, चौथीमध्ये असतानाच ‌‘गणप्रमुख‌’ होण्याची संधी मिळाली होती. त्यांनी संघ प्रशिक्षणाचे प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्ष अत्यंत निष्ठेने पूर्ण केले. संघाचा पाया मजबूत करण्यासाठी गोळवलकर गुरुजींनी जनसंघ, मजदूर संघ यांसारखी जी विविध क्षेत्रे उभी केली, त्या वातावरणातच वामनराव घडत गेले. त्यांना नाना पवार, अनंतराव देशपांडे आणि नाना आंबर्डेकर यांसारख्या प्रचारकांचे उत्तम मार्गदर्शन लाभले. 1947च्या पुणे-चिंचवड मेळाव्यात ते सहावीत असताना सहभागी झाले होते. जेव्हा सरकारने मेळाव्यावर बंदी घातली, तेव्हा स्वयंसेवकांनी पर्वा न करता जिल्हावार मेळावे यशस्वी केले. रत्नागिरीतील जिल्हा मेळाव्यादरम्यान राजापूर तालुक्यातील 39 गावांशी संपर्क साधण्याची आणि स्वयंसेवकांच्या प्रवासाची व निवासाची मोठी जबाबदारी, वामनरावांनी सायकलीवरून आणि पायी प्रवास करून चोखपणे पार पाडली.

1948 मध्ये महात्मा गांधींच्या हत्येनंतर जेव्हा संघावर अन्यायकारक बंदी घालण्यात आली, तेव्हा त्याविरुद्धच्या राष्ट्रव्यापी सत्याग्रहात ठाण्यातून सामील होणाऱ्या पहिल्या 25 स्वयंसेवकांच्या गटात, वामनरावांचे नाव होते. सेंट्रल मैदानावर भगवा ध्वज फडकवून त्यांनी सत्याग्रह केला आणि वयाच्या अवघ्या 19व्या वष त्यांना, चार महिन्यांच्या कारावासाची शिक्षा झाली. ठाणे आणि नंतर वरळी येथील कारागृहात तर त्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीही अनुभवली. 10 बाय 10च्या खोलीत कोंडले जाणे, निकृष्ट अन्न आणि यमयातनांसारखी वागणूक मिळूनही त्यांची संघनिष्ठा ढळली नाही. या अनुभवाने त्यांना मानसिकदृष्ट्या अधिक खंबीर आणि निडर बनवले. संकटांना ‌‘संधी‌’ समजण्याची दृष्टी, त्यांना याच संघर्षातून मिळाली.

नोकरीसाठी राजापूरहून ठाण्यात राहायला आल्यावर एकत्रित कुटुंबामुळे राहण्याची जागा अपुरी पडत असल्याने, ते आनंदाने संघाच्या कार्यालयात झोपायला जाऊ लागले. तिथे होणारे बौद्धिक वादविवाद आणि चर्चेतून त्यांचा आत्मविश्वास व नियोजन कौशल्य अधिक प्रगल्भ झाले. 1951 मध्ये वामनराव रेल्वेत रुजू झाले. तिथेच त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परवानगीने ‌‘भारतीय मजदूर संघ‌’प्रणीत ‌‘मध्य रेल्वे कर्मचारी संघ‌’ उभारण्यात सिंहाचा वाटा उचलला. मुंबई ते जबलपूरपर्यंत कार्यकर्त्यांची फळी त्यांनी निर्माण केली. दत्तोपंत ठेंगडी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मुंबई, नागपूर, सोलापूर आणि जबलपूरपर्यंत कार्यकर्त्यांची भक्कम साखळी तयार केली आणि अल्पावधीत ‌‘रेल्वे कर्मचारी मजदूर संघा‌’चा दबदबा निर्माण केला. प्रशासनाने युनियनची वर्गणी गोळा करण्यावर बंदी घातली, तेव्हा वामनरावांनी कोर्टात आणि संसदेत लढा दिला. रेल्वे बोर्डाचे निर्णय आणि तांत्रिक बाबींचा त्यांचा अभ्यास इतका गाढा होता की, प्रशासनालाही त्यांच्यासमोर नमावे लागले. ‌‘गजेंद्र गडकर कमिशन‌’च्या बैठकीनिमित्ताने ‌‘मध्य रेल्वे कर्मचारी संघा‌’चे प्रतिनिधित्व करण्यासाठी ते दिल्लीलाही गेले होते. त्यांच्या प्रयत्नांमुळेच रेल्वे मजुरांचा महागाई भत्ता असो वा इतर सरकारी धोरणे, अनेक गुंतागुंतीचे प्रश्न सुटले आणि युनियनच्या कामात मोठी स्थिरता आली.

सामाजिक जबाबदाऱ्या सांभाळत असतानाच वामनरावांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्यादेखील वाढत होत्या. पत्नी कला प्रभुदेसाई; तसेच मेधा, रवींद्र व मीनल ही तीन मुले असे त्यांचे सुखी कुटुंब होते. एकदा त्यांच्या मुलीचा अपघात झाला असतानाही, कर्तव्याला प्राधान्य देत ते कार्यकर्त्यांच्या बैठकीला हजर राहिले. ही ‌‘कर्तव्यकठोरता‌’ त्यांना संघाच्या संस्कारातूनच मिळाली होती. ‌‘समाजाचे काम वैयक्तिक कामापेक्षा श्रेष्ठ आहे‌’ ही भावना जपत, त्यांनी राम नाईक रेल्वे राज्यमंत्री असताना झालेल्या कार्यक्रमांत आणि ज्येष्ठ रेल्वे कार्यकर्त्यांच्या विविध शिबिरांमध्ये हिरिरीने सहभाग घेतला.

1968 पर्यंत ते रेल्वेसेवेत होते पण, नेत्यांकडून स्वदेशीचा प्रचार ऐकल्यावर त्यांच्या मनात स्वतःचा उद्योग सुरू करण्याची तळमळ निर्माण झाली. नोकरीमुळे उद्योग करता येत नसल्याची खंत त्यांना अस्वस्थ करत होती. ‌‘दुसऱ्याच्या हाताखाली काम करण्यापेक्षा, स्वतःचा व्यवसाय करून समाजाला काहीतरी द्यावे,‌’ या विचारातून त्यांनी रेल्वेची नोकरी सोडली आणि रिक्षा चालवण्याचा व्यवसाय स्वीकारला. वर्षभरानंतर थ्री-व्हीलर टेम्पो सुरु करून, त्यांनी परिवहन व्यवसायाला गती दिली आणि ठाण्यातील जनसंघ कार्यालयाच्या बाजूलाच ‌‘विक्रम ट्रान्सपोर्ट‌’ नावाने कार्यालय सुरू केले. व्यवसायात सुरुवातीच्या काळात त्यांना फसवणुकीलाही सामोरे जावे लागले मात्र, त्यांनी हार मानली नाही.

स्वदेशीचा ध्यास आणि उद्योजकीय ध्येयाने प्रेरित होऊन त्यांनी आपला मुलगा डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांच्या समवेत, ‌‘पितांबरी‌’ या ब्रॅण्डची स्थापना केली. ‌‘पितांबरी‌’च्या स्थापनेपूव ‌‘मोझॅक टाईल्स फॅक्टरी‌’च्या व्यवसायात रवींद्र प्रभुदेसाई यांना सुमारे सात लाखांचे मोठे नुकसान सहन करावे लागले. त्याकाळात ही रक्कम खूपच मोठी होती मात्र, मुलाची उद्योगाबद्दलची ओढ ओळखून वडील म्हणून वामनराव शांतपणे आणि ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले. यानंतर हळूहळू ‌‘पितांबरी‌’ची सुरुवात झाली. सुरुवातीला ‌‘पितांबरी‌’चा व्यवसाय केवळ ‌‘इन्स्टिट्यूशनल सेल‌’पुरता मर्यादित होता; पण पुढे तो यशस्वीपणे ‌‘एफएमसीजी‌’ क्षेत्रात विस्तारला. व्यवसायाला जागतिक ओळख प्राप्त झाली. वामनरावांच्या संस्कारांमुळेच रवींद्र यांच्यात जिद्द, नेतृत्वगुण आणि धडाडी हे गुण विकसित झाले. लहानपणापासूनच वडिलांसोबत शाखेत जाणे आणि संघ प्रशिक्षण घेणे, यामुळे त्यांचीही विचारसरणी आणि व्यक्तिमत्त्व घडत गेले.

उद्यमशील नेतृत्वाच्या प्रेरणेतूनच संघ स्वयंसेवकांनी विविध क्षेत्रांत पदार्पण करून, अनेक संस्था उभारल्या होत्या. त्याकाळी ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली, कल्याण आणि ठाणे या शहरांमध्ये अनेक सहकारी बँका सुरू झाल्या होत्या. मात्र, संचालकांचा बेजबाबदारपणा, नियमांचे उल्लंघन आणि अधिकारांचा अवास्तव वापर, यामुळे या बँका तोट्यात जाऊन कालांतराने दिवाळखोरीत निघत असत. अशा प्रतिकूल परिस्थितीत, संघ कार्यकर्त्यांच्या साथीने बँकिंग क्षेत्राला योग्य दिशा देण्याचा निर्धार वामनरावांनी केला. त्यांच्यातील संघटन कौशल्य पाहून, त्यांची ‌‘ठाणे जनता सहकारी बँके‌’च्या (टीजेएसबी) संस्थापक सदस्यपदी निवड झाली.

सहकार क्षेत्रातील ‌‘निसरड्या‌’ वाटेवर त्यांनी संघाच्या मूल्यांचे अधिष्ठान ठेवले. याच ध्येयवादातून ठाण्यातील गोखले रोडवर ‌‘ठाणे जनता सहकारी बँके‌’ची स्थापन झाली. बँकेच्या संचालक मंडळावर प्रामाणिक आणि सुसंस्कृत व्यक्ती उपलब्ध झाल्यामुळे, पहिल्याच वष बँक नफ्यात आली. पुढे 1981 ते 1993 अशी 13 वर्षे त्यांनी संचालक म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. सामाजिक भावनेतून ही भूमिका बजावताना, त्यांनी ग्राहकांशी सौजन्यपूर्ण वागणूक आणि त्यांना जास्तीत-जास्त सोयीसुविधा मिळवून देण्यावर विशेष भर दिला. 1990 साली ‌‘ठाणे जनता सहकारी बँके‌’ने 55 कोटी रुपयांच्या ठेवींचे ऐतिहासिक लक्ष्य यशस्वीपणे पूर्ण केले आणि वामनराव बँकेचे अध्यक्ष झाले. वामनरावांनी घालून दिलेली शिस्त, नियम आणि मूल्ये आजही तितक्याच निष्ठेने पाळली जातात. ग्राहकांशी सौजन्यपूर्ण व पारदर्शक व्यवहारांमुळे बँक उंचीवर पोहोचली आहे.

सप्टेंबर 2000 मध्ये, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या आग्रहास्तव, वामनराव प्रभुदेसाई यांनी 70व्या वर्षी ‌‘केशवसृष्टी‌’च्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. त्यांनी ही जबाबदारी केवळ एक ‌‘बहुमान‌’ म्हणून न स्वीकारता, एक ‌‘आव्हान‌’ म्हणून स्वीकारली. सुरुवातीचे सहा महिने त्यांनी केवळ निरीक्षण करून, संस्थेच्या उणिवा आणि गरजा समजून घेण्यावर भर दिला. प्रभुदेसाई यांना केवळ ‌‘नामधारी अध्यक्ष‌’ राहणे कधीही मान्य नव्हते. दुसऱ्याला दोष न देता स्वतः काय करू शकतो ते प्रथम तपासा, या संघविचाराने प्रेरित होऊन त्यांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली.

त्यांच्या कार्यकाळातील सर्वांत मोठे यश म्हणजे, ‌‘केशवसृष्टी‌’च्या जमिनीचे अनेक गुंतागुंतीचे प्रश्न त्यांनी माग लावले. कागदोपत्री 200 एकर असलेली जमीन, प्रत्यक्षात केवळ 20 एकर ताब्यात होती. प्रभुदेसाई यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि प्रदीर्घ न्यायालयीन लढ्यांनंतर, सुमारे 130 एकर जागा संस्थेच्या ताब्यात आली. ‌‘लॅण्ड सीलिंग ॲक्ट‌’नुसार जमिनीचे योग्य वाटप करून त्यांनी, संस्थेचे कायदेशीर अस्तित्व भक्कम केले. त्यांच्या अध्यक्षपदाच्या सुरुवातीच्या काळातच ‌‘विश्वसंघ शिबीर‌’ आयोजित करण्यात आले होते. 40 देशांतून आलेल्या 800 स्वयंसेवकांसह एकूण एक हजार लोकांच्या निवासाची, भोजनाची आणि राहण्याची चोख व्यवस्था त्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. परदेशी स्वयंसेवकांनी या शिबिरातील नियोजनाचे ‌‘फाईव्ह स्टार अरेंजमेंट्स‌’ अशा शब्दांत कौतुक केले.

‌‘केशवसृष्टी‌’ला ‌‘स्वयंपूर्ण‌’ बनवण्यासाठी त्यांनी अनेक ठोस पावले उचलली. ‌‘ठाणे जनता सहकारी बँके‌’च्या मदतीने त्यांनी, एक अद्ययावत रुग्णवाहिका मिळवून दिली आणि ‌‘आयुर्वेदिक पंचकर्म केंद्रा‌’ची स्थापना केली. कामगारांच्या कल्याणाप्रती असलेल्या त्यांच्या तळमळीतून, त्यांनी स्वतःच्या खर्चातून आणि देणग्यांतून दहा सुसज्ज निवासस्थाने (प्रत्येकी 350 चौ. फूट) बांधली, ज्यामुळे कामगारांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारला. संस्थेच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांनी सहल विभागाचे नूतनीकरण केले आणि भोजनगृहाचा विस्तार करून, उत्पन्नाचे नवीन स्रोतही निर्माण केले. ‌‘जनसेवा हीच ईशसेवा‌’ हा मंत्र जपत त्यांनी, आपल्या वैयक्तिक निवृत्तीनंतरची पुंजीही समाजासाठी खच घातली. ‌‘केशवसृष्टी‌’तील आमराई आणि वनौषधी प्रकल्पांचा पूर्णक्षमतेने वापर व्हावा, ही त्यांची कळकळ आजही कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरते.

कै. वामनराव प्रभुदेसाई यांचे जीवन म्हणजे ‌‘स्वयंसेवक‌’ या शब्दाची खरी व्याख्या आहे. संघाने केवळ व्यक्ती घडवल्या नाहीत, तर राष्ट्रवादाने प्रेरित झालेले ‌‘कर्मयोगी‌’ उभे केले. अशाच कर्मयोग्यांच्या मांदियाळीतील एक दीपस्तंभ म्हणजे कै. वामनराव अनंत प्रभुदेसाई. वयाच्या 14व्या वर्षापासून सुरू झालेला त्यांचा हा संघप्रवास, आयुष्याच्या अंतापर्यंत ध्येयनिष्ठेचा एक वस्तुपाठ ठरला. संघाने दिलेली मूल्ये केवळ शाखेत न ठेवता, ती रेल्वेच्या युनियनमध्ये, बँकिंग क्षेत्रात, ‌‘पितांबरी‌’ व्यवसायात आणि ‌‘केशवसृष्टी‌’च्या कामात त्यांनी प्रत्यक्ष उतरवली. संघाचे हे शताब्दी वर्ष साजरे करत असताना, वामनरावांसारख्या ‌‘असामान्य‌’ तपस्वी कार्यकर्त्यांचा वारसा पुढे नेणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.