‘अपोलो‌’चा वारसा आणि ‌‘आर्टेमिस‌’चे नवे युग

    12-Apr-2026
Total Views |

मानवाने पहिल्यांदा चंद्रावर पाऊल ठेवले, तो क्षण विज्ञानाच्या इतिहासातील सर्वात थरारक घटनांपैकी एक मानला जातो. 1969 मध्ये मानवाने पृथ्वीच्या पलीकडे जाऊन चंद्रावर उतरण्याचा पराक्रम केला आणि त्या क्षणाने विज्ञान, तंत्रज्ञान आणि मानवी कल्पनाशक्तीला एक नवीन दिशा दिली. परंतु, त्या महान कामगिरीनंतर जवळपास पाच दशकांहून अधिक काळ मानव पुन्हा चंद्रावर गेलाच नाही. आता मात्र ही परिस्थिती बदलत आहे. ‌‘नासा‌’च्या ‌‘आर्टेमिस‌’ मोहिमेमुळे, मानव पुन्हा चंद्रावर जाण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. या मोहिमेकडे, विशेषतः ‌‘अपोलो‌’ मोहिमेत काम केलेल्या वयोवृद्ध संशोधकांच्या नजरा लागल्या आहेत. त्यांनी आपल्या आयुष्यात, विज्ञानाच्या इतिहासातील महान क्षण अनुभवले आहेत आणि आता ते पुन्हा एकदा तोच उत्साह अनुभवण्याची आशा बाळगून आहेत.

‌‘अपोलो‌’ मोहिमेच्या काळात, सुमारे चार लाख लोकांनी एकत्रितपणे काम केले होते. त्याकाळात संगणक तंत्रज्ञान आजइतके प्रगत नव्हते, संप्रेषण प्रणाली मर्यादित होत्या आणि अंतराळ संशोधनातील अनेक गोष्टी प्रथमच विकसित केल्या जात होत्या. तरीही, या सर्व अडचणींवर मात करून संशोधकांनी चंद्रावर मानव उतरवण्याचे ध्येय साध्य केलेच. या महान कामगिरीमागे हजारो अभियंते, वैज्ञानिक, तंत्रज्ञ आणि साहाय्यक कर्मचाऱ्यांची मेहनत होती. आज या पिढीतील अनेक जण ऐंशी किंवा नव्वदीत पोहोचले आहेत. त्यांच्यासाठी ‌‘आर्टेमिस‌’ मोहीम ही केवळ वैज्ञानिक प्रकल्प नसून, त्यांच्या आयुष्यभराच्या स्वप्नाची पुढची पायरी आहे.

‌‘अपोलो‌’ मोहिमेत काम केलेले चाल मार्स यांच्यासारखे अनुभवी अभियंते सांगतात की, “त्याकाळात काम करताना एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती. प्रत्येकाला वाटत होते की, ते इतिहास घडवत आहेत. लोकांच्या मनात उत्कटता होती, उत्साह होता आणि विज्ञानाविषयी अपार श्रद्धा होती. आज विज्ञान अधिक प्रगत झाले आहे, तंत्रज्ञान अत्याधुनिक झाले आहे; परंतु त्याकाळातील जिद्द आणि सामूहिक स्वप्नांची ताकद वेगळीच होती.” या वयोवृद्ध संशोधकांच्या मते, ‌‘आर्टेमिस‌’ मोहिमेसाठीही तितकाच उत्साह आणि सार्वजनिक सहभाग आवश्यक आहे.

‌‘अपोलो‌’ मोहिमेतील आणखी एक महत्त्वाचे नाव म्हणजे जोआन मॉर्गन. ‌‘अपोलो 11‌’च्या प्रक्षेपणाच्या वेळी नियंत्रण कक्षात उपस्थित असलेल्या त्या एकमेव महिला होत्या. त्या सांगतात की, ‌’‌‘अपोलो‌’ मोहिमेतील शेवटच्या काही चंद्र मोहिमा आर्थिक कारणांमुळे रद्द करण्यात आल्या, ही खंत अजूनही त्यांच्या मनात आहे. त्या म्हणतात की, आता पुन्हा मानव चंद्रावर उतरेल, तो क्षण पाहण्याची त्यांची तीव्र इच्छा आहे. अनेक वर्षांपासून त्या या दिवसाची वाट पाहत आहेत.‌’

‌‘आर्टेमिस‌’ मोहिमेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, यावेळी महिलांची भूमिका अधिक प्रभावी आहे. ‌‘आर्टेमिस‌’ मोहिमेच्या प्रमुख पदांवर अनेक महिला कार्यरत आहेत. ‌‘आर्टेमिस-2‌’ मोहिमेत सहभागी होणाऱ्या अंतराळवीरांमध्ये, क्रिस्टिना कोच यांचा समावेश आहे. त्यांनी अंतराळात सलग 328 दिवस राहण्याचा विक्रम केला आहे. भविष्यात या मोहिमेद्वारे प्रथमच एखादी महिला चंद्रावर पाऊल ठेवेल, अशी अपेक्षा आहे. हा बदल विज्ञान क्षेत्रातील समावेशकतेचे प्रतीक मानला जातो.

‌‘आर्टेमिस‌’ मोहिमेचा उद्देश फक्त चंद्रावर मानव पाठवणे एवढाच मर्यादित नसून, या मोहिमेचा दीर्घकालीन उद्देश चंद्रावर कायमस्वरूपी संशोधन केंद्र उभारणे हा देखील आहे. विशेषतः चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर संशोधन करण्याच्या योजनेचा यात सहभाग आहे. या भागात बर्फाच्या स्वरूपात पाणी असण्याची शक्यता आहे. जर हे पाणी वापरण्यास योग्य ठरले, तर भविष्यात चंद्रावर दीर्घकालीन मानवी वस्ती उभारणे शक्य होऊ शकते.

चंद्रावरील पाणी हे केवळ पिण्यासाठी उपयोगी ठरणार नाही, तर त्यापासून ऑक्सिजन आणि हायड्रोजन निर्मिती होऊ शकते. या हायड्रोजनचा वापर इंधन म्हणून करता येणार असून, त्यामुळे चंद्रावरून पुढील अंतराळ मोहिमा, विशेषतः मंगळ मोहिमांसाठी चंद्र एक महत्त्वाचा ‌‘थांबा‌’ बनू शकतो. या दृष्टिकोनातून ‌‘आर्टेमिस‌’ मोहीम भविष्यातील अंतराळ संशोधनासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

या मोहिमेत रोबोट, ड्रोन आणि अत्याधुनिक रोव्हरचा वापर करण्यात येणार आहे. हे यंत्र चंद्रावरील माती, खडक, बर्फ आणि भूगभय रचना यांचा अभ्यास करतील. चंद्रावरील वातावरण, तापमानातील बदल आणि किरणोत्सर्ग यांचाही अभ्यास केला जाईल. या संशोधनामुळे भविष्यात चंद्रावर मानवी वास्तव्य सुरक्षित करण्यासाठीची आवश्यक माहिती मिळेल.

‌‘आर्टेमिस‌’ मोहिमेचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणज जागतिक स्पर्धा. आज अमेरिका आणि चीन यांच्यात चंद्रावर पुन्हा मानव पाठवण्याची शर्यत सुरू झाली आहे. अमेरिका 2028 पर्यंत चंद्रावर मानव उतरवण्याचे लक्ष्य ठेवत आहे, तर चीनने 2030 पर्यंत चंद्रावर पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या स्पर्धेमुळे अंतराळ तंत्रज्ञानाचा विकास वेगाने होण्याची शक्यता आहे.

‌‘अपोलो‌’ मोहिमेतील चाल ड्यूक सांगतात की, त्यांनी चंद्रावर पाऊल ठेवले, तेव्हा आताच्या जगातील अध लोकसंख्या जन्मलेलीही नव्हती. त्यामुळे नव्या पिढीसाठी चंद्रावर उतरण्याचा अनुभव पूर्णपणे नवीन असेल. या मोहिमेमुळे विज्ञानाविषयीची उत्सुकता पुन्हा वाढेल आणि अनेक तरुण संशोधन क्षेत्राकडे आकर्षित होतील. विज्ञानाच्या इतिहासात अशा मोठ्या मोहिमा केवळ तांत्रिक कामगिरी नसतात, तर त्या समाजाच्या विकासाला गती देतात. ‌‘अपोलो‌’ मोहिमेमुळे संगणक तंत्रज्ञान, दूरसंचार प्रणाली, वैद्यकीय उपकरणे आणि अनेक तांत्रिक नवकल्पना विकसित झाल्या. त्याचप्रमाणे ‌‘आर्टेमिस‌’ मोहिमेमुळेही नवीन तंत्रज्ञान विकसित होण्याची शक्यता आहे. आज अंतराळ संशोधन हे मानवाच्या भविष्याशी जोडले गेले आहे. पृथ्वीवरील संसाधने मर्यादित आहेत. हवामानबदल, लोकसंख्येत वाढ आणि संसाधनांची कमतरता यामुळे भविष्यात मानवाला पृथ्वीच्या पलीकडे विचार करावा लागेल. चंद्र हा त्या दिशेने पहिले पाऊल ठरू शकतो.

‌‘अपोलो‌’ मोहिमेतील वयोवृद्ध संशोधकांसाठी ‌‘आर्टेमिस‌’ मोहीम, ही त्यांच्या आयुष्याच्या कार्याची पुढची पायरी आहे. त्यांनी सुरू केलेला प्रवास पुन्हा सुरू होत आहे. त्यांच्यासाठी हा क्षण केवळ वैज्ञानिक नाही, तर भावनिकदेखील आहे. त्यांनी पाहिलेली स्वप्ने आता नव्या पिढीच्या हातून पूर्ण होताना पाहण्याची त्यांची इच्छा आहे.

मानवाच्या जिज्ञासेची ही कथा अजून संपलेली नाही. आकाशाकडे पाहताना प्रत्येक पिढीला नवे स्वप्न दिसते. ‌‘अपोलो‌’ मोहिमेने त्या स्वप्नांना आकार दिला असून, आता ‌‘आर्टेमिस‌’ मोहीम त्या स्वप्नांना पुढे नेणार आहे. चंद्रावर पुन्हा उमटणारी मानवी पावले केवळ विज्ञानाची कामगिरी ठरणार नाहीत, तर मानवाच्या धैर्याची, जिज्ञासेची आणि प्रगतीची नवी कहाणी लिहिणार आहेत. विज्ञानाच्या इतिहासातील नवे पान लिहिण्याची वेळ आता जवळ आली आहे.

एप्रिल 2026 मध्ये सुरू झालेल्या ‌‘आर्टेमिस-2‌’ मोहिमेत चार अंतराळवीर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या सीमेतून बाहेर पडून, चंद्राच्या दिशेने प्रवास करत आहेत. मोहिमेच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये अंतराळवीरांनी पृथ्वीपासून दूर जाताना, पृथ्वीचे दृश्य पाहिले आणि ते पाहून ते भावूक झाले. त्यांच्या मते, अंतराळातून पृथ्वी पाहताना ती एक लहान निळा गोळा वाटते आणि मानवजातीची एकात्मता अधिक स्पष्टपणे जाणवते. ही मोहीम चंद्रावर उतरणार नाही, तर अंतराळवीर चंद्राभोवती प्रदक्षिणा घालून पृथ्वीवर परत येतील. या मोहिमेचा उद्देश भविष्यातील चंद्र मोहिमांसाठी तांत्रिक चाचण्या करणे हा आहे. अंतराळयानातील जीवन-साहाय्यक प्रणाली, संप्रेषण व्यवस्था, दीर्घ अंतरावरील प्रवास आणि किरणोत्सर्ग यांसारख्या बाबींची चाचणी या मोहिमेत केली जात आहे. ‌‘आर्टेमिस-2‌’ मोहीम यशस्वी ठरल्यास, पुढील ‌‘आर्टेमिस-3‌’ मोहिमेद्वारे मानव पुन्हा चंद्रावर उतरेल. या मोहिमेचा उद्देश चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचा आहे. या भागात बर्फाच्या स्वरूपात पाणी असल्याचे संकेत मिळाले आहेत.

आकाशाकडे पाहताना चंद्र आजही तितकाच आकर्षक वाटतो. फरक एवढाच आहे की, आता मानव पुन्हा त्याच्याकडे जाण्यास सज्ज झाला आहे. ‌‘अपोलो‌’च्या आठवणींना उजाळा देत आणि भविष्याच्या नव्या स्वप्नांना दिशा देत ‌‘आर्टेमिस‌’ मोहीम मानवजातीच्या इतिहासात नवे पर्व सुरू करणार आहे.

- सुजाता बाबर
[email protected]