वांद्रे पश्चिमेत मुख्य जलवाहिनी फुटली; हजारो लिटर पिण्याच्या पाण्याची नासाडी, वाहतूक कोलमडली

    11-Apr-2026
Total Views |
water pipeline
 
मुंबई :(Water Pipeline)मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात शुक्रवारी मुख्य पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाल्याची घटना घडली. एस. व्ही. रोडवरील लकी हॉटेलजवळील गजबजलेल्या जंक्शनवर ही जलवाहिनी फुटल्याने क्षणात परिसर जलमय झाला. प्रचंड वेगाने उसळलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे हजारो लिटर शुद्ध पिण्याचे पाणी रस्त्यावर वाया गेले असून, परिसरातील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
 
या घटनेमुळे एस. व्ही. रोडवरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे(Water Pipeline) नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. स्थानिकांनी व्यक्त केलेल्या संतापानुसार, या परिसरात वारंवार अशा घटना घडत असूनही कायमस्वरूपी तोडगा निघत नसल्याने प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.(Water Pipeline)
 
घटनेची माहिती मिळताच मुंबई महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून, फुटलेली जलवाहिनी दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. दरम्यान, या बिघाडामुळे वांद्रे पश्चिम परिसरातील पाणीपुरवठा काही काळ विस्कळीत राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.(Water Pipeline) 
 
दरम्यान, आशिष शेलार यांनी या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त करत, या ठिकाणी वारंवार होणाऱ्या जलवाहिनी फुटीमुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत असल्याबरोबरच रस्ते खचण्याच्या घटनाही घडत असल्याचे स्पष्ट केले. संबंधित विभाग, मेट्रो प्रशासन आणि कंत्राटदारांकडून जबाबदारी निश्चित होत नसल्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याची टीका करत दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.(Water Pipeline)