हे फुले आपणास माहित आहेत का?

    11-Apr-2026
Total Views |
 
Mahatma Jyotiba Phule
 
महात्मा जोतिबा फुले हे नाव उच्चारल्याबरोबर ब्राह्मणांना (आणि संदर्भ नसताना हिंदुत्ववाद्यांनाही) विरोध करणारे महापुरुष असे मत स्वत:ला ‘पुरोगामी’ म्हणवणार्‍या व्यक्तींमध्ये दिसून येते. दुसरीकडे महात्मा जोतिबा फुले यांचे लिखाण हे ब्राह्मणांवर टीका करणारे आहे, हे त्यांचे लिखाण वाचले की, लक्षात येते. पण, महात्मा जोतिबा फुले यांनी जे कार्य केले, जे विचार व्यक्त केले, त्याच्या उद्दिष्टपूर्तीची मीमांसा फारशी कुठे केलेली आढळत नाही. उलट त्यांना जातीमध्ये बांधून ठेवण्याचे पाप काही लोकांनी वर्षोनुवर्षे केले. या पार्श्वभूमीवर महात्मा जोतिबांनी केवळ विरोधासाठी विरोध केला किंवा टीकेसाठी टीका केली असे आहे का? तर तसे नाही. निश्चितपणाने समाजहिताचाविचार करून, म. फुले यांनी ठोस कृती केलेली आढळते. महात्मा जोतिबा फुले यांच्या लिखाणाचा अंतिम उद्देश काय, अंतिम ध्येय काय, यासंबंधीचा ऊहापोह करणारा हा लेख...
 
ब्राह्मण’ की ’ब्राह्मण्य’? काही सावध लेखक या दोन्ही शब्दांत फरक करताना दिसतात. यासंबंधात महात्मा फुले ब्राह्मणांच्या विरोधात नव्हते, तर ‘ब्राह्मण्या’च्या विरोधात होते, असेही लिहिले जाते. ‘ब्राह्मण्य’ या शब्दाची व्याख्या करताना आपल्या जातीचे श्रेष्ठत्व मानणारे जे कोणी असतील, मग ते कोणत्याही जातीतले असो, ते ’ब्राह्मण्यग्रस्त’ आहेत, अशी ही म्हणण्याची एक पद्धत काही लेखकांची दिसते. यामध्ये एक कारण असे दिसते की, सर्वच समाजसुधारकांना सुरुवातीच्या काळात किंवा पुढच्याही काळात काही ब्राह्मणांनी सहकार्य केल्याचे दिसते. महात्मा फुले यांच्या जीवनातही असे काही घडल्याचे आढळते. सुरुवातीच्याच काळात अनेक ब्राह्मण मंडळींनी मदत केल्याचे पुरावेसुद्धा वारंवार समोर आणले जातात. तथापि, सर्वसाधारणपणे महात्मा फुलेंचे लिखाण वाचत असताना वाचकांवर परिणाम मात्र गोंधळाचा होतो. वाचक हा ‘ब्राह्मण’ आणि ‘ब्राह्मण्य’ यातला भेद व्यवस्थित समजू शकेलच, अशी स्थिती राहत नाही. त्यामुळे महात्मा फुले यांची प्रतिमा ती सरळसरळ ब्राह्मणविरोधी उमटते, हे नाकारता येत नाही, तशीच ठेवलीही जाते आणि त्यातही पुन्हा काही ठिकाणी जाणवणारी अनैतिहासिकता गैरसमजाला पुष्टीकडे नेते. अशाप्रकारची अनैतिहासिकता तर अधिकच त्रास देणारी ठरते. आर्य बाहेरून आल्याचे गृहीतक पुढे चालून सिद्धांताचे रूप धारण करताना दिसते. मधूनमधून इंग्रजांची केलेली भलावण तर आगीत तेल ओतते. भरीस भर म्हणजे हिंदूंच्या कौटुंबिक जीवनामधल्या पूजाअर्चा, तथाकथित कर्मकांड, विधी, यज्ञयाग यासंबंधात काढलेले उद्गार, हे या गोंधळाच्या चरम सीमेजवळ नेऊन ठेवतात. विवाहप्रसंग असो की, मृत्यू यांच्या संबंधांमध्ये केलेले किंवा केले जाणारे विधी आणि त्याची अपरिहार्यता किंवा सहजता यावरचे म. फुले यांचे चिंतन हे गोंधळात भरच घालते.
 
त्यामुळे उथळ विचार करून वावरणार्‍या मंडळींचे तर चांगलेच फावते; ज्यांना काहीही सकारात्मक करायचे नाही, केवळ अपप्रचार करायचा आहे, त्यांच्यासाठी हे एक हातातील कोलीत बनून राहते आणि ते कोलीत घेऊन समाजात सर्वत्र त्यांचा वावर हा समाज तोडण्यासाठी होताना दिसतो. तथापि, ज्याला जोडण्याचे सामाजिक कार्य करायचे आहे व संघटन करायचे आहे, त्याला या सगळ्या गोष्टींना पार करून मगच पुढे जावे लागते.
 
हिंदू समाज संघटकांसाठी काही मुद्दे :
 
काही मुद्दे प्रकर्षाने जाणवतात. महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनात सकारात्मकता ठळक दिसते.
 
१. त्यांची कृती अर्थात, कामे
२. अन्यायग्रस्तांसंबंधीचा कळवळा
३. सहकार्य करणारे काही ब्राह्मण
४. ईश्वरासंबंधीचे वारंवार उद्गार
५. त्याचप्रमाणे इंग्रजांच्या संबंधात उच्चारलेले शब्द
 
आपण काही मुद्दे विचारात घेऊ. म. फुले यांनी कडक शब्दात फटकारूनसुद्धा म. फुले यांना मदत करणार्‍या ब्राह्मणांची नावे बरीच निघतात.
  
उदाहरणार्थ :
 
१. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख
२. विनायकराव भांडारकर
३. नारायण महादेव उपाख्य मामा परमानंद
४. सखाराम परांजपे
५. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे
६. सदाशिवराव गोवंडे
७. मोरो विठ्ठल वाळवेकर
८. सांगलीचे श्रीमंत पटवर्धन
९. हरिरावजी चिपळूणकर इत्यादी.
 
ही सगळी मंडळी ‘विचारवंत’ गटात आहेत यावर कुणाची हरकत असेल, असे वाटत नाही. त्यांनी म. फुले यांना सहकार्य केलेले दिसते. यांचे सहकार्य म. फुले यांनी नाकारले तर नाहीच. उलट, समाजसुधारक गोपाळराव आगरकर आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना मदत केलेली दिसते. ब्रिटिश सरकारविरुद्ध टिळक, आगरकर यांनी केलेले लिखाण त्यांच्या अंगलट येणारच होते, ते आलेच. अर्थात, इंग्रज सरकारने त्यांच्यावर मुंबईत खटला दाखल केला. या खटल्याच्या वेळी बॅरिस्टरांना द्यायला व जामिनासाठी टिळक, आगरकरांजवळ पैसे नव्हते. महात्मा जोतिबा फुले यांनी त्यांचे पुण्यातले स्वत:चे घनिष्ट मित्र उरवणे शेठ यांच्याकडून मदत घेतली व टिळक, आगरकर यांना दहा हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तही केले. तरीही, पुढे मात्र आगरकर, टिळकांना चार महिन्यांची सौम्य शिक्षा झाली. तथापि, खटल्याच्या वेळी मात्र फुले यांनी मदतच केलेली दिसते. तेव्हा वरच्या सर्व मुद्द्यांना अनुसरून आगरकर, टिळक यांची जात लक्षात घेता, म. फुले नेमका काय, कसा विचार करत होते, हे स्पष्ट होते.
 
इथे हेही स्पष्ट होते की, म. फुले इंग्रज सरकारविरुद्ध उभे राहायला कचरत नाहीत. याचा अर्थ, जो कोणी अन्याय करील, त्याच्याविरुद्ध म. फुले उभे राहात असत.
 
ईश्वरावर श्रद्धा
 
त्यांच्या लिखाणात शेकडो ठिकाणी ‘ईश्वर’, ’निर्मिक’ अशाप्रकारचे शब्द आलेले आहेत. किंबहुना, त्याला साक्षी ठेवूनच ते सर्व कामे करीत असत, हेही आपल्या लक्षात येते. त्यांनी स्थापन केलेला ‘सार्वजनिक सत्यधर्म’ व त्यासंबंधीचे पुस्तक यामध्येसुद्धा याचा उल्लेख आढळतो.
 
‘सार्वजनिक सत्यधर्म’ पुस्तकाच्या प्रस्तावनेचा पहिलाच परिच्छेद जशाला तसा पाहा - "या आपल्या अमर्याद विस्तीर्ण पोकळीमध्ये निर्मिकाने अनंत सूर्यमंडळासह त्यांच्या ग्रहोपग्रहासहित तत्संबंधी एकंदर सर्व प्राणिमात्रास उत्पन्न केले आहे. त्यापैकी आपण सर्व मानव स्त्री-पुरुषांनी त्याविषयी काय-काय करावे आणि आपण सर्व एकंदर मानव स्त्री-पुरुषांनी त्याचे स्मरण मनी जागृत ठेवून एकमेकांशी कोणत्या तर्‍हेचे आचरण केल्यामुळे त्यास आनंद होणार आहे; यास्तव मी त्याच्या कृपेने एकंदर सर्व मानव स्त्री-पुरुषांच्या हितासाठी हा लहानसा ग्रंथ रचिला आहे. तो सर्वास ग्राह्य होऊन आम्ही सर्वांनी निर्मिकाच्या सत्यमय राज्याचा सारखा उपभोग घेऊ लागावे म्हणून माझी त्यापाशी मागणी आहे.”
 
ईश्वराचे अस्तित्व नाकारणारे आणि धर्माला ‘अफूची गोळी’ म्हणणारे डावे, म. फुले यांच्याच नावाने जेव्हा अपप्रचार करतात, तेव्हा ते कोणत्या नशेत असतात हे मानावे? म. फुले यांचा सत्यधर्म न पाळता, सगळ्या आघाड्यांवर असत्याचाच प्रचार करताना का दिसतात?
 
एवढेच नव्हे, तर ब्राह्मणाच्या हातून विवाह न लावता त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने विवाह लावण्याचे जे विधी आहेत, त्यामध्येसुद्धा स्पष्टपणाने आपल्याला कुळस्वामी किंवा महासुभा (म्हसोबा) किंवा निर्मिक, ईश्वर, खंडोबा, काळभैरव ही दैवते आढळतात. त्यामुळे ईश्वर असण्यासंबंधी म. फुले यांच्या मनात शंका दिसत नाही. विवाह विधीतील मंगळाष्टक, पाणीग्रहण, कन्यादान, पूजा, दक्षिणा हे उल्लेख डाव्यांच्या चळवळीत कसे चालतील?
 
सत्यशोधक समाजोक्त विवाहासंबंधी विधीतील हा दुसरा परिच्छेद पाहा -
 
"नंतर वराने सोनाराकडून कुळस्वामीच्या टांकास उजाळा दिल्यानंतर वराच्या कुळातील एका पुरुषाने आपल्या अंगास चंदनाच्या उट्या घेऊन एका तबकात गुलाल-भंडारात महाविराच्या टांकापुढे विड्याचे सामान ठेवून, त्यावर स्वच्छ रुमाल घालून, डाव्या हातात ते पात्र घेऊन उजव्या हातात नागवी तरवार घेऊन, गावचे वेशीजवळ जाऊन, आपल्या कुळस्वामी महाविराच्या नावाने पूजा करून वाजतगाजत मंडपात परत आल्यावर आपल्या कुळधर्मानुसार तळी (विडा) उचलून मंडपात आनंदाचा दीप लावून देवकार्यासंबंधी भोजन सर्वांनी यथासांग सारून, आपल्या कुळस्वामीच्या टांकापुढे त्याच्या सन्मानार्थ डाका, भराड व गोंधळाचे नादांत सर्व रात्रभर आनंद करावा.”
 
खरी गंमत पुढेच आहे. मंगलाष्टके संपल्यावर पुढे काय करावे? म. फुले यांचे मार्गदर्शन वाचा -
 
"इतक्यात समोरासमोर काही अंतर मध्ये ठेवून, दोन चवरंग अथवा आसने सुशोभित करून, त्यावर वधुवरास बसवून उभयतांमध्ये निर्मळ जमिनीवर, एका पाण्याने भरलेल्या घटावर नारळ ठेवावा व त्याचे एके बाजूला जमिनीवर ज्योतिबा अथवा बहिरोबाचा गुलालाने त्रिशूल काढून, दुसरे बाजूला जमिनीवर खंडेरावाच्या भंडाराने भाला काढून त्याचे भवताली अकरा पानांचे विडे मांडून, त्या प्रत्येक विड्यावर एक सुपारी, एक हळकुंड, एक खारीक, एक नारळ अथवा खोबर्‍याची वाटी व एक सणी (दोन पैसे) ठेवून, वराच्या उजव्या बाजूला चंदनाची लाकडे पेटवून केलेल्या ज्वालांत, वधुवरांच्या मनात पूर्वीच्या ज्या कांही म्हणून दुष्ट वासना आल्या असतील, त्या सर्व त्यांनी आपापल्या मनाचा दृढनिश्चय करून, जाळून टाकून, शुद्ध मने करून खाली लिहिलेली महापूजा करण्यास आरंभ करावा.”
 
हे असे विधी लिहिणारे म. फुले, डावे लोक स्वीकारतात, वापरतात. शिवाय, हिंदुत्ववाद्यांच्या विरोधात उभे करतात. तर, मग म. फुले हिंदुत्ववाद्यांना बोचतात काय? म. फुले स्वीकारताना काही अडचण येण्याची शक्यता दिसत नाही. किंबहुना, उलटे का घडू नये? हिंदुत्ववाद्यांनी मोकळ्या मनाने आपलेच म्हणून सांगावे आणि डाव्यांचा वैचारिक पराभव करावा.
 
म. फुले यांचा आग्रह समजून घेऊया
 
ईश्वरानेच सगळे जग, मनुष्यमात्र, पशुपक्षी, प्राणी हे निर्माण केलेले असल्यामुळे त्यांच्यामध्ये भेदाभेद नको, हा महात्मा फुल्यांचा आग्रह आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. भेदाभेद कशासाठी करायचा नाही, हा त्यांचा जो आग्रह आहे, इकडेच आपण खरेतर लक्ष वेधले पाहिजे. महात्मा फुले यांच्या काळात हा भेदाभेद शिखरावर पोहोचलेला होता, हे आपल्याला स्पष्ट दिसते. मग मंदिरप्रवेशासारखे विषय असतील, सोवळ्याओवळ्याची बंधने, स्मशानघाट, पाणवठे या बाबी, ही ठिकाणे तर ठळक आहेत ना? या ठिकाणचे सर्व भेदाभेद महात्मा जोतिबा फुले यांना जाणवत होते. एवढेच नव्हे, तर शिक्षण क्षेत्रामध्येसुद्धा तथाकथित अस्पृश्यांचे किंवा मागासवर्गीयांचे अधिकार आणि अधिकार पदे याचे चिंतन त्यांनी केले आणि मगच आसूड हातात घेतला. त्यांना या जागांवर अनुसूचित जातीतील कुणी दिसत नव्हते, ही त्यावेळची वस्तुस्थिती होती. कारणे काहीही असोत, ही वस्तुस्थिती त्यांना भावली नाही व जोपर्यंत या समाजाचे उत्थान होत नाही, तोपर्यंत राष्ट्राचे उत्थान होत नाही; हा त्यांचा सिद्धांत कोणीही मान्य करायला हरकत नाही.
 
पंढरीनाथ पाटील लिखित‘चरित्रातील बॉम्ब’
 
म. फुले यांचे पहिले अधिकृत चरित्र १९२७ला प्रसिद्ध झाले. त्याचे लेखक होते पंढरीनाथ सीताराम पाटील. कोण होते हे?
"जॉईंट सेक्रेटरी अखील भारतीय सत्यशोधक समाज. जनरल सेक्रेटरी वर्‍हाड-मध्यप्रांतीय सत्यशोधक समाज. जनरल सेक्रेटरी वर्‍हाड सी.पी. ब्राह्मणेतर सामाजीक परिषद. जॉईंट सेक्रेटरी वर्‍हाड सी. पी. ब्राह्मणेतर काँग्रेस कमेटी. ज. सेक्रेटरी बुलढाणा जि. ब्राह्मणेतर काँग्रेस कमेटी. ‘आत्मोद्धार’ पत्राचे माजी सहसंपादक.”
 
कानामात्रेचाही फरक न करता पहिल्या आवृत्तीमधील परिचय हा असा आहे. ‘साकेत’ प्रकाशनचे प्रमुख आदरणीय आणि माझे मार्गदर्शक श्री. बाबा भांड यांनी हे पुस्तक दि. ३० मे २०२३ ला प्रकाशित केले आहे. त्यांतील हा पान क्रमांक ६२, ६३ वरील हा उतारा पाहा. जशाचा तसा -
 
"आपल्या देशातील सहा सात करोड लोक विद्येच्या अभावी हजारो वर्षापासून आपली माणुसकी गमावून बसले असून, ते धार्मिक गुलामगिरीच्या घोर नरकात पडले आहेत आणि त्यामुळेच हिंदू राष्ट्र लुळे बनून हिंदू धर्माचा र्‍हास होत आहे. ही गोष्ट ज्योतीरावांच्या नजरेस चांगली येऊन चुकली. या वर्गात विद्येचा प्रसार झाल्याशिवाय त्यांची अस्पृश्यता दूर होणार नाही. आणि विद्येखेरीज ते आपली उन्नती करून घेऊन राष्ट्रातील वरिष्ठ वर्गात तादात्म्य पावणार नाहीत, असे त्यांना नेहमी वाटत असे.
 
एरवी हिंदुस्थानात व हिंदू धर्मात असले अनेक पंथ-जाती व उच्चनीचत्त्वाचे थोतांड वाढवून स्पृश्यास्पृश्यतेचे बंड माजविण्यात आले नसते तर हिंदू तेवढा एक या भावनेने सार्‍या लोकात एकी व प्रेम नांदले असते आणि मग अशावेळी हिंदू धर्माकडे व हिंदुस्थानाकडे नुसत्या वाकड्या नजरेने पाहण्याची छाती तरी कोणास झाली असती काय? हिंदू धर्मास जर जिवंत ठेवायचे व हिंदू राष्ट्रास जर स्वतंत्र करावयाचे तर देशातील एक तृतीयांश लोकसंख्येत गणल्या जाणार्‍या अस्पृश्य समाजात विद्यार्जनाची वाढ ही केलीच पाहिजे, असा त्यांनी पक्का निश्चय केला आणि इ. स. १८५१ साली पुणे मुक्कामी नानाच्या पेठेत एकदाची अस्पृश्यांची पहिली शाळा घातली. ही शाळा घातल्याने पुण्याच्या ब्राह्मणात फारच खळबळ उडाली.”
 
या पार्श्वभूमीवर डॉ. हेडगेवारकृत रा. स्व. संघातील प्रत्येक कार्यकर्त्याला स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात दिली जाणारी प्रतिज्ञा पाहणे रोचक ठरावे. ती खालीलप्रमाणे -
 
"मी, सर्वशक्तिमान श्री परमेश्वराला व आपल्या पूर्वजांना स्मरून प्रतिज्ञा करीतो की, मी आपला पवित्र हिंदू धर्म, हिंदू संस्कृती व हिंदू समाज यांचे संरक्षणाकरिता व हिंदुराष्ट्राला स्वतंत्र करण्याकरिता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा घटक झालो आहे. संघाचे कार्य मी प्रामाणिकपणे, निःस्वार्थ बुद्धीने व तन-मन-धने करून करीन व हे व्रत मी आजन्म पाळीन.
 
॥ जय बजरंगबली हनुमान की जय ॥”
 
यावर काही भाष्य करण्याने वरील पंढरीनाथ पाटीलकृत ‘बॉम्ब’च्या धमाक्याला धक्का बसेल म्हणून गप्प बसतो.
तुकाराम तात्या पडवळ हे म. फुले यांचे एक ज्येष्ठ अनुयायी. त्यांनी ‘जातीभेद विवेकसार’ या नावाचा ग्रंथ ‘हिंदू’ या नावाने प्रसिद्ध केला. (पान क्रमांक ८९). त्याला म. फुले यांची प्रस्तावना आहे.डाव्यांना तर ‘हिंदू’ या शब्दाचेच सोवळ्याइतके वावडे आहे, त्याचे काय? किती पाली झटकणार?
 
तर, याच पुस्तकात पान २२३ ते २२५ वर काही आठवणी छापल्या आहेत. त्यातली तिसरी आठवण ज्यांनी लिहिली, त्यांचा त्याच पुस्तकातील परिचय आधी पाहू -
 
"श्री. तात्यासाहेब धोंडिबा रोडे, जात- रामोशी, राहणार- फुलेवाडी, भवानी पेठ, पुणे. हे लहानपणापासून महात्मा फुले यांच्या हाताखाली होते. ते सन १९११ पासून आजपर्यंत क्षत्रिय रामोशी संघाचे सेक्रेटरी असून, पोलीस खात्यात जमादाराच्या जागेवर आहेत.”
 
त्यांनी लिहिलेली एक आठवण खाली देत आहे -
 
"जोतीरावांनी भोकरवाडीत महारामांगांची शाळा घातली. त्यावेळी त्या शाळेवर एक महार पट्टेवाला ठेवला होता. तो गरिबीने फार गांजला म्हणून धर्मांतर करणार होता. ही बातमी कळताच जोतीरावांनी त्यास सदुपदेश करून त्याचे धर्मांतरापासून मन वळविले व त्यास रा. जगन्नाथ सदाशिवजी यांच्याकडून काही मदत करून त्याच्या पगारातही महिन्याला दोन रुपयांची वाढ केली.”
 
म. फुले यांच्या कार्याची दिशा आतातरी स्पष्ट व्हायला हरकत नाही. परकीय धर्मासंबंधीचे म. फुले यांचे लिखाण हे हिंदूंना धडा शिकविण्यापुरतेच होते, हे आता स्पष्ट व्हायला हरकत नाही.
 
म. फुले यांनी केलेली कामे :
 
इ. स. १८४८ -शूद्रातिशूद्रांसाठी मुलींची शाळा
इ. स. १८४९- मराठी प्रकाशकांना अनुदान देण्याची मागणी करणार्‍या सुधारकांच्या सभेला दिलेले संरक्षण
इ. स. १८५१ चिपळूणकरांच्या वाड्यातील व रास्ता पेठेतील मुलींच्या शाळांची स्थापना
इ. स. १८५५ - रात्रीच्या शाळेची स्थापना
इ. स. १८६० -विधवा पुनर्विवाह साहाय्य
इ. स. १८६३- बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना
इ. स १८६५- तुकाराम तात्या पडवळकृत ‘जातीभेद विवेकसार’ या ग्रंथाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन
इ. स. १८६८- घरचा हौद अस्पृश्यांसाठी खुला करणे २४/९/१८७३ सत्यशोधक समाजाची स्थापना
इ. स. १८७५ दयानंद सरस्वतींची मिरवणूक
 
यातली कोणती कामे परकीय धर्मासाठी आहेत? सगळी कामे हिंदूंसाठीच नाहीत काय? आणि पंढरीनाथ पाटील यांच्या भाषेत लिहायचे, तर हिंदुराष्ट्रासाठीच नाहीत काय? दयानंद सरस्वती ब्राह्मण होते. केवळ ‘वेदां’ना मानणारे होते. तरीही, त्यांची मिरवणूक म. फुले यांनी पुण्यात काढली. यात गूढ काहीच नाही. महर्षी दयानंदांनी स्त्रिया आणि शूद्रांना ‘वेदां’चे शिक्षण (संथा) देणे सुरू केले होते. हेच म. फुले यांनाही अपेक्षित असल्याचे पंढरीनाथ पाटील यांच्या लिखाणातून सिद्ध होत नाही काय? ते पान ५१ वर म. फुले यांच्या संबंधी लिहितात -
 
"आज ज्याप्रमाणे हिंदू धर्मात अन्याय व अनीती माजली आहे आणि आज जसे हिंदू धर्माचे विकृत स्वरूप नजरेस पडते, तसे ते पूर्वी नव्हते. मूळचा हिंदू धर्म शुद्ध स्वरूपाचा होता आणि त्याचप्रमाणे त्यांना हिंदू धर्मातील खुळचट चालीरीतींची व अंध रूढींची बरीच कल्पना झाली. त्यांना पक्के कळून चुकले की, सर्व मानवप्राणी एका ईश्वराची लेकरे असून, तो सर्वावर सारखे प्रेम करतो. आपापसात जातीभेद माजवून उच्चनीचत्त्वाच्या जोरावर ब्राह्मणांनी केवळ सोवळ्या-ओवळ्याचे बंड माजविले व कपटाच्या जोरावरच ते इतरांचे देव बनले.”
 
‘वेद’काळ-‘पुराण’काळ
 
वेदांबद्दल एकंदरीत फार आक्षेप म. फुले यांचा दिसत नाही. तथापि, ‘पुराण’काळातील देव-देवता आधुनिक तथाकथित अनुयायी-विचारवंत खोट्या, काल्पनिक मानतात. पण, त्यांतही सोयीच्या तेवढ्याच खर्‍या मानून टीकेची झोड उठवायची पद्धत आहे. याविषयी पुन्हा केव्हातरी लिहावेच लागेल.
 
दत्तक विधान
 
म. फुले यांनी काशीबाई नावाच्या ब्राह्मण विधवेचा मुलगा दत्तक तर घेतलाच; पण मृत्युपत्रात स्थावर-जंगम मालमत्ता त्याच्या नावे करून सामाजिक कामाचा वारसा मात्र ऐच्छिक ठेवलेला दिसतो. हाच तो यशवंत नावाचा मुलगा पुढे डॉक्टर होतो. दहा-बारा वर्षे ‘सत्यशोधक समाजा’चे कामही करतो. तरीही, डाव्यांची रटंत थांबायची नाही, याची लेखकाला जाणीव आहे. तथापि, समाजासमोर सत्य आणलेच पाहिजे ना? तूर्तास एवढेच झाकण उघडू!
 
- डॉ. रमेश माधवराव पांडव, छत्रपती संभाजीनगर