हजारो वर्षांपूर्वीपासून भारतीय समाजामध्ये सामाजिक समता, ममता, दया, मानवता या संकल्पना होत्या. मात्र, परकीय आक्रमण आणि इतर कारणांमुळे समाजापासून दूर गेलेल्या या संकल्पना प्रत्यक्षात समाजात पुन्हा रुजवण्यासाठी, कार्यरत होण्यासाठी आयुष्य झिजवले, ते महात्मा जोतिबा फुले यांनी. दि. ११ एप्रिल रोजी त्यांची जयंती. यंदाचे वर्ष हे त्यांच्या जयंतीचे द्विशतक वर्ष, त्यानिमित्ताने सदर लेखात महात्मा जोतिबा फुल्यांच्या प्रेरणादायी विचारकार्याचा मागोवा या लेखात घेतला आहे...
राजर्षी शाहू छत्रपती यांनी महात्मा फुल्यांना ‘महाराष्ट्राचा मार्टिन ल्युथर’, तर श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी फुल्यांना ‘हिंदुस्तानचा वॉशिंग्टन’ म्हणून गौरवले होते. दोन्ही महापुरुषांनी महात्मा फुल्यांचा यथोचित गौरव केला आहे. मात्र, त्याहीपलीकडे जाऊन वाटते की, मार्टिन ल्युथर किंवा वॉशिंग्टन यांच्यापेक्षाही चार योजने पुढे जाऊन अत्यंत प्रखरपणे आणि तितक्याच तळमळीने जोतिबा फुले यांनी समाजहितासाठी विचारकार्य केले. ते विचार, ते कार्य म्हणजे सामाजिक विषमता, सामाजिक अन्याय या विरोधातले ‘क्रांतिबीज’च होते. त्यामुळेच तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना गुरुस्थानी मानले आणि त्यांच्या विचारांचा पुरस्कार केला. कोणताही भेदाभेद, जातीय विषमता, एखाद्याला संधी नाकारणे, मूलभूत हक्क नाकारणे या सगळ्याविरोधात जोतीरावांनी यशस्वी लढा दिला आणि पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जोतीरावांच्या या समतेच्या विचारकार्याला संविधानामध्ये भारतीय कायद्याच्या माध्यमातून चिरंतन स्थान दिले. याच परिप्रेक्ष्यात १९३५ मध्ये महात्मा गांधीजी म्हणाले होते, "जोतीराव फुले हेच खरे ‘महात्मा’ आहेत.”
महात्मा! महात्मा कोणाला म्हणावे? ज्याने निःस्वार्थीभावाने दुसर्यांसाठी कार्य केले त्यांना? हे कार्य जगभरात अनेकांनी केले; पण तरीही ‘महात्मा’ म्हटले की, डोळ्यांसमोर जोतिबा फुलेच येतात. कारण, जोतिबा यांनी जातीय, प्रांतीय, वर्णीय, वर्गीय लिंगभेद या भेदापलीकडे जाऊन केवळ आणि केवळ माणसाच्या माणूसपणाच्या जगण्यासाठी विचारकार्य केले. त्यांनी समाजाच्या उत्थानासाठी स्त्री आणि पुरुष या दोघांच्याही सर्वांगीण विकासाचा संकल्प केला. हा संकल्प नुसता कागदी नव्हता, तर त्यासाठी त्यांनी अक्षरशः रक्ताचे पाणी केले आणि आयुष्याचा होम केला. ‘क्रांती, समताबिमता आपल्याकडे नको, दुसर्यांकडेच ठीक आहे’, असे आजच नव्हे; तर त्याकाळीही मानणारा समाज होताच. तत्कालीन स्त्रियांची परिस्थिती तर अनेक कुप्रथा-परंपरेत चिरडलेली होती. या परिप्रेक्ष्यात जोतिबांनी स्त्रीशिक्षणाचा पाया स्वतःच्या घरात आधी रचला. समाजाने ज्या काही कुरीतीमध्ये स्वतःला बांधून घेतले होते, त्या कुरीतींना मुळासकट नष्ट करण्यासाठी जोतिबांनी दिलेला लढा म्हणजे ‘क्रांतीचे महापर्व’. असो, वर्षोनुवर्षे काही स्वार्थी लोक महात्मा जोतिबा यांना एकाच जातीच्या चौकटीत मांडण्याचे पाप करत आहेत. खरेतर जोतिबा यांचे कार्य-विचार हे कोणत्याही जातीय चौकटीतले किंवा कोणत्या एका जातीविरुद्धचे विखार नाहीत; तर त्यांचे कार्य आणि विचार हे सामाजिक न्यायाचे प्रवर्तक आहे. दुसरीकडे काही लोक महात्मा फुल्यांबाबत धादांत खोटे विधान करतात की, ते हिंदुविरोधी होते आणि त्यांचा ओढा ‘ख्रिश्चॅनिटी’कडे होता. पण, त्यांच्या जीवनचरित्राचा मागोवा घेतला किंवा त्यांच्या समकालीन व्यक्तींचे चरित्र पाहिले; तर त्यात जोतिबा फुले यांनी हिंदू समाजाच्या सकारात्मक श्रद्धा जपल्या होत्या. हिंदूंनी धर्म त्यागून ख्रिश्चन व्हावे का? यावर त्यांचे मत होते की, "उपेक्षित, वंचित समाजातील लोक मुसलमान अथवा ख्रिस्ती धर्म स्वीकारतात, तरी हे बरे नव्हे; परधर्मातही धर्मगुरूंचा थोडाफार जुलूम आहेच.”
यानुसार घडलेली एक घटना-जोतिबांनी भोकरवाडीत मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू केली. ख्रिश्चन गोर्यांचे राज्य आहे. आपण ख्रिश्चन झालो, तर आपली गरिबी जाईल, जातीय विषमतेचे चटके बसणार नाहीत, असे त्यावेळी त्या शाळेच्या पट्टेवाल्याला वाटले. जोतीरावांना जेव्हा हे कळले, तेव्हा त्यांनी तत्काळ त्याची भेट घेतली. त्याने धर्मांतरण करू नये म्हणून त्याचे मन वळवले. आर्थिक परिस्थितीचा प्रश्न मांडत तो पुन्हा धर्मांतरणाच्या वाटेवर जाऊ नये, यासाठी जोतीरावांनी मार्ग काढला. रा. जगन्नाथ सदाशिवजी यांच्याकडून काही मदत करून त्याच्या पगारातही दोन रुपयांची वाढ केली होती. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी धर्म-न्यायाच्या परिप्रेक्ष्यात विचार करणारे महात्मा जोतिबा फुले! त्यांचे विचारकार्य काळाच्या पुढचे आणि मानवीमूल्य स्थापित करणारे आहे. समता आणि मानवतेच्या मूल्यांसाठी आजीवन कार्य, त्याग आणि संघर्ष करणार्या महात्मा जोतिबा फुले यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे कोटी कोटी मानवंदना!
योगिता साळवी
९५९४९६९६३८