संघविरोधाची अविवेकी भाषा...

    12-Apr-2026
Total Views |

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी रा. स्व. संघाविषयी आसममधील प्रचारसभेमध्ये गरळ ओकली. रा.स्व.संघावर काँग्रेसचा राग हा काही नवा नाही. काँग्रेसी उन्मादाला आजवर संघ नुसताच पुरुन उरला नाही, तर गेली 100 वर्षे देशामध्ये राष्ट्रभावनेचा प्रसार करत व्यक्तिनिर्माणाचे कार्य अखंडित करत आला आहे. आजवर रा. स्व. संघावर याच काँग्रेसने बंदी घालण्याचे केलेले प्रयत्न फसल्यावरही, आजही काँग्रेसी नेत्यांना पुन्हा पुन्हा तोच मार्ग चोखंदळावासा वाटतो, यातच त्यांच्या मर्यादा स्पष्ट होतात. मल्लिकार्जुन खर्गे यांनी व्यक्त केलेल्या मताच्या पार्श्वभूमीवर रा. स्व. संघ आणि काँग्रेस यांच्यातील संबंधांचा घेतलेला मागोवा...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेच्या नवव्या वष, म्हणजे 1934 मध्ये वर्धा येथे भरवण्यात आलेल्या संघाच्या शिबिराला, महात्मा गांधी यांनी भेट दिली होती. त्यावेळी शिबिरातील शिस्त पाहून गांधीजी समाधान पावले होतेच, तसेच तेथे असलेल्या व्यवस्थेनेही ते आश्चर्यचकित झाले होते. विशेषतः त्या शिबिरातील जातिभेदविरहित वातावरण त्यांना विशेष भावले. त्यावेळी त्या शिबिरात अनेक स्वयंसेवक एकत्र रांगेत बसून भोजन करत होते आणि त्यापैकी कोणालाही, एकमेकांच्या जातीची कल्पना नव्हती. या अनुभवाचा उल्लेख गांधीजींनी नंतर दिल्लीमध्ये संघाच्या स्वयंसेवकांना संबोधित करतानाही केला होता. स्वातंत्र्यानंतर दिल्लीतील एका संघ कार्यक्रमात सहभागी होताना त्यांनी हा संदर्भ दिला. त्यावेळी स्वयंसेवकांना संबोधित करताना गांधीजी म्हणाले होते की, “अनेक वर्षांपूर्वी मी वर्धा येथे संघाच्या एका शिबिरात गेलो होतो. तेथील स्वयंसेवकांची कडक शिस्त, साधेपणा आणि अस्पृश्यतेचे झालेले पूर्ण उच्चाटन पाहून अत्यंत प्रभावित झालो.”

यावरूनच असे स्पष्ट होते की, महात्मा गांधी त्याकाळातही संघाला एक शिस्तबद्ध संस्था मानत होते. मात्र, मल्लिकार्जुन खर्गे यांना आजही संघामध्ये ‌‘साप‌’ अर्थात, धोका दिसतो आहे. विशेष म्हणजे, सध्या संघ आपले शताब्दी वर्ष साजरे करत असून, संघाच्या विचारधारेवर चालणाऱ्या विविध संघटना सामाजिक जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात राष्ट्रहितासाठी अहोरात्र कार्यरत आहेत. संघपरिवार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या 40हून अधिक संघटना सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रात अहोरात्र कार्य करीत आहेत. राजकारणाच्या परिप्रेक्ष्यात विचार केल्यास, खर्गे यांच्या नेतृत्वाखाली असलेला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, आज अस्तित्वाच्या शोधात चाचपडताना दिसतो आहे. उलटपक्षी, भारतीय जनता पक्ष हा संघाच्या वैचारिक मार्गावर चालणारा पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, तसेच महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देशाला सातत्याने प्रगती आणि समृद्धीकडे नेण्याचे कार्य करीत आहे.

आज इराणबरोबर सुरू असलेल्या अमेरिका-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जगातील अनेक देश इंधनटंचाईचा सामना करत असताना, भारतावर त्याचा परिणाम नाममात्र स्वरूपाचा जाणवतो आहे. तरीही, मणिशंकर अय्यर, दिग्विजय सिंह आणि सॅम पित्रोदा यांसारख्या काँग्रेस नेत्यांना, संघ अजूनही धोकादायकच वाटत आहे. यामागे कारण असे की, संघाच्या प्रभावामुळेच आज काँग्रेस सत्तेबाहेर आहे आणि निकटच्या भविष्यात सत्तेत पुनरागमनाची काँग्रेसची शक्यताही अत्यंत क्षीण झालेली दिसत आहे. कदाचित, याच कारणामुळे या नेत्यांमध्ये अस्वस्थता कायम असल्याचे दिसते.

मल्लिकार्जुन खर्गे यांसारखे नेते का कोण जाणे ही बाब लक्षात घ्यायला तयार नाहीत की, त्यांच्या पूर्वसूरी काँग्रेस नेत्यांनी संघावर तीनवेळा बंदी घालत, त्याला नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, प्रत्येक वेळी संघ अधिक सक्षम होऊनच पुढे आला. पहिल्यांदा ही बंदी महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर लादण्यात आली होती. स्वातंत्र्यानंतर अवघ्या एका महिन्यातच दि. 16 सप्टेंबर 1947 रोजी दिल्लीतील संघ शिबिराला भेट देऊन, गांधीजींनी संघाचे कौतुक केले होते. तथापि, महात्मा गांधी यांच्या हत्येचा लावलेला घृणास्पद आरोप संघावर टिकू शकला नाही कारण, त्यांचे मारेकरी नथूराम गोडसे यांचा संबंध हिंदू महासभेशी होता, संघाशी नव्हे. त्याकाळातील काँग्रेस नेते ही वस्तुस्थिती मान्य करण्यासच तयार नव्हते तरीही, न्यायालयाने या आरोपातून संघाची निर्दोष मुक्तता केली आणि अखेर सरकारला बंदी उठवावी लागली. राष्ट्रसेवेत सातत्याने रत राहण्याचेच फलित म्हणून, 1962च्या भारत-चीन युद्धकाळातील संघ स्वयंसेवकांची उल्लेखनीय सेवा पाहून, तत्कालीन पंतप्रधान आणि संघाचे कट्टरविरोधक समजले जाणाऱ्या जवाहरलाल नेहरू यांनाही संघाबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन बदलावा लागला होता.

त्यानंतर दि. 26 जानेवारी 1963च्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये सहभागी होण्यासाठी संघाच्या स्वयंसेवकांना आमंत्रित करण्यात आले. त्या संचलनात संघाचे तीन हजारांहून अधिक गणवेशधारी स्वयंसेवक, आपल्या बॅण्डसह सहभागी झाले होते. त्यांच्या या सहभागामुळे देशातील इतर नेत्यांचाही संघाकडे बघण्यचा दृष्टिकोन बदलला होता. त्यावेळी मल्लिकार्जुन खर्गे यांचे वय सुमारे 21 वर्षे असावे. त्यांनी त्याकाळातील वृत्तपत्रांतून या घटनेविषयी निश्चितच वाचले असेल. तरीही, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर त्यांना संघ जर धोकादायक वाटत असेल, तर त्यांनीच याचा विचार करावा; ते योग्य आहेत की, जवाहरलाल नेहरू योग्य होते.

1948 नंतरही संघावर आणखी दोन वेळा बंदी घालण्यात आली. एकदा आणीबाणीच्या काळात, तर दुसऱ्यांदा अयोध्येतील बाबरी मशीद पाडल्याच्या घटनेनंतर. आणीबाणीच्या काळात पाठीचा कणा ताठ असलेल्या प्रत्येकानेच, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आणीबाणी लावण्याच्या भूमिकेचा कडाडून विरोध केला होता. विरोध करणाऱ्या अशा सर्वांनाच विरोधक ठरवून, त्यावेळी इंदिरा गांधी यांच्या सरकारने तुरुंगात टाकले. या दडपशाहीचेच फलित म्हणजे, 1977च्या सार्वत्रिक निवडणुकीत इंदिरा गांधींना पराभव पत्करावा लागला आणि देशात प्रथमच बिगरकाँग्रेस सरकार सत्तेवर आले. यावेळी घातलेल्या बंदीनंतरही, संघ अधिकच सक्षम होऊन पुढे आला आणि 1980 साली त्याच्याच पोटी भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली, जी मागील 12 वर्षांपासून देशाचे नेतृत्व करत आहे.

संघावर तिसरी बंदी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी, 1992 मध्ये अयोध्येतील बाबरी पाडण्याच्या घटनेनंतर घातली. या बंदीमुळे संघाच्या वैचारिक पायाला अधिकच विस्तार मिळाला, तर काँग्रेसला देशाच्या राजकारणामध्ये कुबड्यांची आवश्यकता भासू लागली.

आजही कुबड्यांच्या आधारावरच प्रवास करणाऱ्या काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना संघ धोकादायक वाटत असून, त्याला चिरडण्याची भाषा अनेकवेळा केली जात आहे. मात्र, भूतकाळातील अनुभव लक्षात घेता, संघ आणि भाजपला ‌‘अच्छे दिन‌’ येण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे, तर ज्या आसाममध्ये खर्गे यांनी संघाला ‌‘साप‌’ म्हणून जी चिरडण्याची भाषा केली, तेथेच काँग्रेसला सलग तिसऱ्यांदा पराभव पत्करावा लागण्याची चिन्हे दिसत आहेत. जर काँग्रेस नेतृत्वाची भूमिका अशीच कायम राहिली, तर ‌‘काँग्रेसमुक्त भारत‌’ हा नारा स्वतः काँग्रेसचेच विद्यमान नेतृत्व साकार करेल, असे चित्र सध्या आहे.

- आचार्य पवन त्रिपाठी
(लेखक श्री सिद्धिविनायक मंदिर, मुंबईचे कोषाध्यक्ष आणि मुंबई भाजपचे महामंत्री आहेत.)