आधुनिक भारताचे जनक, क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले म्हणजे समतेचा सूर्य, अनिष्ट रूढी, परंपरा, चालीरीती यांच्या विरोधातील बंड; अगदी तसेच समतेच्या विचारासाठी झटणारे नवे युग होय. तत्कालीन भरकटलेल्या समाजामध्ये पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची प्रेरणा जागवणारे महात्मा जोतीराव, त्यांच्या विचारकार्याचा संक्षिप्त मागोवा या लेखात घेतला आहे.
१९व्या शतकातील शेतकरी, कष्टकरी, कामगार, अनाथ, विस्थापित, महिला सबलीकरण, आधारगृह, बालगृह, आधुनिक शेती या सर्वांसाठी काम करणारे जोतीराव फुले राष्ट्रनिर्माणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आणि व्यापक पहिले पाऊल टाकतात ते पुणे येथील भिडेवाडा येथे १८४८ साली मुलींची पहिली शाळा सुरू करून. यासोबत क्रांतिसूर्य महात्मा फुले सामाजिक संकटाच्या आणि नैसर्गिक संकटाच्या विरोधात लढताना आपल्याला दिसतात. दुष्काळ हे जसे नैसर्गिक संकट आहे, तसे अस्पृश्यता हे सामाजिक संकट आहे. क्रांतिसूर्य तात्यासाहेब महात्मा फुले दुष्काळी जनतेसाठी अन्नछत्र सुरू करतात. तसेच ते सामाजिकदृष्ट्या अस्पृश्य मानल्या गेलेल्या दलितांसाठी आपल्या घरातील हौद-विहीर खुली करून देतात. संकुचित मानसिकतेच्या पलीकडे विचार करताना महात्मा फुले सल्ला-समुपदेश याच्यापुढे जाऊन स्वतः कृतिशील पाऊल टाकणारे कर्ते सुधारक म्हणून आपल्या कार्याचा परिचय देतात...
महात्मा फुले यांनी हिंदू धर्माची चिकित्सा केली. जातिभेद निर्मूलनासाठी, हिंदू धर्मग्रंथ आणि धर्माचे जाणते म्हणून असलेल्या तत्कालीन व्यवस्थेविरुद्ध ते खडेबोल सुनावतात. त्यांच्या मते, जगातील कोणताच धर्म संकुचित नसतो; परंतु मानवी मनाचे अहंकार, जात अहंकाराने, धर्म अहंकाराने जेव्हा मोठे होतात, तेव्हा माणूस माणसाला विषम नजरेने पाहतो. पर्यायाने समाजात विषमता प्रस्थापित होते. असा धर्म धिक्कारने योग्य आहे. एकीकडे त्यांचे मत असे असले, तरी ते दुसर्या बाजूला मात्र गावगाड्यातील खंडोबा, बिरोबा, म्हसोबा, जोतिबा यांची भक्ती करताना दिसतात. त्यांना या हिंदू देवतांचा जयजयकार करताना ही सर्व दैवते गावगाड्यातील विस्थापित भटके विमुक्त यांचे रक्षण करणारी आणि त्यांच्या संस्कृतीचा भाग वाटतात. त्यांचा ते आदरदेखील करतात. यावरून आपल्या लक्षात येते की, महात्मा फुले यांनी हिंदू धर्माची चिकित्सा केली; पण धर्म खोडून काढला नाही. ते आपल्या अखंड लेखनातदेखील म्हणतात- माणसाला सत्याने पुढे घेऊन जावे लागेल, सत्याशिवाय धर्म असूच शकत नाही. ज्याप्रमाणे लेकीला माहेरी आधार वाटतो, त्याप्रमाणे धर्माला सत्याचा आधार असतो, सत्य सोडून बाकी सर्व अंधकार आहे.
सत्य सर्वांचे आदी घर!
सर्व धर्मांचे माहेर!!
किंवा
सत्य सुखाला आधार |
बाकी सर्व अंधकार ॥
इतकी व्यापक आणि सोपी व्याख्या १९व्या शतकात धर्माची दुसरी कोणी सांगितली नसेल. धर्म-चिकित्सा करताना त्यांनी हिंदू धर्मातील उणिवा जरूर सांगितल्या; परंतु त्यांनी अधिकृत हिंदू धर्म सोडतो, असे कधीच सांगितले नाही. त्यांना हिंदूमधून धर्मांतरित होण्यासाठी इतर कोणताही धर्म योग्य वाटला नसावा. याच कारणाने त्यांनी शेवटपर्यंत इस्लाम किंवा ख्रिस्ती अशा धर्मात प्रवेश केला नाही. त्यांनी ‘सत्यशोधक’ धर्म स्थापित केला आणि आपली धर्माविषयीची वेगळी संकल्पना सिद्ध केली. या सृष्टीचा निर्माणकर्ता असणार्या शक्तीला ‘निर्मिक’ म्हणून संबोधले आणि त्याच्याबद्दल कृतज्ञता भाव व्यक्त केला आणि परमेश्वराचे व्यापक रूप जगाला दाखवले.
सामाजिकदृष्ट्या पाहिले तर आज क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या विचारांना मानणारे आज देशात करोडो अनुयायी आहेत. त्यांच्या विचारांना ते मानतात आणि अशा वेळी धर्म म्हणून जोतीरावांनी वेगळ्या धर्माचा विचार केला असता, त्यांनी धर्मांतरण केले असते, तर त्यांच्या करोडो अनुयायांनी तो मार्ग स्वीकारला असता; परंतु तात्यासाहेब महात्मा फुले या अशा विचारांना आपल्यापासून दूर ठेवतात, ते इथल्या निसर्गपूजक संस्कृतीचा सन्मान करतात.
क्रांतिसूर्य महात्मा फुले यांना ‘आधुनिक सामाजिक क्रांतीचे जनक’ म्हणून संबोधले जाते. त्यांनी अनेक पावले सक्षम समाज आणि राष्ट्रनिर्माणाच्या हेतूने उचलली. लेखन, साहित्य, कौशल्यपूर्ण शिक्षण, उद्योग-व्यवसाय अशी सर्व कामे त्यांनी राष्ट्रहितासाठी केली; परंतु यामध्ये सर्वांत महत्त्वाचे निर्णय समाजहितासाठी त्यांनी कोणते घेतले असतील, तर भरकटलेल्या समाजाला त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार पुन्हा दाखवले. रायगडावर जाऊन त्यांची समाधी शोधली आणि पहिली जयंती साजरी करून कुळवाडीभूषण राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना जगासमोर मांडले. प्रदीर्घ पोवाडा लिहून लोकशाही राजा आणि त्यांचे स्वराज्य विचार, मूल्ये जनमानसात पोहोचवली.
कृतिशील कर्ते सुधारक महात्मा फुले यांचे साहित्य ‘समग्र वाङ्मय’ हे महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केले. सावित्रीमाई यांच्या ‘समग्र वाङ्मय’चे प्रकाशनदेखील मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या काळात झाले. त्यांच्या विचारांचे संवर्धन करण्याच्या हेतूने आणि येणार्या पिढीला ‘फुले विचार’ समजावणारी ही कृती अतिशय महत्त्वाची आहे. साध्वी सावित्रीमाई फुले आणि क्रांतिसूर्य महात्मा फुले यांनी दि. १ जानेवारी १८४८ रोजी पहिली मुलींची शाळा सुरू केली. त्या शाळेचे स्मारक व्हावे, अशी मागणी देशातील फुलेप्रेमींची होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी अतिशय महत्त्वाचे पाऊल उचलले. आज ‘भिडेवाडा’ स्मारकाच्या रूपाने विद्येच्या माहेरघरात, पुणे शहरात सन्मानाने उभे राहात आहे. यासोबत नायगाव येथेदेखील शेकडो कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, त्याठिकाणीदेखील भव्य काम उभे राहात आहे.
ग्रामविकासाला चालना देणारे, महिला सबलीकरण करणारे, आणि महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने नायगाव, ता. खंडाळा, जि. सातारा येथे प्रशिक्षण केंद्र उभे राहात आहे. पुढील काळात खानवडी येथे तात्यासाहेब महात्मा फुले यांचे स्मारक भव्य स्वरूपात करण्यात येणार आहे. महात्मा फुले हा विचार जागवणारे त्यांचे पुणे येथील राहाते घर ‘समताभूमी’ म्हणून विकसित होत आहे, हे सर्व करण्यासाठी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उचललेले पाऊल अतिशय महत्त्वाचे आहे. त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्यासोबत देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘महात्मा फुले द्विशताब्दी जयंती वर्ष’ म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला, त्यासोबत महाराष्ट्र सरकारनेदेखील हा निर्णय घेतला आहे, यामुळे क्रांतिसूर्य महात्मा फुलेंच्या क्रांतिकारी विचारांनी महाराष्ट्र उजळून निघाल्याशिवाय राहणार नाही, हा मला विश्वास आहे. महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना कोटी कोटी प्रणाम!
योगेश पुंडलिक टिळेकर
(लेखक महाराष्ट्र विधान परिषद सदस्य आहेत.)