सुंदर चित्रे ही मनमोहक असतात, मनाला आनंद देतात. अशी चित्रे संग्रही ठेवण्यासाठी अनेक लिलाव होतात. अनेक दिग्गजांच्या चित्रांना येथे योग्य किंमत मिळते, सन्मान मिळतो. अशाच अलीकडे झालेल्या एका लिलावात एका चित्राला मिळालेली किंमत आणि त्याचे चित्रकार राजा रवी वर्मा यांचे नाव चर्चेत आले. राजा रवी वर्मा यांचे नाव भारतीय चित्रकलेमध्ये कायमच अग्रणी राहिले आहे. या लिलावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय चित्रकलेमधील राजा रवी वर्मा यांच्या योगदानाचा घेतलेला मागोवा...
अलीकडे समाजमाध्यमांवर एक बातमी फारच वेगाने प्रसिद्ध झाली, ती म्हणजे राजा रवी वर्मा यांच्या ‘यशोदा आणि कृष्ण’ या चित्राला 167.2 कोटी अशी विक्रमी किंमत मिळाली. या घटनेमुळे राजा रवी वर्मा हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले. डोळे बंद करून आपण हिंदू देवींचे रूप डोळ्यांसमोर आणले जसे की माता पार्वती, लक्ष्मी किंवा देवी सरस्वती, तर आपल्यासमोर जे रूप येते, त्यात असलेली एक कमालीची समानता म्हणजे या देवींना लाभलेले दृश्यरूप एकाच चित्रकाराच्या कल्पनेतून साकार झाले आहे. हे तेच चित्रकार आहेत ज्यांच्यामुळे हिंदू देवी-देवतांच्या प्रतिमा, भारतातील घराघरांत पाहायला मिळतात. कारण, त्यांनीच हिंदू देवी-देवतांच्या मूतना, वास्तववादी शैलीत चित्ररूप दिले. त्या चित्रकारांचे नाव म्हणजे राजा रवी वर्मा होय!
रवी वर्माच्या चित्रांचा प्रभाव भारतीय चित्रपट, जाहिरात क्षेत्रासोबतच पोशाख शैली आणि भारतातील सर्वाधिक खपाचे कॉमिक्स ‘अमर चित्र कथा’वरही पाहायला मिळतो. केरळम्मधील त्रिवेंद्रमजवळच्या किलिमन्नूर गावामध्ये, एप्रिल 1840 मध्ये राजा रवी वर्माचा जन्म एका विद्वान परिवारात झाला. ’बाळाचे पाय पाळण्यातच दिसतात’ या म्हणीप्रमाणेच, अगदी लहान वयातच कोळसा आणि राखेपासून ते भिंतीवर सुरेख चित्र रेखाटत असत अन् त्यांच्यातील हा कलागुण त्यांच्या काकांनी अचूक हेरला. त्रावणकोर राजघराण्याशी नातेसंबंध असल्याने, काकांनी रवी वर्मा यांना राजदरबारी राजघराण्यातील व्यक्तींची चित्रे काढण्यासाठी आलेल्या पाश्चिमात्य चित्रकारांना चित्र रेखाटताना पाहण्याची संधी मिळवून दिली. या चित्रकारांची वास्तववादी चित्रशैली आणि विशेषतः तैलरंग, यांचा रवी वर्मा यांच्यावर फारच प्रभाव पडला. यापैकी एक सुप्रसिद्ध डच चित्रकार ‘थिओडोर जेन्सन’ यांच्या चित्रपद्धतीने ते विशेष प्रभावित झाले. थिओडोरच्या कामातून ते तैलरंगातील बारकावे शिकले आणि कमी वयातच तैलरंगावर त्यांनी चांगलेच कसब मिळवले.
त्याकाळी केरळम्मध्ये भित्तिचित्रांची एक वेगळीच शैली होती. परंतु, रवी वर्मा यांनी पश्चिमी वास्तववादी शैलीलाच भारतीयत्वाचा साज चढवला. पश्चिमी आणि भारतीय शैलीतील तंत्र एकत्रीकरणातून, तैलरंगात चित्र करणारे ते पहिलेच भारतीय चित्रकार ठरले.
1881 मध्ये बडोद्याचे गायकवाड सयाजीराजे तृतीय यांचे व्यक्तिचित्र त्यांनी साकारले. त्यावेळी रवी वर्मा यांना कामात व्यत्यय नको म्हणून, त्यांच्या सोयीसाठी तिथे एक खास स्टुडिओची निर्मिती करण्यात आली होती. त्यानंतर ते संपूर्ण भारतवर्षातील राजघराण्यांमध्ये चित्रकार म्हणून प्रसिद्ध झाले. त्यानंतर रवी वर्मा यांनी अनेक राजे आणि राजघराण्यांतील व्यक्तींची व्यक्तिचित्रे रंगविली.राजघराण्यातील व्यक्तींची चित्रे करण्यासोबतच त्यांनी ‘रामायण’, ‘महाभारत’ आणि पुराणातील कथांवरही आधारित चित्रे काढली. 19व्या शतकात त्यांनी रंगवलेली हिंदू देवी-देवतांची चित्रे, आजही प्रसिद्ध असून, ती चित्रेच त्या देवी-देवतांची खरी ओळख बनून राहिली आहेत. व्हिक्टोरीयन शैलीत रंगवलेले, सावळी काया असलेले विष्णू आणि कृष्ण यांच्या वर्णाकरिता त्यांनी निळ्या छटा वापरल्या आहेत. आज निळ्या रंगातील कृष्ण अणि विष्णू यांना आपण सर्वांनी सहज स्वीकारले असून, आज सर्वत्र त्याच प्रकारच्या प्रतिमा दिसतात.संपूर्ण आयुष्यभरात रवी वर्मा यांनी दोन हजारहून अधिक चित्रे रंगविली आहेत.
एक काळ असा आला की, त्यांच्याकडे प्रचंड काम होते, जे पूर्ण करणे कठीण होऊ लागले. त्यावेळी त्यांनी तंत्रज्ञानाचा आधार घेत, भावाच्या मदतीने त्याकाळी प्रसिद्ध होत असलेली ल्थोिग्राफिक प्रेस मुंबईत सुरू केली. या प्रेसमुळे त्यांची ‘महाभारत’, ‘रामायण’, पुराणातील चित्रे, देवी-देवतांची चित्रे घराघरांत पोहोचली आणि त्यासोबत रवी वर्मा यांचे नावदेखील. जातिपातीमुळे, अस्पृश्यतेमुळे ज्यांना देवळात जाता येत नसले, आता त्यांनाही देवांच्या प्रतिमा घरात आणता आल्या. माचीसची डब्बी ते जाहिरातीची पत्रके सगळीकडे रवी वर्मा यांचीच चित्रे त्याकाळी झळकत होती.
रवी वर्मा यांच्या कलासाधनेची अनेकांनी दखल घेतली. अनेक मान-सन्मान त्यांना मिळत होते. त्यांची चित्रे देश-विदेशातही प्रशंसा आणि पारितोषिकांची मानकरी ठरत होती. 1873 मध्ये व्हिएन्नामध्येही त्यांच्या कलेला पारितोषिक मिळाले. 1893 मध्ये ‘वर्ल्ड्स कोलम्बियन एक्सपोसिशन’मध्ये त्यांना, दोन ‘सुवर्णपदके’ मिळाली.
एवढे अनन्यसाधारण कार्य करूनही अनेकदा त्यांच्यावर टीका झाली. त्यांच्या चित्रांवरून अनेकदा विवादही उभे राहिले. त्याकाळी अनेकांच्या मान्यतांनुसार त्यांनी उर्वशी, मेनका यांसोबतच इंद्र पत्नी शचीच्या विषयांवर केलेल्या चित्रांत नग्नता दर्शविली होती. रवी वर्मा यांनी चितारलेल्या ‘मत्स्यगंधा’ या चित्रावर तर प्रचंड टीका झाली. याचेच पडसाद म्हणून, संतप्त जमावाने त्यांची प्रेस पेटवली होती. त्यांच्या कलेचे कितीही टीकात्मक मूल्यमापन झाले असले, तरीही भारतीय आधुनिक कलेत त्याचे महत्त्व अनन्यसाधारच आहे. भारतात कलावितरणाची खरी सुरुवात त्यांच्यापासूनच झाली, असे म्हणायला हरकत नाही.
त्यांनी चित्रकलेत रुची असलेल्या अनेक युवकांना प्रेरित केले. या अशा अनेक कारणांमुळेच, त्यांना भारतीय आधुनिक कलेचे जनक म्हटले गेले.
दि. 1 एप्रिल 2026 रोजी ‘स्याफ्रान आर्ट’च्या लिलावात, राजा रवी वर्मा यांनी चितारलेल्या ‘यशोदा आणि कृष्ण’ या चित्राला, तब्बल 162.2 कोटी एवढी किमत मोजून, ‘सिरम इन्स्टिट्यूट’चे मालक सायरस पूनावाला यांनी त्यांच्या संग्रहासाठी खरेदी केले. काही महिन्यांपूव एम. एफ. हुसेन यांच्या ‘ग्राम यात्रा’ या चित्रालाही, 118 कोटीची विक्रमी किंमत मिळाली होती. इतक्या कमी दिवसांत हा विक्रम मागे पडला. 1980 मध्ये राजा रवी वर्मा यांच्या ‘राधा ईन मून लाईट’ या चित्रालाही 20 कोटींची विक्रमी किंमत मिळाली होती. भारतीय दृककलेत नवनवीन प्रयोगासोबतच, आर्थिक घडामोडीचे नवे अध्याय लिहिले जात आहेत ते पाहता, ही भारतीय कलेच्या सुवर्णकाळाची सुरुवात आहे, असे वाटते.
प्रा. गणेश हिरे
(लेखक प्रख्यात चित्रकार आहेत.)