इतिहासाचा अभ्यास करताना आपल्याला शिल्पांचा अभ्यास मोठाच ज्ञानसाठा ठरतो. अशी शिल्पे मिळणारे प्रमुख ठिकाण म्हणजे प्राचीन मंदिरे. या ठिकाणी मंदिरांवरील स्थापत्यकलेतून त्या त्या काळातील इतिहासाचा मागोवा घेणे शक्य होते. नाशिकजवळ असलेल्या झोडगे गावातील श्री माणकेश्वर मंदिराच्या सौंदर्याचा स्थापत्यकलेच्या दृष्टिकोनातून घेतलेला मागोवा...
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात, मुंबई-आग्रा महामार्गावर, मालेगावपासून सुमारे 30 किलोमीटरवर आणि धुळ्यापासून अलीकडे 20 किलोमीटरवर, एका टेकडीच्या पायथ्याशी झोडगे गावाचे माणकेश्वर मंदिर उभे आहे. पहिल्या नजरेत साधे भासणारे हे शिवमंदिर, जवळून पाहताना बेसाल्टच्या दगडात कोरलेल्या सूक्ष्म कलाकुसरीमुळे आणि संतुलित स्थापत्यरचनेमुळे पाहाणाऱ्याला आश्चर्यचकित करते.
या मंदिराचा ऐतिहासिक संदर्भ समजून घेण्यासाठी, मध्ययुगीन दख्खनकडे पाहणे आवश्यक आहे. साधारण दहाव्या-11व्या शतकात या संपूर्ण भागात, मोठ्या प्रमाणात मंदिरांची रचना केली गेली. त्याचे श्रेय हे बहुतांशी शिलाहार व यादव या दोन घराण्यांनाच द्यावे लागेल. नाशिक हा यादवांचा मूळ प्रदेश मानला जातो. या भूमीवर उभारलेल्या मंदिरांना ज्येष्ठ मूर्तिशास्त्र अभ्यासक डॉ. गो. बं. देगलुरकर आणि डॉ. शां. भा. देव यांनी, ‘डेक्कन नागर शैली’ म्हणून संबोधले. झोडगेचे माणकेश्वर मंदिर याच परंपरेचा एक महत्त्वाचा दुवा आहे. 12व्या शतकात बांधलेले भूमिज शैलीचे हे एक उत्कृष्ट उदाहरण.
भूमिज शैलीचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे शिखर. मध्यवत चौरस आराखडा उंचीप्रमाणे फिरवत नेला जातो आणि चारही बाजूंवर लघू-शिखरांच्या उभ्या-आडव्या रांगा कोरल्या जातात. या लघू-शिखरांना ग्रंथांत ‘कूटस्तंभ’ म्हणतात. डॉ. देगलुरकर यांनी आपल्या ’टेंपल आर्किटेक्चर आणि स्क्लप्चर ऑफ महाराष्ट्र’ या ग्रंथात, माणकेश्वर मंदिराचा उल्लेख भूमिज शैलीचे एक सुंदर उदाहरण म्हणून केला आहे. मंदिराच्या शिखरावर सोळा ‘कीर्तिमुखे’ कोरलेली असून, हिऱ्याच्या आकाराच्या जाळ्यांमध्ये पुरुषाकृती असलेली मुखे मंदिराला एक वैशिष्ट्यपूर्ण ओळख देतात.
मंदिराची योजना त्रिदल अर्थात तीन गर्भगृहांनी युक्त आहे. गर्भगृह, अंतराळ, अर्धमंडप आणि सभामंडप यांची क्रमिक मांडणी केवळ वास्तुशास्त्रीय नाही; ती बाह्य जगातून अंतर्मुखतेकडे नेणारी आध्यात्मिक यात्राच आहे. गर्भगृह आणि सभामंडप यांच्यामध्ये एक कासवाचे शिल्प कोरलेले असून , त्यातून ‘विकारवृत्ती आत ओढावी, मग पुढे जावे’ ह एक प्रतीकात्मक संदेश देण्यात आला आहे. मंदिराचे पश्चिमाभिमुख असणे येथे विशेष ठरते. त्यामुळे सूर्यास्ताच्या वेळी किरणे थेट गर्भगृहात शिरतात आणि शिवलिंगावर एक अपूर्व प्रकाश पडतो.
बाह्य भिंतींवरील शिल्पे या मंदिराला एक वेगळीच उंची देतात. शिकारीचे प्रसंग, नर्तक, अप्सरा, संगीतकार, व्याल, कीर्तिमुख हे सारे दगडात जिवंत केले आहे. अष्टदिक्पाल मंदिराच्या कर्णांवर कोरलेले असून त्यांच्या हत्ती, मगर, हरीण आदी वाहनांमुळे मंदिर एक संरक्षित विश्व बनते. मंदिरात पक्ष्यांसाठी पाण्याचे हौद आढळतात. बांधकामाच्या वेळी नैसर्गिक परिसराला धक्का न देण्याची काळजी घेण्यात आली होती, हेच यातून दिसते.
यादव काळातील मंदिर-स्थापत्याच्या क्रमिक विकासात, 1150-1200च्या काळातील मंदिरे बाहेरून अधिक संयमित असत. प्राणी-प्रतिमा प्रामुख्याने दरवाजाच्या चौकटी आणि खांबांवर सीमित राहत. माणकेश्वर या टप्प्याचे प्रतिनिधित्व करते. मंदिरासमोर भूमिज शैलीतीलच एक पडके सरस्वती मंदिर आहे. हे एकत्रित संकुल सांगते की, हा केवळ एकटा शैव उपासनेचा बिंदू नव्हता, तर एक बहुदेवता धार्मिक केंद्र होते.
मंदिराच्या उलट्या नागफण्याच्या खांबावरील रचनेचा उल्लेख करायलाच हवा, ज्याचे सर्वात सुरुवातीचे उदाहरण वाघिलीच्या सिद्धेश्वर मंदिरात (इ.स. 1069) सापडते; नंतरच्या काळात हीच रचना सिन्नर, झोडगे, पटणे, मंडवगाव, अंजनेरी आणि इतर मंदिरांवरही दिसते. ही रचना एक प्रादेशिक शैलीगत सूत्र म्हणून यादव मंदिरांना एकत्र बांधते.
या मंदिरातल्या काही शिल्पांचा परिचय आपण करून घेऊयात. मंदिरातल्या बाह्य भिंतीवर असणाऱ्या शिल्पांची परिस्थिती ही फार चांगली नसली, प्रचंड तोडफोड झालेली असली; तरीही त्यातले सौंदर्य आपल्याला मोहून टाकणारे आहे.
प्रदक्षिणा पथावर चामुंडेचे शिल्प दिसते. पाय आणि चेहरा भग्न झालेला असून, शरीराचा भागदेखील जीर्ण झालेला दिसतो. पण, या शिल्पात चामुंडेच्या गळ्यातील नरमुण्ड माला आणि हातातला डमरू स्पष्ट दिसतो. शरीराची आणि पायाची ठेवण यावरूनच चामुंडा ही नृत्यमुद्रेत असावी, असादेखील अंदाज आहे.
त्याच रेषेत जे मोठे देवकोष्ठ आहे म्हणजेच, बाहेरच्या भिंतीवर देव्हाऱ्यासारखा जो भाग आहे, तिथे शिवाचे ‘त्रिपुरांतक’ रूप बघायला मिळते. तारकासुराच्या वद्युन्मली, तारकाक्ष आणि कमलाक्ष या तीन मुलांना ब्रह्मदेवांकडून वरदान मिळाले आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात तीन नगरे होऊन, सर्वांना त्रास द्यायला सुरुवात केली. मग शिवाने एका विशिष्ट बाणाने हे तीनही असुर नगर रूपात एका रेषेत आल्यावर यांना मारले, ती कथा म्हणजे ‘त्रिपुरांतक.’ याच कथेमध्ये शिव हा महादेव होतो.
या शिल्पात तुम्हाला शिव दिसेल आणि वर तीन घरांसारख्या आकृती दिसतील. शिवाने खूप कमी वेळेला युद्धात धनुष्यबाण वापरले आहे, हा त्यातलाच एक प्रसंग. शिवाचे अवकाशाकडे बघणे, वर असणारी आकृती यांच्यावरून आपण या शिल्पाची ओळख पटवू शकतो.
यादव काळातील मंदिरांचे शिल्पकाम किती उत्कृष्ट होते, हे त्यांच्या शिव मंदिरांसमोरील महाकाय नंदींवरून दिसते. माणकेश्वरसमोरील भव्य, शांत आणि मंदिराशी एकरूप असलेला नंदी हे त्याचेच एक प्रत्यंतर. आज हे मंदिर भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने, राष्ट्रीय महत्त्वाचे संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. परंतु, संरक्षणाचा कागद आणि प्रत्यक्षातील जतन यांमध्ये अजूनही अंतर आहे. मंडपाचे आणि अर्धमंडपाचे छत आता नसून, जे उरले आहे तेच अपूर्व आहे.
झोडगेचे माणकेश्वर मंदिर ही केवळ एक वास्तू नाही, तर तो 12व्या शतकातील एका शिल्पकाराने आजच्या प्रवाशाशी साधलेला एक संवाद आहे. त्याने भूमिज शैलीत जे दगडात कोरले, ते काळाने कधीही पुसले नाही.
झोडगेचे शांत वातावरणात, ‘जटुंबा’ टेकडीच्या पायथ्याशी सूर्यास्ताच्या सोनेरी प्रकाशात जेव्हा पश्चिमाभिमुख गर्भगृहात शिवलिंगावर अखेरचा प्रकाश पडतो, तेव्हा जाणवते की हे मंदिर बांधणाऱ्या हातांनी केवळ दगड घडवला नव्हता; त्यांनी काळाला आकार दिला होता.
- इंद्रनील बंकापुरे
7841934774