युद्धज्वराची महागडी किंमत!

    12-Apr-2026   
Total Views |

इराण आणि अमेरिकेतील युद्धाचे परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेला प्रभावित करणारे ठरले आहेत. युद्ध म्हटले की, त्याची आर्थिक गणिते येणारच. इराण आणि अमेरिकच्या या युद्धात इराणच्या तुलनेने अल्पखर्चिक असलेल्या शस्त्रांचे उत्तर देण्यासाठी, अमेरिकेला दीर्घकाळ मोठा खर्च करावा लागल्याने अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर ताण येण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना लागण झालेला युद्धज्वराचा अमेरिकेला मोठाच आर्थिक फटका बसताना दिसत आहे. जागतिक स्थितीतील या सर्व घडामोडींचा घेतलेला मागोवा...

फेब्रुवारीच्या शेवटाला सुरू झालेला अमेरिका आणि इराण संघर्ष, अल्पावधीतच आधुनिक इतिहासातील सर्वात खर्चिक युद्धांपैकी एक ठरला. यात सहभागे देशांचे भांडवल मोठ्या प्रमाणात खच पडले. मागील काही दशकांतील दहशतवादविरोधी कारवायांपेक्षा हे युद्ध पूर्णपणे वेगळे असून, ते औद्योगिक युद्धाच्या स्वरूपात लढले जात आहे. यामध्ये प्रचंड प्रमाणात झालेल्या दारुगोळ्यांच्या वापराने, उच्च-मूल्य असलेल्या सामरिक साधनांची हानी झाली. परिणामी, जागतिक तसेच अमेरिकेच्या देशांतर्गत अर्थव्यवस्थेवर त्याचे गंभीर परिणाम दिसत आहेत.

पेंटागॉनने आधीच कमी झालेले शस्त्रसाठे भरून काढण्यासाठी आणि प्रत्यक्ष लढाईचा खर्च भागवण्यासाठी, 200 अब्ज डॉलर्सच्या अतिरिक्त संरक्षण अंदाजपत्रकाची मागणी केली आहे. यामुळे या युद्धाचा वित्तीय प्रवास अभूतपूर्व ठरत आहे. शस्त्रास्त्रे, प्लॅटफॉर्म्स, प्रादेशिक पायाभूत सुविधा आणि व्यापक आर्थिक परिणाम यांमधील खर्चाचा सविस्तर आढावा खाली दिला आहे.

शस्त्रे आणि दारुगोळ्यांची झळ : या युद्धाच्या अत्यंत प्रचंड खर्चामागील मुख्य कारण म्हणजे, स्वस्त इराणी प्रक्षेपण प्रणाली आणि त्यांना निष्प्रभ करण्यासाठी लागणाऱ्या महागड्या अमेरिकन ‌‘इंटरसेप्टर्स.‌’ ही असममित झीज अमेरिकन खजिन्याला वेगाने रिकामे करणारी ठरत आहे.

क्षेपणास्त्रांचा वापर : अमेरिकेच्या नौदल आणि हवाई दलाने इराणच्या एकात्मिक हवाई संरक्षण प्रणालीला निष्क्रिय करण्यासाठी आणि संरक्षणात्मक बंकरमध्ये असलेल्या ‌‘आयआरजीसी‌’ सुविधांवर हल्ले करण्यासाठी हजारो किमती क्रूझ क्षेपणास्त्रे डागली.

‘टॉमहॉक लॅण्ड अटॅक मिसाईल्स‌’ : प्रत्येक टॉमहॉक क्षेपणास्त्राची किंमत सुमारे दोन दशलक्ष डॉलर्स इतकी आहे. आतापर्यंतच्या युद्धात हजारो क्षेपणास्त्रे डागल्यामुळे, त्यांचा खरेदी खर्च एकटाच चार ते सहा अब्ज डॉलर्सच्या पुढे गेला आहे.

इंटरसेप्टर्स (एसएम-3 आणि एसएम-6): लाल समुद्र आणि अरबी समुद्रातील कॅरिअर स्ट्राईक ग्रुप्सना इराणी ‌‘बॅलिस्टिक‌’ आणि जहाजविरोधी क्षेपणास्त्रांपासून वाचवण्यासाठी, स्टॅण्डर्ड मिसाईल्सचा वापर करावा लागला आहे. एका एसएम-3 इंटरसेप्टरची किंमत प्रत्येकी 10 ते 28 दशलक्ष डॉलर्सदरम्यान असून, उच्च तीव्रतेच्या हल्ल्यांदरम्यान केवळ नौदल हवाई संरक्षणावरच एका आठवड्यात अमेरिकेने, एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त खर्च केल्याची नोंद आहे. अमेरिकेच्या अतिशय महागड्या ‌‘एअरक्राफ्ट कॅरिअर स्ट्राईक ग्रुप‌’चे संरक्षण करण्यासाठी, त्यापेक्षा अजून जास्त महाग क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला आहे.

पॅट्रियट आणि थाड : खाडीतील तळांचे संरक्षण करणाऱ्या जमिनीवर आधारित बॅटरींमध्ये, प्रत्येकी चार दशलक्ष डॉलर्स किमतीची ‌‘पॅट्रियट‌’ क्षेपणास्त्रे वापरली जातात, तर ‌’थाड‌’ इंटरसेप्टरची किंमत प्रत्येकी साधारण 12.6 दशलक्ष डॉलर्स आहे. आखाती देशांतील अमेरिकेचे लष्करी तळाचा वापार अमेरिका व्यवस्थित करूच शकली नाही. उलट, ही लष्करी तळे इराणसाठी अगदी जवळची आणि तयारच असलेली प्रहाराची लक्ष्ये बनली.

ड्रोनमधील विषमता : इराणकडून वापरल्या जाणाऱ्या आत्मघातकी ड्रोन, ज्यांची किंमत 20 हजार ते 50 हजार डॉलर्सदरम्यान आहे. मात्र, त्यांना पाडण्यासाठी अमेरिकेला जे इंटरसेप्टर्स वापरावे लागतात, ते ड्रोनच्या किमतीपेक्षा 80 ते 100 पटीने महाग आहेत. हा किंमत-विनिमय गुणोत्तर व्यवहार्य नाही.

इराणने याच ड्रोन्सच्या झुंडीचा एकत्र वापर करुन, अमेरिकेच्या महागड्या ॲन्टी-एअरक्राफ्ट संरक्षण प्रणालीला मोठ्या प्रमाणात महागडी शस्त्रे वापरण्याकरता भाग पाडले.

विभागनिहाय लष्करी तोटा : हवाई शक्ती आणि पायाभूत सुविधा : या युद्धात व्हिएतनाम युद्धानंतर प्रथमच, अमेरिकेची प्रगत लढाऊ विमाने लढाईत गमावली गेली.

याचा अर्थ असाच की, महागडी लढाऊ विमाने आणि तुलनेने स्वस्त ॲन्टी-एअरक्राफ्ट क्षेपणास्त्रे यांच्या या लढाईत, ॲन्टी-एअरक्राफ्ट क्षेपणास्त्रांनीच बाजी मारल्याचे दिसते.

1.5 ते दोन अब्ज डॉलर्सच्या थेट विमानफ्रेम नुकसानीव्यतिरिक्त, तैनातीचा खर्चदेखील प्रचंड आहे. एकच ‌‘कॅरिअर स्ट्राईक ग्रुप‌’ चालवण्याचा खर्च दिवसाला अंदाजे सहा ते दहा दशलक्ष डॉलर्स इतका आहे. अरबी समुद्र आणि लाल समुद्रात अनेक ‌‘कॅरिअर स्ट्राईक ग्रुप‌’ सतत तैनात असल्याने, केवळ नौदलाच्या मोहिमेवरच अमेरिकेचा दरमहा एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त खर्च होत आहे.

दीर्घकाळ तैनात राहिल्यामुळे एअरक्राफ्ट कॅरिअरवरील सैनिक खूपच थकले असून, त्यांचे मनोबलही खच्ची झाले आहे. अशा खच्ची झालेल्या सैनिकांनीच कदाचित एअरक्राफ्ट कॅरिअरला आग लावली असावी.

तळ पायाभूत सुविधा आणि हानी : बहारीनमधील अमेरिकन पाचव्या ताफ्याच्या मुख्यालयावर आणि सौदी अरबमधील ‌‘प्रिन्स सुलतान‌’ हवाईतळावर झालेल्या इराणी प्रत्युत्तरात्मक क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे हँगर, इंधन साठे आणि विशेष दुरुस्ती सुविधा यांना शेकडो दशलक्ष डॉलर्सचे नुकसान झाले आहे. या हल्ल्यांमध्ये नुकसानीस गेलेले ‌‘गोल्डन डोम‌’ किंवा ‌’एजेस अशोर'सारख्या विशेष घटकांची पुनर्स्थापना करणे केवळ आर्थिक ओझेच नाही, तर पुरवठा साखळीमधीलही मोठा अडथळा आहे.

अप्रत्यक्ष आर्थिक परिणाम : महागाई आणि वाढ

हे युद्ध आता केवळ मर्यादित लष्करी घटना राहिलेले नाही; ते एक गंभीर देशांतर्गत आर्थिक संकट बनले आहे.

ऊर्जादर : अमेरिकेत पेट्रोलच्या किमती जवळपास 33 टक्क्यांनी वाढल्या असून, सरासरी 2.98 डॉलर्स प्रतिगॅलनवरून काहीच आठवड्यांत जवळपास चार डॉलर्स प्रतिगॅलनपर्यंत पोहोचल्या आहेत. डिझेल आणि जेट इंधनाच्या किमतीही आणखी तीव्र वाढल्या आहेत. यामुळे लॉजिस्टिक्स आणि ग्राहक वस्तूंच्या किमतींमध्ये थेट वाढ झाली आहे.

युद्ध अंदाजपत्रक विरुद्ध देशांतर्गत खर्च : चालू आर्थिक वर्षासाठी मागितलेले अतिरिक्त 200 अब्ज डॉलर्स आणि 2027 साठी प्रस्तावित 1.5 ट्रिलियन डॉलर्सचे संरक्षण अंदाजपत्रक, या दोहोंचा एकत्रित अर्थ भांडवलाच्या प्रचंड पुनर्वाटपाशी संबंधित आहे. हे निधी देशांतर्गत क्षेत्रांतून वळवले जात असल्यामुळे ‌‘मेडिकेड‌’, पायाभूत सुविधा आणि शिक्षण क्षेत्रातील संभाव्य कपातींचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

‌‘जीडीपी‌’ आणि महागाई : अर्थतज्ज्ञांनी 2026 साठी अमेरिकेच्या वाढीचा अंदाज 0.5 टक्क्यांनी कमी केला आहे, तर महागाईचा अंदाज 3.2 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. वित्तीय तूट, चालू खाते तूट आणि ऊर्जा तूट अशा त्रिगुणी तुटीत भर पडत आहे.

पुढील काही आठवड्यांचे अंदाज ःजर संघर्ष सध्या सारखाच अधिक एक महिन्यासाठी चालू राहिला, तर आर्थिक ओझे कमाल पातळीवर वाढेल.

थेट लढाईचा खर्च : मोहिमा आणि दारुगोळ्यावरचा वाढून, आणखी 30 ते 40 अब्ज डॉलर्सचा खर्च होऊ शकतो.

धोरणात्मक साठ्यांचा क्षय : काही प्रकारच्या इंटरसेप्टर्सची पातळी धोकादायकरीत्या कमी होण्याची शक्यता असून, त्यांना ते प्रमाण त्वरित, मोठ्या उत्पादनाद्वारे भरून काढावे लागेल. यासाठी अनुदानांच्या स्वरूपात आणखी दहा अब्ज डॉलर्स जाऊ शकतात.

जागतिक व्यापार ठप्प : जर होर्मुझ सामुद्रधुनीतील संघर्षस्थिती अशीच कायम राहिली, तर व्यापारातील व्यत्ययामुळे उत्पादकता प्रभावित होऊन, वाढलेल्या ‌‘शिपिंग विमा प्रीमियम‌’द्वारे अमेरिकन अर्थव्यवस्थेवर 100 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त भार येऊ शकतो.

निष्कर्ष ः इराणविरुद्धचे हे युद्ध अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचे चित्र बदलत आहे. या अतिशय महागड्या आणि प्रगत शस्त्रास्त्रांच्या युद्धामुळे, अमेरिका अवघ्या काही आठवड्यांत जणू अनेक वर्षांनी जमवायचे इतके शस्त्रसाठे उधळत आहे.
राजनैतिक मार्गाने तोडगा निघाला नाही, तर युद्धासाठी मागितलेले हे 200 अब्ज डॉलर्स फक्त सुरुवातीचेच पैसे ठरू शकतात. त्यामुळे अमेरिकेचा आर्थिक पुनरुज्जीवनाचा प्रयत्न अडथळ्यात येऊ शकतो आणि देशाचा अर्थसंकल्प कायमस्वरूपी जड, युद्धखच मार्गावर वळण्याची शक्यता आहे.

अमेरिकेने चालवलेल्या महाग आणि आधुनिक युद्धाला, इराणने स्वस्त शस्त्रे व साध्या तंत्रज्ञानाच्या जोरावर दिलेल्या उत्तरातून, या युद्धातून शस्त्रांच्या योग्य वापराबद्दल भारताला अनेक धडे मिळू शकतात. याबद्दल आपण पुढच्या लेखांमध्ये सविस्तर चर्चा करु.

हेमंत महाजन

लेखक निवृत्त ब्रिग्रेडियर असून भारतीय सैन्य दल, राष्ट्रीय सुरक्षा तसेच भारताचे परराष्ट्रीय संबंध या विषयांवर त्यांचा खास अभ्यास आहे. ‘आव्हान चिनी ड्रॅगनचे’, ‘नक्षलवादाचे आव्हान-चीनचे भारताशी छुपे युद्ध’ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.