महात्मा जोतिबा फुले यांच्या कार्याचा आवाका शब्दातीत आहे. समाजातील कालबाह्य रूढी पंरपरांच्या अधांराला भेदत त्यांनी सामाजिक जागृतीचा वसा हाती घेतला. तमसो मा ज्योतीर्गमय या सुत्रानुसार त्यांनी केलेले समाज कार्य हे आज देशाला नव्हे संपुर्ण जगाला दिशादर्शक आहे. अन्याय असमानता विषमता यांचा अंधार दुर करत न्यायाची, सत्याची ज्योत तेववणार्या महात्मा जोतिबा पुल्यांच्या विचार कार्याचा संक्षिप्त वेध या लेखात घेतला आहे.
म. जोतिबा फुले यांनी शिक्षणाचा ध्यास घेतला. त्यांच्या पत्नीस त्यांनीच शिकविले. बरे, नुसते शिकविले नाही, तर सावित्रीबाई यांना विचारांची नवी दिशा दिली. पुण्यामध्ये शाळा सुरू केल्या. त्यातून बहुजन शिकू लागले. हजारो वर्षे रुतलेली मेख जशी बाहेर पडली, तशी त्यातून अक्षरांनी वळणे घेतली. शब्दांना आकार येऊ लागला. म. फुले यांचे प्रचंड वाचन, जगाच्या नव्या घडामोडी, त्यातील होणारे बदल, त्यातून उपलब्ध होणारे ज्ञान जोतिबांनी आत्मसात केले. या ज्ञानाचे संचित त्यांनी अवगुंठित न करता, त्या ज्ञानाला त्यांनी वाहते ठेवले. १९व्या शतकाच्या मध्यास अनेक विचारवंत पुढे सरसावले. त्यात जोतिबा फुले हे नेटाने पुढे आले.
त्यांनी त्यांच्या विचारांची दिशा बदलली. त्यांच्या विद्यार्थीदशेत असताना, त्यांच्या वाचनात एक महान बंडखोर विचारवंत थॉमस पेन यांचे ‘मानवाचे हक्क’ या ग्रंथाचा फार मोठा परिणाम जोतीरावांवर झाला. त्यातूनच त्यांच्या जीवितकार्याची दिशा ठरली गेली. त्यांनी आपले सर्व जीवन मानवी-स्वातंत्र्यासाठी समर्पित केले, त्यासाठी अविरत त्याग केला. जनविरोधाला जुमानले नाही. त्यातून त्यांच्यावर मरणप्राय हल्ले झाले; परंतु येणार्या संकटांना त्यांनी धैर्याने तोंड दिले. त्यांच्या लोककार्याचे समर्पण बघून अनेक माणसे त्यांच्या पाठीशी उभी राहिली. त्यातूनच वस्ताद लहुजी साळवेसारखा माणूस त्यांचा संरक्षक म्हणून पाठीशी उभा राहिला. शाळा चालविण्यासाठी भिडे यांनी त्यांचा भिडेवाडा, त्यातील एक खोली व त्याचे प्रांगण मुक्तहस्ते बहाल केले. त्याचबरोबर जोतिबांना आर्थिक मदत केली आणि मुलींची पहिली शाळा पुण्यात सुरू झाली. खर्या अर्थाने शिक्षणाचा पाया रचला गेला. या सत्कार्यासाठी सदाशिव बल्लाळ गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर, सखाराम यशवंत परांजपे अशी मंडळी त्यांच्या हातात-हात मिळवून काम करू लागली. जोतीरावांनी भारतीय स्त्री-शूद्रांस शिक्षणाचे दरवाजे खुले व्हावे म्हणून सर्वप्रथम जीवाचे रान केले. भारतीय जाती व्यवस्था संपुष्टात आली पाहिजे, असे ते आम सभेत निक्षून सांगत असत. त्याप्रमाणे त्यांनी मागासवर्गीय समाजातील मुला-मुलींसाठी स्वतंत्र शाळा सुरू केली. जोतिबा म्हणायचे, "जो आपल्या धर्मबांधवांना आणि देशबांधवांना समान मानत नाही, तो देशभक्त कसा असू शकतो?” त्याकाळी संतांनी लोकजागृतीसाठी ‘अभंगा’चे माध्यम वापरले; तर शाहिरांनी राजाच्या किंवा कर्तृत्ववान पुरुषांच्या कर्तृत्वाची महती ‘पोवाड्या’तून सांगितली. महात्मा जोतीराव मात्र अभंग, पोवाडे, कविता आणि ‘अखंड’ यांचा आपल्या लेखनातून उपयोग करताना दिसतात. त्यांनी ‘राजे शिवाजीचा पोवाडा’ लिहून त्यांचे कर्तृत्व जनमाणसासमोर आणले होते. लोकजागृतीसाठी जोतीरावांनी पोवाड्याचा अधार घेतला होता. अगदी त्याचप्रमाणे त्यांनी ‘अखंड’ हा काव्यप्रकार निर्माण केला. त्यांचे सर्व ‘अखंड’ मानवी मूल्यांची जोपासना करताना दिसतात. त्यांच्या सुधारणेचा केंद्रबिंदू ‘माणूस’ हाच होता. म्हणून, ते त्यांच्या अखंडातून लिहितात :
निर्मिके निर्मिला मानव पवित्र |
कमी जास्त सूत्र | बुद्धीमध्ये ॥
पिढीजाद बुद्धी नाही सर्वामधी |
शोध करा आधी | पुर्तेपणे ॥
धर्म राज्य भेद मानवा नसावे |
सत्त्याने वागावे | ईशासाठी ॥
भारतीय व्यवस्थेविषयीचे मूल्य त्यांनी त्याकाळी स्पष्ट केले. ‘सत्यावीण नाही अन्य धर्म’.मानवतेविषयीचा असा कळवळा घेऊन तहयात हे व्रत त्यांनी त्यांच्या खांद्यावर वाहिले. त्यांच्यासोबत त्यांच्या सहकार्यांनी वाहिले. अस्पृश्यांना आणि पददलितांना ते व सावित्रीबाई आपल्या कुटुंबातलेच, आपल्या रक्तामासाचे मानीत. ‘जातिभेद’ आणि ‘चातुर्वण्य’ या संस्था त्यांना सर्वस्वी अमान्य होत्या. त्यांच्या लेखनातून जे मांडत, तेच ते लोकांसमोर मांडत व त्याचप्रमाणे ते वागत. उपेक्षितांविषयी व त्यांच्या दैन्याविषयी त्यांच्या मनात जे होते, ते त्यांनी प्रत्यक्षात करून दाखविले. १८६८ मध्ये त्यांनी अस्पृश्यांसाठी स्वतःचा घरचा हौद खुला केला. नियती कालक्रमातील मोठा अडथळा जोतीरावांनी दूर केला. पाण्यासाठी वणवण भटकणार्यांना त्यांच्या कोरड्या पडलेल्या घशाला जोतीरावांनी पाणी देऊन ओलावा दिला.
बालहत्या-प्रतिबंधकगृहाची स्थापना केली. विधवा पुनर्विवाहास साहाय्य केले. सावित्रीबाई फुले त्याच्या अध्यक्षा होत्या. आयुष्याच्या अखेरपर्यंत लोकहितासाठी देह कष्टवणार्या या उभयतांस मनापासून नमस्कार करावासा वाटतो. ना फळा होता, ना खडू होता. मात्र, त्यांनी जिद्दीने सावित्रीबाईंना शिकविले. सावित्रीबाईंनी पहिल्या सात मुलींची शाळा काढून त्यांना शिकविले. आज उभा महाराष्ट्र मुला-मुलींची शाळा शिकतोय. उभा देश जोतिबांच्या विचारकार्याच्या प्रेरणेने जगाच्या पाठीवर आज नवा इतिहास लिहितोय.
राखी रासकर
(लेखिका ‘सत्यशोधक फाऊंडेशन’च्या संस्थापक-अध्यक्ष आहेत.)