जागतिक व्यापार आणि अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने बंदरे ही अत्यंत महत्त्वाची केंद्र. अन्नधान्य, इंधन, औषधे आणि इलेक्ट्रॉनिक्ससारख्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवण्यात बंदरांची भूमिका केंद्रस्थानी आहे. मात्र, हीच बंदरे वाहतूक व्यवस्थेतील सर्वाधिक ऊर्जा वापरणाऱ्या घटकांपैकी एक असून, ती अजूनही मोठ्या प्रमाणावर जीवाश्म इंधन आणि पारंपरिक विजेवर अवलंबून आहेत. वाढत्या पर्यावरणीय संकटाच्या पार्श्वभूमीवर आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या जागतिक प्रयत्नांमुळे बंदर क्षेत्रात बदल घडवण्याची गरज अधिक तीव्र झाली आहे. याच पार्श्वभूमीवर ‘युनायटेड नेशन्स ट्रेड ॲण्ड डेव्हलपमेंट (यूएनसीटीएडी)’ने ‘सस्टेनेबल स्मार्ट पोर्ट्स’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. चार वर्षे चाललेल्या या प्रकल्पाची अंमलबजावणी घाना, मॉरिशस आणि मोरोक्को या आफ्रिकेतील देशांमध्ये करण्यात आली. या प्रकल्पाचा उद्देश बंदरांना अधिक ऊर्जा कार्यक्षम, पर्यावरणपूरक आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत बनवणे, असा होता.
‘यूएनसीटीएडी’च्या मते, शाश्वत आणि स्मार्ट बंदरे म्हणजे अशी बंदरे जी आधुनिक तंत्रज्ञान आणि ऊर्जासंक्रमणाचा प्रभावी वापर करून ऊर्जा कार्यक्षमता वाढवतात आणि नवीकरणीय ऊर्जेच्या उत्पादन व वितरणाला चालना देतात. अशा बंदरांमुळे केवळ पर्यावरणाचे संरक्षण होत नाही, तर ती भविष्यातील हरितऊर्जा साखळीतील महत्त्वाची केंद्रे बनू शकतात.
या प्रकल्पाच्या अंतर्गत मॉरिशसमधील ‘पोर्ट लुईस’, मोरोक्कोमधील ‘टांगेर मेड’ आणि घानामधील ‘पोर्ट ऑफ तेमा’ या तीन प्रमुख बंदरांचा सखोल अभ्यास करण्यात आला. या अभ्यासात ऊर्जावापराची पद्धत, वीजपुरवठ्याची क्षमता, नवीकरणीय ऊर्जा वापरण्याची शक्यता, तसेच धोरणात्मक व संस्थात्मक रचना यांचे परीक्षण करण्यात आले. या सर्व प्रक्रियेमुळे प्रत्येक देशासाठी ठोस आणि व्यवहार्य कृती आराखडे तयार करण्यात आले.
या प्रकल्पाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे, केवळ पायाभूत सुविधांवर भर न देता, विविध संस्थांमधील समन्वय आणि सहकार्य वाढवण्यावरही लक्ष केंद्रित करण्यात आले. बंदर प्राधिकरणे, ऊर्जा विभाग, नियामक संस्था, वीज पुरवठादार आणि तांत्रिक तज्ज्ञ यांच्यात प्रभावी संवाद निर्माण करण्यात आला. त्यामुळे निर्णय प्रक्रिया अधिक सुसंगत आणि परिणामकारक झाली.
प्रकल्पाचे काही ठोस परिणामही दिसून आले. मॉरिशसमध्ये सौरऊर्जेच्या वापराचा विस्तार, बंदरातील उपकरणांचे विद्युतीकरण आणि जहाजांना थेट वीजपुरवठा करण्याच्या योजना पुढे आल्या. घानामध्ये तांत्रिक आणि नियामक अडथळे स्पष्ट झाले, ज्यामुळे अंमलबजावणीचा मार्ग अधिक सुस्पष्ट झाला. मोरोक्कोमध्ये ऊर्जा कार्यक्षमतेसाठी नवीन मोजमाप पद्धतींचा अवलंब करण्यात आला आणि संस्थात्मक सहकार्य अधिक मजबूत झाले.
याशिवाय, या प्रकल्पाद्वारे दीर्घकालीन क्षमता विकासावरही भर देण्यात आला. नवीकरणीय ऊर्जा, पर्यायी सागरी इंधन, ऊर्जा व्यवस्थापन प्रणाली आणि उपकरणांचे विद्युतीकरण या विषयांवर प्रशिक्षण देण्यात आले. तसेच भविष्यातील गरजा लक्षात घेऊन, ‘यूएनसीटीएडी 2026’मध्ये शाश्वत आणि स्मार्ट बंदरांवर आधारित ऑनलाईन प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करणार आहे. यामध्ये प्रकल्पातील निष्कर्ष आणि मूल्यांकनातून शिकलेले महत्त्वाचे धडे सादर करण्यासाठी एक वेबिनारही आयोजित करण्यात येणार आहे. पुराव्यावर आधारित मूल्यांकन, सर्वसमावेशक धोरणात्मक संवाद आणि लक्ष्यित क्षमता-विकासाच्या माध्यमातून ‘एसएसपी’ प्रकल्पाने सहभागी देशांना त्यांच्या बंदरांच्या ऊर्जा प्रणालींचे आधुनिकीकरण करण्यासाठी व्यवहार्य सुधारणा पुढे नेण्यास मदत केली आहे.
सागरी क्षेत्र स्वच्छ इंधन आणि प्रगत तंत्रज्ञानाकडे वाटचाल करत असताना, या प्रयत्नांमुळे बंदरे उदयोन्मुख कमी-कार्बन ऊर्जा आणि व्यापार नेटवर्कमध्ये वाढती भूमिका बजावण्यासाठी सक्षम होत आहेत. एकूणच, या प्रकल्पामुळे आफ्रिकेतील सहभागी देशांना त्यांच्या बंदर व्यवस्थेत हरित आणि शाश्वत बदल घडवण्यासाठी एक भक्कम दिशा मिळाली आहे. भविष्यात स्वच्छ ऊर्जा आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित जागतिक व्यापार व्यवस्थेत ही बंदरे महत्त्वाची भूमिका बजावतील, यात शंका नाही.