महाराष्ट्रात अनेक संतांनी अभंग रचले, सर्वसामान्य माणसाला भक्तिमार्गाला लावण्यासाठी व त्याला विचारांचे बीज देण्यासाठी ‘अखंड’ या विशेष काव्यरचनेचा उपयोग करण्यात आला. जोतिबांनी मानवाचे मूलभूत हक्क, समानता आणि बंधुभाव देणारा सार्वजनिक सत्यधर्म स्थापन केला. फुल्यांनी ‘निर्मिक’ नावाने परमेश्वराची आराधना करणारा सत्यधर्म स्थापन केला. त्यासाठी ‘अखंड’ रचले. हे ‘अखंड’ म्हणजे अभंगासारखेच भक्तिपूर्ण गुणगान होते. मात्र, ते वेगळे ओळखू यावेत म्हणून ‘अखंड’ असे नाव दिले होते. या अखंड-रचनांचा वेध घेणारा हा लेख...
एक सूर्य सर्वां प्रकाशास देतो |
उद्योगा लावितो | प्राणिमात्रा ॥
सर्वांसाठी एक वायू केला खास |
घेती श्वासोच्छ्वास | प्राणिमात्र ॥
महात्मा फुले अशी साधी; पण गेय शब्दरचना या ‘अखंडा’त करताना दिसतात. मानव हा एकाच वायूपासून श्वास घेतो, एकाच सूर्याच्या प्रकाशात वावरतो हे सांगताना, मानवात भेदाभेद नाही हे अतिशय सूचकपणे जोतिबा व्यक्त करतात.
जोतिबांनी देव, परमेश्वर ही संकल्पना न घेता, ‘निर्मिक’ अशी वेगळीच संकल्पना मांडली आहे. एका ‘अखंडा’त ते लिहितात :
प्राणिमात्रा नेत्र निर्मिकाने दिली |
पाहू ती लागली एकमेकां ॥
ज्ञान दिले सर्वां सत्य शोधण्याला |
मार्गी लावण्याला | अज्ञान्यास ॥
निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक |
भांडणे अनेक | कशासाठी ॥
मानवाच्या सुखासाठी त्याने ऐय धारण केले पाहिजे, असे फुले म्हणतात. त्यासाठी एक निर्मिक मानावा, त्याला साक्षी ठेवून नीतीने आचरण करावे व सुखी व्हावे, इतका सोपा ‘सत्यधर्म’ जोतिबांनी सांगितला आहे.
सर्वांचा निर्मिक एक आहे धनी |
त्याचे भय मनी धरा सर्व ॥
न्यायाने वस्तूचा उपभोग घ्यावा |
आनंद करावा | भांडू नये ॥
धर्मराज्यभेद मानवा नसावे |
सत्याने वर्तावे ईशासाठी ॥
या अखंडात फुले त्यांच्या अनुयायांना निर्मिकाचे भय मनात धरून नीतीने आचरण करा आणि धर्मात, राज्य शासनात भेद न बाळगता, अवघी मानवजात एकच आहे हे लक्षात घ्या, असे सांगतात. समाजातील गरीब लोकांना न्याय मिळावा, धर्माच्या नावाखाली पाखंड चालू असेल तर ते त्याने ओळखावे, यासाठी फुले लिहितात :
कल्पनेचे देव कोरले उदंड
रचिले पाखंड हितासाठी
किन्नर गंधर्व ग्रंथी नाचविले
अज्ञ फसविले कृत्रिमाने
देवाच्या आणि आपल्यामध्ये थेट संवाद साधता येतो, त्यासाठी कुणी मध्यस्थ नको असे त्यांचे सांगणे होते.
कोणत्याही धर्मग्रंथाचे प्रामाण्य मानण्याची आवश्यकता नाही, असे त्यांनी आपल्या अनुयायांना समजावले.
अशा वेळी ते लिहितात :
आर्य धर्मग्रंथ तर्काने रचले
नाही इशा भ्याले | स्वार्थासाठी ॥
शूद्रादीक घरी पारायण केले |
त्यास ठकविले | धर्ममिषे ॥
पारलौकिक गतीसाठी मृत्यूनंतर करावयाची कर्मे, त्यात अगदी सावकाराकडून कर्ज उचलून ते करणार्या सामान्य माणसाला जोतिबांनी ‘याची आवश्यकता नसते’ हे आपल्या काव्यरचनेतून पदोपदी सांगितले आहे.
माणूस तितका एकच आहे, हे सांगताना जोतिबांनी मांग व आर्य अशा दोन जातींची नावे घेऊन ‘अखंड’ लिहिला आहे.
सध्याच्या काळात आपल्याला असे थेट जातीचे नाव घेणे योग्य वाटणार नाही; पण त्याकाळी सर्रास जातिवाचक बोलले जात असे. तो अखंड असा आहे :
मांग आर्यामध्ये |
पाहू जाता खूण |
एक आत्मा जाण दोघांमध्ये ॥
दोघेही सारिखे सर्व खातीपिती |
इच्छा ती भोगीति | सारखीच ॥
मांग आर्य दोघे | शोभा मानवात |
दोघे वर्तनात एकसहा ॥
सर्व ज्ञानामध्ये | आत्मज्ञान श्रेष्ठ |
कोणी नाही भ्रष्ट | जोती म्हणे ॥
महात्मा जोतिबा फुले यांनी १८७३ साली पुण्यात ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना केली. फुले दाम्पत्याने जे समाजसुधारणा, शिक्षण आणि धर्मसुधारणा या क्षेत्रांत काम चालवले होते, त्याला संस्थात्मक स्वरूप ‘सत्यशोधक समाजा’च्या स्थापनेमुळे मिळाले. ‘सार्वजनिक सत्यधर्म’ याच आधाराने सुरू झाला.
मुळात भारतात असो की महाराष्ट्रात; ज्या सुधारणा करणार्या संस्था होत्या, त्या सुशिक्षित मध्यमवर्गीय, उच्चभ्रू लोकांनी चालवलेल्या होत्या.
बहुजन समाज, दलित, शूद्र-अतिशूद्रांचे मूळ प्रश्न, त्यांच्या रोजच्या जीवनातील समस्या या वर्गाला नीटपणे माहीत नव्हत्या. शेतकरी नाडला जात होता. एकीकडे त्याला सावकार, जमीनदार पीडत होते; तर दुसरीकडे लग्न, बारसे यांच्या जेवणावळीमध्ये, अंत्यसंस्कार व श्राद्ध यांच्या विधींमध्ये आणि कर्मकांडे करण्यामध्ये त्यांचा कष्टाचा पैसा वाया जात होता.
या गरीब समाजाला शिक्षण देत असतानाच, नीतीने व सदाचाराने वागण्यासाठी ‘सार्वजनिक सत्यधर्म’ दिला पाहिजे, असे जोतिबांच्या लक्षात आले. म्हणून त्यांनी ‘निर्मिक’ नावाने परमेश्वराची आराधना करणारा ‘सत्यधर्म’ स्थापन केला, ‘अखंड’ रचले, हे ‘अखंड’ म्हणजे अभंगासारखेच भक्तिपूर्ण गुणगान होते. जोतिबांनी मानवाचे मूलभूत हक्क, समानता आणि बंधुभाव देणारा सार्वजनिक सत्यधर्म स्थापन केला. पुरोहितांशिवाय सर्व कार्ये कशी करावीत, हे सांगितले जात असे. एके ठिकाणी फुले लिहितात :
माझ्याशी लोकांनी |
जसे बा वागावे |
तसे मी वागावे | जगासंगे ॥
येणारे अरिष्ट कसेतरी टाळा |
शूद्रादीक गळा|
पडा आता ॥
वेळ आली आत्मपरीक्षण करा ॥
निर्मिकास स्मरा |
जोती म्हणे ॥
असे एकूण २१५ ‘अखंड’ संकलित करण्यात आले आहेत. या काव्यरचनेचा उद्देश शूद्रादीक स्त्री-पुरुषांना जागृत करणे हा होता. पाप-पुण्य, स्वर्ग-नरक या गोष्टींचा त्याग करायचा असला, तरीही मानवाला नीतीचे, धार्मिकतेचे अधिष्ठान हवेच, असे फुल्यांना वाटत होते. म्हणूनच, निर्मिकाचा धाक दाखवून देणारे आणि मानवतेला साद घालणारे ‘अखंड’ त्यांनी लिहिले.
डॉ. रमा दत्तात्रय गर्गे