सोशल मीडियाचा लग्नावर परिणाम

    12-Apr-2026
Total Views |

आजचे जग इंटरनेटने जवळ आले असून, समाज माध्यमे ही मानवी आयुष्याचा अविभाज्य भाग झाली आहेत. त्यांच्या वापराचे परिणाम, दुष्परिणाम यांच्यावर अनेकदा चर्चा होतेच. विवाहसंस्थेमध्येही याचे परिणाम जाणवताना दिसतात. या परिणामांचा घेतलेला मागोवा...

आजकाल लग्नाचे वय झाले की, घरातली वडीलधारी मंडळी मुलगा किंवा मुलगी शोधायला लागतात. बायोडेटाची देवाणघेवाण होते, फोटो पाहिले जातात, कोणत्यातरी विवाहसंस्थेच्या संकेतस्थळावर नावनोंदणी होते. पण, त्याहीपूव मुलगा-मुलगी थेट इंटरनेटवर जाऊन, समोरच्या व्यक्तीची समाज माध्यमे धुंडाळायला लागतात.‘इन्स्टाग्राम‌’,‘फेसबुक‌’,‘स्नॅपचॅट‌’ या माध्यमांमधून काही मिनिटांतच सगळे कळते, असे तरुण पिढीला वाटते; पण खरेच तसे कळते का? आणि या सगळ्याचा ‌‘अरेंज मॅरेज‌’वर काय परिणाम होतो, हे समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. हल्ली मुला-मुलींची पहिली भेट प्रत्यक्ष होतच नाही, ती होते स्क्रीनवर!

बायोडेटा आणि प्रोफाईल ः दोन वेगळ्या जागांची टक्कर

घरून मिळालेला बायोडेटा एक चित्र रंगवतो शिक्षण, नोकरी, कुटुंब, स्वभाव. पण, समाज माध्यमांवर मात्र दिसणारे जग वेगळेच असते. मुलाने किंवा मुलीने ‌‘शेअर‌’ केलेले फोटो, पाटची क्षणचित्रे, मित्र-मैत्रिणींशी केलेल्या जवळीकीचे फोटो हे सगळे पाहून, मनात एकप्रकारचे निष्कर्ष तयार होतात. हा दारू पितो. कारण, एका समारंभात हातात ग्लास होता. ही सिगरेट ओढते कारण, हिच्या शेजारी कुणीतरी धूम्रपान करत होते. याला/हिला कुणीतरी स्पेशल आहे कारण, एका व्यक्तीचे फोटो वारंवार दिसतात.

अशाप्रकारचे निष्कर्ष खरे असतील किंवा नसतीलही; पण ते एकदा मनात शिरले की, संशयाचा डोंगर सुरू होतो आणि मग ती व्यक्ती नकोच वाटायला लागते. पूवचे प्रेमप्रकरण उघड होते, समाजमाध्यमांमुळेच!

अनेक मुला-मुलींचे कधी ना कधीतरी कोणाशी तरी जवळचे संबंध असतात. हे संबंध संपलेले असतात मात्र, त्याचे फोटो अजूनही ‌‘इन्स्टाग्राम‌’वर किंवा ‌‘फेसबुक‌’वर जिवंत असतात. कित्येकदा साखरपुडा होण्याआधीच भावी जोडीदाराने ते पाहिलेले असतात. ‌‘तुझा ‌‘बॉयफ्रेंड‌’ होता का?‌’ किंवा ‌‘तुला ‌‘गर्लफ्रेंड‌’ होती का?‌’ हे प्रश्न थेट विचारले जातात किंवा मनातल्या मनात ठेवले जातात आणि मग नाते सुरू होण्यापूवच एक अदृश्य तणाव निर्माण होतो. पूर्वायुष्याबद्दलचा हा संशय पुढे बोलण्यात-वागण्यात डोकावत राहतो, आणि नात्याला एक अस्वस्थ सुरुवात होते. मागे सोडलेले जर स्क्रीनवर जिवंत राहिले; तर नव्या नात्याला ते घातक ठरते.

काही तरुण-तरुणी एकत्र फिरत असताना काढलेले फोटो, व्हिडिओ किंवा रील्स समोरच्याची परवानगी न घेता समाजमाध्यमावर पोस्ट करतात. उद्या कदाचित हेच फोटो ‌’याने‌’ किंवा ‌’हिने‌’ अमुक कोणाशीतरी डेटिंग केले होते, असे सांगण्यासाठी वापरले जातात.

ही एखाद्या मुलीसाठी अतिशय संवेदनशील बाब असते. तिच्या नकळत तिचे फोटो किंवा ठिकाण किंवा नाती उघड झाल्यावर, तिच्या भावी लग्नावर त्याचा परिणाम होतो. अनेकदा मुलाच्या कुटुंबाला हे कळते आणि ‌‘आम्हाला असे नाही चालणार‌’ असे म्हणत, ते लगेच विषय बंद करतात. अशा वेळी, एका व्यक्तीच्या भूतकाळाची किंमत दुसऱ्याच्या भविष्याला चुकवावी लागते.

कोणत्याही व्यक्तीचे फोटो, व्हिडिओ किंवा वैयक्तिक माहिती त्यांच्या परवानगीशिवाय समाज माध्यमावर पोस्ट करणे, हे नैतिकदृष्ट्या चुकीचे आहे आणि काही परिस्थितीत कायद्याने गुन्हाही ठरू शकतो. साखरपुडा झाल्यावर लगेचच आम्ही ‌‘एंगेज्ड‌’ आहोत, हे जगाला सांगण्याची घाई असते. फोटो टाकले जातात, रील्स बनवले जातात, स्टोरीज येतात, ‌‘लाईक्स‌’ आणि ‌‘कमेंट्स‌’ मिळायला लागतात आणि त्यानेच हुरळूनही जायला होते. हीच माझी खरी किंमत आहे, असे वाटायला लागते. पण, ही एकप्रकारची मानसिक गुलामगिरी आहे. त्यातून भावी जोडीदाराने ‌‘लाईक्स‌’ किंवा ‌‘कमेंट्स‌’ दिल्या नसतील तर, “तुला माझी किंमत नाही, तुला मी आवडत नाही,” असेही निष्कर्ष काढणारी मंडळी कमी नाहीत. आपले नाते समाज माध्यमावर छानच दिसले पाहिजे, यासाठी नाते जगण्याऐवजी ते दाखवायला सुरुवात होते. वाद झाला, तरी बाहेर ‌‘हॅप्पी कपल‌’ दिसले पाहिजे आणि हे जगणे मोठे थकवणारे असते.

समाजमाध्यम, लग्नाआधी आणि नंतर काय करावे आणि काय टाळावे, हे पाहूया या लेखाच्या उत्तरार्धात! (क्रमश:)

डॉ. गौरी कानिटकर
(लेखिका ‌‘अनुरूप‌’ विवाह संस्थेच्या कार्यकारी संचालक असून, ‌‘मॅरेज इन्रिचमेंट कौंसिलर आहेत.)
[email protected]