भारतीय समाजसुधारणेच्या इतिहासात महात्मा जोतीराव फुले हे शिक्षणाच्या माध्यमातून मानव-उन्नती घडवून आणणारे हाडाचे कार्यकर्ते आणि एक अग्रगण्य विचारवंत म्हणून ओळखले जातात. त्यांनी शिक्षणाला केवळ अक्षरओळखीचे साधन न मानता, ते सामाजिक परिवर्तन, बौद्धिक-स्वातंत्र्य आणि मानवमुक्तीचे सामर्थ्यवान माध्यम म्हणून पाहिले. शिक्षण हेच खरे मुक्तीचे दार आहे, हा त्यांचा ठाम विश्वास होता. त्यांच्या मते, शिक्षण व्यक्तीला विचारशक्ती देते, आत्मविश्वास निर्माण करते आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देते. त्यामुळेच त्यांनी शिक्षणाला मानवी-उन्नतीचा मूलाधार मानत, समाजातील सर्व घटकांसाठी ते उपलब्ध करून देण्याचा ध्यास घेतला.
महात्मा जोतीराव फुले यांनी शिक्षणाच्या अभावामुळे होणार्या मानवी आणि सामाजिक अध:पतनाचे अत्यंत प्रभावी आणि सखोल चित्रण खालील शब्दांत केले आहे :
"विद्ये विना मती गेली,
मती विना नीती गेली,
नीती विना गती गेली,
गती विना वित्त गेले,
वित्ता विना शूद्र खचले,
इतके अनर्थ एका अविद्येने केले!”
या वचनाचा अर्थ असा की, विद्येच्या अभावामुळे (अविद्येमुळे) माणसाची बुद्धी (मती) नष्ट होते. बुद्धी नसल्यामुळे योग्य-अयोग्य याचे भान राहत नाही आणि त्यामुळे नीती (नैतिकता) हरवते. नैतिकता हरवल्यानंतर व्यक्तीच्या जीवनाची दिशा आणि प्रगती (गती) थांबते. जेव्हा प्रगतीच होत नाही, तेव्हा आर्थिक स्थिती (वित्त) ही खालावते आणि शेवटी माणूस दारिद्य्र, अज्ञान आणि शोषणाच्या गर्तेत सापडतो. विशेषतः शूद्र आणि वंचित समाज यामुळे अधिक खचतो. कारण, त्यांना शिक्षणापासून दूर ठेवले गेले होते. एकूणच, या ओळींतून फुले यांनी हे अधोरेखित केले आहे की, अविद्या ही सर्व अनर्थांचे मूळ कारण आहे आणि त्यावर उपाय म्हणून शिक्षण अत्यावश्यक आहे.
जोतीराव फुले यांचा जन्म दि. ११ एप्रिल १८२७ रोजी पुण्यात एका साध्या माळी समाजातील कुटुंबात झाला. त्याकाळात भारतीय समाज अत्यंत विषमतेने ग्रस्त होता. जातिभेद, अज्ञान, अस्पृश्यता, स्त्री-पुरुष असमानता आणि अंधश्रद्धा या गोष्टी समाजाच्या प्रत्येक स्तरावर खोलवर रुजलेल्या होत्या. शिक्षणाची दारे केवळ उच्चवर्णीयांसाठीच खुली होती, तर शूद्र-अतिशूद्र आणि स्त्रिया यांना शिक्षणापासून जाणीवपूर्वक दूर ठेवले जात होते. अशा प्रतिकूल सामाजिक परिस्थितीत जोतीरावांनी शिक्षणाचे खरे महत्त्व ओळखले. त्यांच्या मते, शिक्षण हेच समाजातील अन्याय दूर करण्याचे प्रभावी साधन आहे. म्हणूनच, त्यांनी शिक्षण सर्वांसाठी खुले व्हावे, यासाठी आयुष्यभर संघर्ष केला.
त्यांच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण आणि परिवर्तनकारी असा जो प्रसंग सांगितला जातो, तो म्हणजे त्यांच्या मित्राच्या लग्नातील घटना. असे म्हटले जाते की, एका ब्राह्मण मित्राच्या विवाह सोहळ्यात सहभागी झाल्यानंतर, महात्मा फुले यांचा त्यांच्या जातीमुळे अपमान करण्यात आला आणि त्यांना समारंभातून बाहेर जाण्यास सांगितले गेले. या घटनेने त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला. त्यांनी अनुभवले की, जातीच्या आधारावर होणारा अपमान आणि भेदभाव हा अज्ञानातूनच निर्माण होतो. या अनुभवाने त्यांना समाजातील विषमता दूर करण्यासाठी शिक्षण हाच मार्ग स्वीकारण्याची प्रेरणा दिली. हा प्रसंग त्यांच्या आयुष्यातील ‘टर्निंग पॉईंट’ ठरला आणि त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तनाची दिशा ठरवली.
स्त्रियांच्या शिक्षणासाठी त्यांनी केलेले कार्य अत्यंत क्रांतिकारक आणि धाडसी होते. त्याकाळात स्त्रियांना शिक्षण देणे हे पाप समजले जात होते आणि समाज त्याला तीव्र विरोध करत होता. तरीही, १८४८ साली त्यांनी पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. त्यांच्या या कार्यात त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी मोठे योगदान दिले. त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका ठरल्या. शाळेत जाताना सावित्रीबाईंना अनेक अपमानास्पद प्रसंगांना सामोरे जावे लागले. लोक त्यांच्यावर दगड, गोमूत्र फेकत असत, त्यांना शिवीगाळ केली जात असे; परंतु त्यांनी या सर्व अडचणींना न डगमगता तोंड दिले आणि शिक्षणाचा प्रसार अखंडपणे चालू ठेवला.
हा संघर्ष केवळ त्यांच्या वैयक्तिक धैर्याचा पुरावा नाही, तर शिक्षणासाठी त्यांनी दिलेल्या त्यागाचे आणि निष्ठेचे प्रतीक आहे. त्यांच्या कार्यातून स्पष्ट होते की, शिक्षणाच्या माध्यमातूनच समाजातील अंधश्रद्धा, भेदभाव आणि अन्याय यांना प्रभावीपणे आव्हान देता येते. जोतीराव आणि यांनी सुरू केलेल्या या शिक्षणक्रांतीने भारतीय समाजाला नव्या विचारांची दिशा दिली आणि खर्या अर्थाने मानवाच्या सर्वांगीण प्रगतीचा पाया घातला.
याच विचारसरणीचा विस्तार करत जोतीराव फुले यांनी केवळ स्त्रीशिक्षणापुरतेच आपले कार्य मर्यादित ठेवले नाही, तर शूद्र-अतिशूद्र आणि इतर वंचित घटकांसाठीही शिक्षणाची दारे खुली केली. समाजातील प्रत्येक व्यक्तीस समान शिक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे, हा त्यांचा ठाम विश्वास होता आणि त्यांनी तो प्रत्यक्ष कृतीतून साकार केला. शिक्षण हे सामाजिक समतेचे प्रभावी साधन ठरू शकते, याची जाणीव त्यांनी समाजाला करून दिली. ‘गुलामगिरी’ या त्यांच्या ग्रंथातून त्यांनी जातिभेद, शोषण आणि विषमता यांवर कठोर प्रहार केला. त्यांच्या मते, अज्ञान हेच गुलामगिरीचे मूळ असून, शिक्षणाद्वारेच वंचित समाजाला स्वाभिमान आणि स्वातंत्र्य प्राप्त होऊ शकते.
या परिवर्तनवादी कार्याचा पुढचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे १८७३ साली स्थापन झालेला ‘सत्यशोधक समाज’ होय. या संस्थेद्वारे जोतीराव फुले यांनी समाजातील अंधश्रद्धा, जातीय भेदभाव आणि अन्यायकारक परंपरांविरुद्ध व्यापक जनजागृती घडवून आणली. त्यांनी विवाहसंस्कार सुलभ करून अनाठायी खर्चाला आळा घातला, तसेच विधवा-विवाहाला प्रोत्साहन देत, स्त्रियांच्या सन्मानासाठी ठाम भूमिका घेतली. स्त्री-पुरुष समानतेचा विचार त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून समाजासमोर मांडला. ‘सत्यशोधक समाजा’च्या कार्याचा कणा शिक्षण हाच होता. लोकांनी आंधळ्या श्रद्धांवर अवलंबून न राहता, विचारपूर्वक निर्णय घ्यावा, प्रश्न विचारावेत आणि सत्याचा शोध घ्यावा, अशी प्रेरणा त्यांनी दिली.
जोतीराव फुले यांनी शिक्षणाला मानवी प्रतिष्ठेशी घट्टपणे जोडले आणि त्याला व्यक्तिमत्त्व विकासाचा केंद्रबिंदू मानले. त्यांच्या मते, शिक्षणामुळे व्यक्ती स्वतंत्रपणे विचार करू शकते, योग्य-अयोग्य यातील फरक ओळखू शकते आणि अन्यायाविरुद्ध ठामपणे उभी राहू शकते. शिक्षण हे केवळ उपजीविकेचे साधन नसून, ते आत्मसन्मान, स्वाभिमान आणि सामाजिक जागृती निर्माण करणारे माध्यम आहे, असा त्यांचा ठाम विश्वास होता. त्यामुळेच त्यांनी शिक्षणाला सर्वांगीण विकासाचे प्रभावी साधन मानले आणि समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न केला.
महात्मा जोतीराव फुले यांनी शिक्षणाला मानव-उन्नतीचा मूलाधार बनवून समाजाला नवी दिशा दिली. त्यांच्या वैयक्तिक अनुभवांनी त्यांना सामाजिक विषमतेची जाणीव करून दिली आणि त्यावर उपाय म्हणून त्यांनी शिक्षणाचा मार्ग स्वीकारला. त्यांनी स्पष्टपणे सिद्ध केले की, शिक्षण हे केवळ ज्ञानप्राप्तीचे साधन नसून, ते सामाजिक परिवर्तन, न्याय, समता आणि मानवमुक्ती यांचे प्रभावी साधन आहे. त्यामुळेच शिक्षणाच्या माध्यमातूनच व्यक्ती आणि समाज यांची खरी उन्नती साध्य होऊ शकते, हा त्यांचा मूलभूत विचार आजही तितकाच सत्य आणि प्रेरणादायी आहे.
मी तर असे म्हणेन की, आजच्या आधुनिक आणि तंत्रज्ञानप्रधान युगात महात्मा जोतीराव फुले यांचे शिक्षणविषयक विचार अधिकच समर्पक आणि दिशादर्शक ठरतात. १९व्या शतकात फुले यांनी ज्याप्रकारे शिक्षणाला सामाजिक समता, मानवमुक्ती आणि सर्वांगीण उन्नतीचे साधन मानून वंचित घटकांसाठी शिक्षणाची दारे खुली केली, त्याच धर्तीवर आज ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण - २०२०’ (NEP 2020) कार्यरत असल्याचे दिसून येते. या धोरणात सर्वसमावेशक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणावर विशेष भर देण्यात आला असून, 'Education For All' ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवली आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरण - २०२० अंतर्गत सामाजिक व आर्थिकदृष्ट्या वंचित घटकांसाठी विशेष उपाययोजना, लवचीक अभ्यासक्रम रचना, बहुभाषिक शिक्षण, आणि कमी वयातील मुलांच्या शिक्षणावर भर देण्यात आला आहे. 'Gender Inclusive Fund' आणि 'Special Education Zones' सारख्या उपक्रमांद्वारे समावेशकतेला चालना दिली जाते. यासोबतच, ‘डिजिटल’ शिक्षणाला मोठे महत्त्व देण्यात आले असून, ‘दीक्षा’, ‘स्वयंम’, आभासी प्रयोगशाळा (व्हर्च्युअल लॅब) आणि ऑनलाईन शिक्षण प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून शिक्षण सर्वांसाठी सुलभ करण्याचा प्रयत्न आहे.
याच संदर्भात, ‘दूरस्थ’ (डिस्टन्स) आणि ऑनलाईन शिक्षण पद्धती या आजच्या काळात शिक्षणाच्या लोकशाहीकरणासाठी अत्यंत प्रभावी साधन ठरत आहेत. या माध्यमांद्वारे भौगोलिक, आर्थिक आणि सामाजिक अडथळे मोठ्या प्रमाणावर दूर करता येतात. ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थी, कामगारवर्ग, तसेच महिलांना घरबसल्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी उपलब्ध होते. ‘डिजिटल प्लॅटफॉर्म्स’मुळे शिक्षण अधिक लवचीक, सुलभ आणि परवडणारे बनते. त्यामुळे सरकारला सर्वांसाठी दर्जेदार शिक्षण हा उद्देश प्रभावीपणे साध्य करता येतो. या माध्यमातून शिक्षणाचा विस्तार आणि समावेशकता वाढवून सामाजिक समतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जाऊ शकते.
‘डिजिटल’ दरी कमी करणे हे अजूनही आपल्यासमोरील एक मोठे आव्हान असले, तरीही नरेंद्र मोदींच्या दूरदर्शी व खंबीर नेतृत्वाखाली भारत सरकारने नवीन ‘शैक्षणिक धोरण-२०२०’च्या माध्यमातून शिक्षण अधिक सुलभ, समताधिष्ठित, दर्जेदार आणि भविष्याभिमुख करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचे दिसून येते. त्यामुळे छएझ-२०२० हे महात्मा जोतीराव फुले यांच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानाचे आधुनिक आणि अधिक व्यापक रूप आहे, असे मानता येईल.
प्रा. (डॉ.) शिवाजी सरगर, संचालक, दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण संस्था, मुंबई विद्यापीठ