सर्वांचा निर्मिक आहे एक धनी ॥
त्याचें भय मनीं | धरा सर्व ॥
न्यायाने वस्तुंचा उपभोग घ्यावा ॥
आनंद करावा | भांडू नयें ॥
धर्मराज्य भेद मानवा नसावे ॥
सत्यानें वर्तावें | ईशासाठी ॥
सर्व सुखी व्हावे भिक्षा मी मागतों ॥
आर्यास सांगतों | जोती म्हणे ॥
निर्मिकानें जर एक पृथ्वी केली ॥
वाही भार भली | सर्वत्रांचा ॥
तृणवृक्षभार पाळी आम्हासाठीं ॥
फळे तीं गोमटीं | छायेसह ॥
सुखसोईसाठीं गरगर फिरे ॥
रात्रंदिन सारे | तीच करी ॥
मानवांचे धर्म नसावे अनेक ॥
निर्मिक तो एक | जोती म्हणे ॥
एका सूर्य सर्वां प्रकाशास देतो ॥
उद्योगा लावीतो | प्राणीमात्रा ॥
मानवासहीत प्राण्यांचे जीवन ॥
सर्वांचे पोषण | तोच करी ॥
सर्वा सूख देई जनकाच्या परी ॥
नच धरी दूरी | कोणी एका ॥
मानवांचा धर्म एकच असावा ॥
सत्यानें वर्तावा | जोती म्हणे ॥
एक चंद्र नित्य भ्रमण करीतो ॥
सर्वां सूख देतो | निशीदिनीं ॥
भरती आहोटी समुद्रास देतो ॥
जल हालवीतो | क्षारांसह ॥
पाणी तेंच गोड मेघा योगें होतें ॥
संतोषी करीतें | सर्व प्राण्यां ॥
मानवांचे साठीं बहु धर्म कसे ॥
झालां कां हो पिसे | जोती म्हणे ॥
सर्वांसाठी एक वायु केला खास ॥
घेती श्वासोच्छवास | प्राणीमात्र ॥
वृक्षवल्लीसह सर्वांचें जिवन ॥
करीतो पालन | जगामाजीं ॥
वायुच्या योगानें हवा शुद्ध होती ॥
प्राण्या सूख देती | निशीदिनी ॥
मानवांनों, तुम्ही ईशा नित्य भ्यावें ॥
सर्व सूखी व्हावें | जोती म्हणे ॥
क्षत्रियांनो, तुम्ही कष्टकरी व्हावें ॥
कुटुंबा पोसावें | आनंदानें ॥
नित्य मुलींमुलां शाळेंत घालावें ॥
अन्नदान द्यावें | विद्यार्थ्यास ॥
सार्वभौम सत्य स्वतः आचरावें ॥
सुखें वागवावें | आर्य भट्टा ॥
अशा वर्तनानें सर्वां सूख द्याल ॥
स्वत: सुखी व्हाल | जोती म्हणे ॥
दरिद्री मुलांनी विद्येस शिकावें ॥
भिक्षान्न मागावें | पोटापूर्ते ॥
विद्वान वृद्धांनी विद्यादान द्यावें ॥
भिक्षेकरी व्हावें | गांवामध्यें ॥
स्त्रीपुरुषांसाठी शाळा त्या घालाव्या ॥
विद्या शिकवाव्या | भेद नाहीं ॥
स्व हितासाठीं खर्च जे करीती ॥
अधोगती जाती | जोती म्हणे ॥
दुर्गुणांचा छंद ज्यास बा लागला ॥
भिक्षा घालण्याला | पात्र नाहीं ॥
खोटें बोलणारा मद्यपी निव्वळ ॥
घाली ना अगळ | तर्कटास ॥
तर्क धर्म बळ राजद्रोही खळ ॥
शुद्रांत प्रबळ | ज्ञान सांगे ॥
अशा साह्य देतां माजवितां पोळ ॥
मानवासी राळ | जोती म्हणे ॥ ४ ॥
स्वभाषा लिहावी भाषण करावें ॥
सद्गुणी असावें | स्वभावांत ॥
चाळीशीच्यावर त्यांनी दीक्षा घ्याव्या ॥
शाळा तपासाव्या | योग्य वेळीं ॥
मुढ मांगासह ब्राह्य मुजोर ॥
मूळ सत्य सार | त्यांस सांगा ॥
निर्मिकाचा धर्म एक आहे सत्य ॥
व्यर्थ कां पांडीत्य | जोती म्हणे ॥
क्रोधाचा विटाळ सत्यधर्म पाळी ॥
तो खरा बळी | मानवांत ॥
सवांभूतीं दया हृदयीं कोमळ ॥
घालीतो अगळ | इंद्रियांस ॥
जगांत वर्ततो सद्गुणी मवाळ ॥
वासनेस मूळ | डाग नाहीं ॥
सत्य शोध होतां धिक्कारी तो कली ॥
तोच सत्यवाली | जोती म्हणे ॥
ईशें केलें नाहीं तुजसाठीं सर्व ॥
करूं नको गर्व | प्राण्यांमध्यें ॥
देह देऊनीयां बुद्धिमान केला ॥
धनीपणा दिला | सर्वांमध्यें ॥
जगाच्या कल्याणा देह कष्टावावा ॥
कारणी लावावा | सत्यासाठीं ॥
अशा वर्तमाना जन्माचें सार्थक ॥
संतोषी निर्मिक | जोती म्हणे ॥
सत्याचा जिव्हाळा मनाची स्वच्छता ॥
चित्तास स्वस्थता | जेथें आहे ॥
जेथें जागा धीर सदा हृदयांत ॥
सत्यवर्तनांत | खर्ची घाला ॥
पीडा दुःखें सोशी संकटें निवारी ॥
गांजल्यास तारी | जगामाजीं ॥
धीर धरूनीयां सर्वां सूख देती ॥
यशवंत होती | जोती म्हणे ॥
प्राणीमात्रा सर्व निर्मिली ॥
साधने ती दिली | परोपरी ॥
पदार्थ निर्मवन सर्वास पोशीले ॥
आनंदीत केले | सर्वकाळ ॥
त्यांपैकीं मानव बुद्धिमान केला ॥
सत्य वर्तायाला | मासल्यांत ॥
रंजलेगांजले अनाथा पोसावें ॥
सर्वां प्रीतीनें वागावें | बंधूपरी ॥
त्याच्या खटाटोपी आणा ध्यानीं मनीं ॥
उपकार मनीं | जिवेंभावें ॥
परपीडा देणें मानवा दुषण ॥
कळीचें साधन | जगामाजीं ॥
कृतज्ञ होऊनी मानी समाधान ॥
तृप्तीची ती खूण | जोती म्हणे ॥
जशी ज्यांचीं कर्मे तशीं फळें देती ॥
वळण लावीती | संतानास ॥
दुष्ट कर्में तुम्ही अजीबात टाका ॥
पुढें नाहीं धोका | मुलांबाळां ॥
झालें गेलें सर्व मनीं झुरू नका ॥
सत्यकमीं विका | आपुल्यास ॥
खरे समाधान भोगा सावकाश ॥
आनंद जगास | जोती म्हणे ॥
मानवा उद्योग अनेक आहेत ॥
बर्या वाईटांत | काळ जातो ॥
आपरहतासाठीं उद्योग करीती ॥
मागव दावीताती | संतानास ॥
त्यापैकीं आळशी दुष्ट दुराचारी ॥
जन वैरी करी | सर्व काळ ॥
जसा ज्याचा धंदा तशीं फळें येती ॥
सुखदुःख होती | जोती म्हणे ॥
सत्य उद्योगानें रोग लया जाती ॥
प्रकृती ती होती बळकटा ॥
उल्हासीत मन झटे उद्योगास ॥
भोगी संपत्तीस | सर्वकाळ ॥
सदाचार सौख्य त्याची सेवा करी ॥
शांतात ती बरी | आवडीनें ॥
नित्य यश देई त्याच्या उद्योगास ॥
सुख सर्वत्रांस | जोती म्हणे ॥
उद्योग जो करी दीनबंधूंसाठीं ॥
ममता ती पोटी | मानवाच्या ॥
विद्या सर्वां देई सद्गुणाची हाव ॥
करी नित्य कींव | अज्ञान्याची ॥
थकल्या भागल्या दीना साह्य करीं ॥
उद्योगास सारी | जपूनीयां ॥
त्याच्या उद्योगास नित्य यश देई ॥
जगा सुख देई | जोती म्हणे ॥
सर्व दुर्गुणांचा आळस हा पिता ॥
बाळपणीं कित्ता | मुलीमुलां ॥
तरुणपणांत दुर्गुणी संसारी ॥
वृद्धपणीं करी | हाय हाय ॥
उद्योगा सोडूनी कलाल बनती ॥
शिव्याश्राप देती | जनामाजी ॥
आळशास सूख कधींच होईना ॥
शांतता पावेना | जोती म्हणे ॥
सार्वभौम सत्य ज्याचें भांडवल ॥
निर्मिक अव्वल | सर्व एक ॥
त्यानें निर्मियले मानव हे सारे ॥
त्यांचींच लेकरे | तोच रक्षी ॥
आपल्यावरून जग ओळखावें ॥
सर्वा निववावें | संसारी ॥
जसजसे आम्ही मानवासीं वागूं ॥
त्याचीं फळें भोगूं | जोती म्हणे ॥